पानिपतचे तिसरे युद्ध -
मराठ्याची यशोगाथा भाग -२
पानिपतच्या तिसऱ्या युध्द १४ जानेवारी १७६१ सकाळी ९.०० वाजता सुरु झाले होते. अगदी दिवस मावळण्यापूर्वी तीन घटका मराठ्यांचे वर्चस्व होते. मराठ्यांचे सैन्य उपाशी व तहानलेले असतानाही मोठ्या शौर्याने लढत होते. मराठ्यांची सरशी होत आहे हे पाहिल्यावर अब्दालीने आपले राखीव फौज अचानक युध्द क्षेत्रावर उतरवले. तसेच अराजसिंग नावाच्या राजांचे ५००० सैन्य भाऊसाहेबांकडून लढत होते. त्यांनी अचानक माघार घेतली. अब्दालीच्या राखीव कडवे १०००० सैन्यासमोर सदाशिवभाऊ , समशेर बहाद्दर , जनकोजी शिंदे व इब्राहिम गारदी अगदी तुटपुंज्या सैन्यानिशी मोठ्या शौर्याने लढत होते.अचानक विश्वासरावांना गोळी लागली ते हत्तीवरुन खाली पडले.त्यावेळी मराठ्यांच्या सैन्यात गोंधळ सुरु झाला. मात्र अनपेक्षित उद्धभवलेल्या परिस्थितीतही सदाशिवभाऊ लढत होते. अखेर लढता-लढता सदाशिवभाऊ जबर जखमी झाले. मराठ्यांना दिसेनासे झाले. हे लक्षात येताच मराठा सैन्य गोंधळले. जोरदार तोडातोडी सुरु झाली. सदाशिवभाऊ ,इब्राहिमखान गारदी , जनकोजी शिंदे समशेर बहाद्दर इत्यादी वीर रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यत लढता -लढता धारातीर्थी पडले.काशीराज म्हणतो " मराठ्यांची फौज एकाएकी नाहीशी झाली. मैदानात कोणी उरले नाही. ठिकठिकाणी प्रेतांच्या राशी मात्र पडल्या होत्या . पानिपतच्या भीषण हानीची बातमी दक्षिणेत समजल्यावर काय परिस्थिती झाली हे सांगताना मिराते अहमदी चा लेखक अली महमदखान लिहितो....वरील बातमी दक्षिणेत पसरली शोक नाही असे एक घर राहिले नाही. प्रत्येक जण शोकाने होरपळून गेला .सारे जग म्हणजे शोकागार बनले. पानिपतच्या युध्दाबाबत अजून एक वर्णन नेहमी वाचण्यास मिळते. "२ मोती ,२७ मोहरा व असंख्य खुर्दा गेल्या चिल्लर किती गेली यांची मोजदादच नाही."
अंताजी माणकेश्वर , दत्ताजी गायकवाड , साबाजी शिंदे ,मल्हारराव होळकर , महादजी शिंदे व नाना फडवणीस मोठ्या प्रयासाने वाचले. पानिपतच्या -३ युध्दात मैदानावर जरी मराठ्यांचा पराभव झाला. तरी ज्या हेतूसाठी मराठ्यांनी अब्दालीशी हे युद्ध केले. तो हेतू मात्र सफल झाला. मराठ्यांचा मुख्य हेतू म्हणजे अब्दाली किंवा इतर अफगाण सैन्याने पुन्हा भारतावर आक्रमण करु नये. १७६१ पासून १८१८ पर्यत कोणीही अफगाणी भारतावर आक्रमण करण्यास आले नाही. तसेच या युद्धात अब्दालीचा भले ही विजय झाला. मात्र त्यांचेही जबर नुकसान होऊन तो लष्करीदृष्टीने कमकुवत झाला. कारण शिखांचा इतिहास लिहिणारे खुशवंतसिग म्हणतात की , गिलचे व मराठ्यांच्या युध्दामुळे पुढे अब्दालीवर शिखांनी विजय मिळवला. व्हॉन बेल नावाचा इंग्रज आपल्या डायरीत लिहितो की, "कधीकधी पराजयातच ही विजय असतो. " तसेच या युद्धाबाबत म्हणता येईल. या युध्दानंतर अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतो की, " सदाशिवभाऊसारखा बहाद्दर मी कधी पाहिला नाही. हजारो सैन्याशी लढणारा सदाशिवभाऊ आज ही माझ्या डोळ्यासमोर दिसतो. हे युध्द माझ्या जीवनातील सर्वात मोठे युद्ध होते. यावेळी जगातील उच्च दर्जाच्या सेनाशी मी लढत होतो. तुमच्या मराठा सैन्याला माझे शेकडो सलाम ..... आणि अवघ्या ११ वर्षात पानिपतचे नुकसान मराठ्यांनी भरुन काढले. माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली व महादजी शिंदेच्या पराक्रमाने १७८८ ते १८०३ पर्यत दिल्लीच्या किल्ल्यावर भगवा झेंडा डोलाने फडकत होता. मराठ्यांचा दबदबा पुन्हा निर्माण झाला. म्हणजे पानिपत-३ युद्ध म्हणजे मराठ्यांचा पराभव नसून यशोगाथाच होती.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संदर्भ - मराठ्यांचा इतिहास भाग -२
No comments:
Post a Comment