मराठेशाहीतील वाठार निंबाळकर घराणे
पोस्तसांभार :: सुरेश नारायण शिंदे
नंतर वाठारकर नाईक निंबाळकरांच्या पाच पिढ्यापर्यंतची विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही मात्र वाठारकर व फलटणकर यांच्यात नेहमीच भाऊबंदकी चालू असल्याचे संकेत मिळतात व यातहि वाठारकर नेहमीच दुय्यम ठरले आहेत. पाच पिढ्यानंतर मात्र कुशाजी बिन संताजी नाईक निंबाळकर हा कर्तृत्ववान पुरुष निघाला, अर्थात तो कालखंडही पेशवाईचा होता. संताजींच्या पाच मुलांची नावे अनुक्रमे मोरोजी, द्वारकोजी, सिदोजी, रामजी व कुशाजी अशी होती. यापैकी मोरोजी व द्वारकोजी हे नकल तर बाकी तीनहि मुलांचा वंशविस्तार झाला. सिदोजीराव निंबाळकर हे शिंदे सरकाराच्या सेवेत राहून इतिहासात मोठमोठे पराक्रम करीत सरलष्कर हुद्यापर्यंत पोहोचले होते. तसेच रामजी देखील परमुलूखांस आपले नशीब काढण्यासाठी गेले. कुशाजी हे संताजीचे एकमेव पुत्र मात्र वाठारास राहिले. सिदोजीराव जरी शिंदे सरकारच्या सेवेत होते तरी वाठारच्या उत्पनात हिस्सा असल्याने नव्या व जुन्या वाठार गावच्या मध्यभागी भव्य मोठा वाडा बांधला होता. कुशाजीने आपल्या कर्तृत्वाने मोठ्या प्रमाणात धन संचय केला असल्याचे दिसून येते. कुशाजीरावांच्या धनसंचयाबाबत अनेक आख्यायिका असून विश्वसनीय माहिती उपलब्ध होत नाही. कुशाजीने इतरांना कर्जाऊ पैसे दिलेल्या रकमांच्या तपशीलामुळे त्यांची संपत्ती किति असावी याचा खालील उदाहरणाहून आपणांस अंदाज करता येईल.
१) श्रीमंत पेशवे सरकार - २,००,००० /-
२) श्रीमंत होळकर सरकार - १,००,००० /-
३) श्रीमंत पंतसचीव - २,१७,२८० /-
४)श्रीमंत दौलतरावमहाराज शिंदे - २,०८,००० /-
५)श्रीमंत फलटणकर - १,९०,३२९ /-
एकूण रक्कम १०,१५,६०९ /- रुपये इतकी कर्जाऊ दिली असल्याने त्यांची आर्थिक स्थिति लक्षात येते, तसेच याशिवाय श्रीमंत कोल्हापूरकर यांसहि कर्ज दिले होते. अजूनहि इतर लोकांना कुशाजीने दिलेल्या लहानमोठ्या कर्जाऊ रकमेची लांबलचक मोठी यादी होऊ शकेल. इ.स.१८०० मधे भोर संस्थानचे अधिपति श्रीमंत चिमणाजी शंकर सचीव यांस पेशव्यांचा नजराणा भरण्यास अडचण होत असल्याने त्यांनी कुशाजीकडून आर्थिक मदत घेतली व त्याच्या बदल्यात संस्थानच्या हद्दीतील शिरवळ परगण्यातील भादे गाव हे कुशाजीस इनाम करून दिले. त्या इनामाची सनद खालीलप्रमाणे -
श्री
राजश्री कुशाजी बिन संताजी निंबाळकर देशमुख मौजे वाठार परगणे फलटण गोसावी यांसीः-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित चिमणाजी शंकर सचिव आशिर्वाद सु|| इहिदे मया तैन व अलफ शके १७२२ रौद्रनाम संवत्सरे दिले इनाम ऐसे जे
राजश्री पंत प्रधान यांचे सरकारांतून साल मजकुरी इकडील संस्थानावर नजरेचा ऐवज घेतला त्यास दौलत वोढगस्त साहूकारी एवेज कोठे मिळेना. ऐवजाची बेरीज भारी याची निशापाती होऊन निर्वाह होणे कठीण पडला आणी दौलतीत नाना प्रकारचे बखेडे पडून एवेजाचा कार्यभाग सिध्दीस न जाय. तेव्हा तुम्ही आगत्य धरून नजरेचा वगैरे भरणा केला. संस्थानचे महत उपयोगी पडला. सबब तुमचे चालवणे अवश्यक जाणून तुम्हावरी कृपाळू होऊन तुम्हांस मौजे भादे प|| सीरवल हा गाव जिल्हे रुजू अमल सुभाव खालीसा दरोबस्त कुलबाब कुलकानु हली पटी व पेस्तरी पटी खेरीज हकदार व कदीम इनामदार करून जल तरू तृण काष्ठ पाषाणनिधी निक्षेप सहीत आदी करून देऊन हे इनाम पत्र भोगवटीयास सादर केले असे तरी तुम्ही व तुमचे लेकराचे लेकरी वंशपरंपरेने अनुभवून सुखरूप राहणे जाणीजे छ° ७ रमजान पो| हुजूर
श्री
शंकराजी मुद्रा
नारायण
कुशाजीच्या स्त्रीचें नाव मैनाबाई असे होते, तर तिचेपासून कुशाजीस नऊ पुत्र व एक मुलगी झाली. त्यांच्या मुलांची नावे १) व्यंकटराव २) धारराव ३) हैबतराव ४) आनंदराव ५)चिटकोजीराव ६)बापुजीराव ७) आपाजीराव ८) निलकंठराव ९) पिराजीराव पैकी बहुतेक श्रीमंत शिंदे सरकारच्या पदरी होते.
No comments:
Post a Comment