विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

पानिपतचे तिसरे युध्द - मराठ्याची यशोगाथा भाग -१

 पानिपतचे तिसरे  युध्द -

मराठ्याची यशोगाथा भाग -१

पानिपतच्या तिसऱ्या  युध्दाला सन -2021 मध्ये 260 वर्ष पूर्ण होत आहे. या युध्दाबाबत थोडक्यात जरी लेख  लिहायचे ठरवले तरी ते एका लेखात लिहिणे शक्य नाही. म्हणून  13 जानेवारी  2021 व 14 जानेवारी 2021 या दोन दिवशी थोडक्यात  लेख  टाकत आहे.💐💐💐


    दत्ताजी शिंदेच्या मृत्यूची बातमी पुण्यात येऊन धडकली. त्यावेळी निजामाच्या विरोधातील उदगीरची लढाईत सदाशिवभाऊंनी विजय मिळवला होता. तो विजय सोहळा चालू होता. दत्ताजी शिंदेच्या मृत्यूची बातमी अनपेक्षित  होती. कारण नजीबखानाची दत्ताजींना मारण्याची पात्रता  नव्हती. त्यामुळे नजीबला अफगाणिस्तानचा बादशहा अब्दालीची मदत केली    हे सिद्ध  झाले. अब्दाली भली मोठी फौज घेऊन उत्तरेत आला आहे. आता अब्दालीचा कायमचा बंदोबस्त  करणे गरजेचे होते. त्यावेळी  उदगीराच्या यशाचे धनी सदाशिवभाऊवर ही मोहिम सोपवण्यात आली. १६ मार्च १७६० रोजी सदाशिवभाऊ प्रचंड फौज घेऊन उत्तरेकडे  रवाना झाले. त्यांच्यासमवेत नानासाहेब  पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र विश्वासराव , बळवंतराव मेहेंदळे , विठ्ठल  शिवदेव ,समशेर बहाद्दर ,यशवंतराव  पवार ,अंताजी माणकेश्वर , दमाजी गायकवाड  , नाना फडवणीस  इत्यादी  मातब्बर मंडळी होते. सदाशिवभाऊ बरोबरच  २२००० अश्वदळ , ८००० पायदळ , आणि  इब्राहिमखान गारदीच्या उत्कृष्ट  तोफखाना होता.१८ जून रोजी मल्हारराव होळकर भाऊंना येऊन मिळाले. सदाशिवभाऊ रस्त्यावर येणाऱ्या  सर्व भारतीय राजांना मदतीसाठी  भेटू लागले. सुरजमल जाट आपले पूर्वीचे वैर विसरुन मदत करण्यास तयार झाला. १४ जुलै भाऊ आग्याला पोहचले. २ अॉगस्ट १६६० मध्ये भाऊंनी दिल्लीवर विजय मिळवला.  अब्दालीच्या सैन्याचा धीर खचला. भाऊबरोबर तहाची बोलणी सुरु केली. मात्र नजीबखानाने अब्दालीला मराठ्यांचा पराभव होईपर्यंत  लढा चालू ठेवण्याची विनंती केली. अब्दालीचे सैन्य व भाऊंच्या सैन्यामध्ये  यमुनानदीचे भव्य पात्र होते.    भाऊनी दिल्लीत दोन महिने मुक्काम  केला.  अयोध्येचा नवाब शुजा उद्दौलाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न  भाऊंनी केला.  मात्र नजीबखानाने इस्लाम खतरेमें हे चा नारा देऊन शुजा उद्दौलाला आपल्याकडे ओढून घेतले. सुरजमल जाट व मराठ्यांमध्ये मतभेद  होऊन तो ही  आपल्या  प्रांतात निघून गेला. भाऊंनी दिल्ली सोडून कुंजपु-याकडे कूच केली. १७ अॉक्टोबर १७६० रोजी त्याने कुंजपुरा जिंकून घेतला. त्यावेळी दत्ताजींना ठार मारणारा कुत्बशहा मराठ्यांच्या हाती लागला. त्याला ठार मारुन दत्ताजींचा बदला घेण्यात आला. त्यावेळी अब्दालीची एक मोठी तुकडी  मराठ्यांनी कापून काढली. कुंजपु-याला भरपूर  धान्यगोटा व संपत्ती  मिळाली. इकडे अचानक  अब्दालीने यमुना नदी ओलांडली .त्याने  मराठ्यांचा रसदपुरवठा बंद केला. भाऊनी शिखांची मदत घेण्याचे ठरवले होते. मात्र शत्रु आता अगदी समोर येऊन उभा राहिला. सुमारे दोन महिने अब्दाली व भाऊंचे सैन्य समोरासमर उभे होते. या दरम्यान  अनेक  चकमकी झाल्या. त्यावेळी अब्दालीने पंजाबपर्यत आमचे राज्य व पुढे तुमचे हा प्रस्ताव भाऊसमोर ठेवला. मात्र पूर्ण हिंदुस्थान  आमचा आहे. थेट अटक ते कटक पर्यत असा निरोप  भाऊंनी पाठवला. त्यामुळे शेवटी युद्धशिवाय पर्याय उरला नाही.  दरम्यान  मराठ्यांजवळील धान्याचा साठा संपुष्टात  आल्याने उपासमार होऊ लागली .  शेवटी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यत लढण्याचा निर्णय  घेऊन सदाशिवभाऊंनी १४ जानेवारी  १७६१ रोजी अब्दालीच्या सैन्यावर तुटून पडण्याचा निर्णय घेतला.  सदाशिवभाऊंनी युध्दाची रचना केली. चारीबाजूनी इब्राहिमखान गारदीचा तोफखाना तसेच बंदूकधारी  , घौडदळ 'पायदळ  तलावारबाज  व मधल्या मोकळ्या भागात बिनलढाऊ सैन्य अशी रचना केली.  अब्दालीने आपल्या सैन्याची रचना अर्धवर्तुळाकार केली. इब्राहिमखान गारदीच्या पाहिल्या तोफाच्या तडाख्यात ९००० रोहिले गारद झाले. अब्दालीच्या सैन्याला खिंडार पडले.  त्यांचे सैन्य सैरावैरा पळू लागले. साधारणतः  सकाळी ९.०० वाजता सुरु झालेल्या युध्दात दुपारी २.०० वाजेपर्यंत  मराठ्यांची सर्व ठिकाणी सरशी होत होती.  मात्र पुढे अचानक  हत्तीवर बसलेल्या  विश्वासरावांना गोळी लागली .ते खाली पडले. हे पाहू मराठा सैन्याचे धैर्य  हरपले. मराठा सैन्याला प्रोत्साहन  देण्यासाठी  सदाशिवभाऊ हत्तीवरुन उतरले व घोड्यावर बसले . त्याच वेळी  अब्दालींने आपले १०००० कडवे राखीव सैन्य मैदानात उतरवले.  युध्दात हजर असलेला काशीराज लिहितो की," इतक्या निकराने युद्ध  झाले की, आकाश आणि  पृथ्वी  दिसेनाशी झाली ; "मनाजिल अल्फतुह " चा लेख महंमद जाफर  शाम्लू लिहितो ," सुरुवातीला भाऊ आणि  विश्वासराव  यांनी  इतके मोठे हल्ले केले की, अहमदशहाला आपला निभाव लागणार नाही असे वाटले......

क्रमशः 


--- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड 


संदर्भ -मराठ्यांचा इतिहास  खंड -२


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...