मराठेशाहीतील वाठार निंबाळकर घराणे
पोस्तसांभार :: सुरेश नारायण शिंदे
कुशाजी द्रव्यसंपन्न झाल्यावर आपल्या पूर्वजांच्या वैभवाची स्मृती जागृत झाली व म्हाकोजीच्या वेडसरपणामुळे घराण्यास प्राप्त झालेली हीनकळा दूर करण्यास सुरवात केली. धनसंपन्न झाल्यावर त्यांनी पेशवे सरकार, पंतसचीव व मातबर सरदारांना अनुकूल करून त्यांचा आश्रय संपादिला. कुशाजीच्या वारसदारांनी पुढेहि वैभवाची चढती कमान केल्याचे आढळून येते म्हणजेच इ.स.१८२२ मधे कुशाजीचा नातू जोत्याजीराव (आपाजीराव पुत्र) याने दिवाळीस वाठारकर निंबाळकर घराण्याचा शिलकेचा आढावा घेतला होता, त्यात २,४८,६१,५५,४७२ ( दोन अब्ज अठ्ठेचाळीस कोटी एकसष्ट लाख पंचावन हजार चारशे बहात्तर रुपये व दोन आणे ) शिल्लक असल्याचे नमुद केले आहे. मूळच्या वाठार गावाशेजारीच कुशाजींनी नवीन वाठार निर्माण केले. छत्रपति शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडात मराठा साम्राज्य म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ भट पेशवे यांच्यानंतर पेशवेपदी पहिले बाजीराव बाळाजी हे छत्रपतिंनी नियुक्त केले तोपर्यंत ते सासवड येथे राहत होते. गावे व शहरे यांना भव्य व सुंदर इमारतीशिवाय प्रतिष्ठा नाही अशी समाज मनाची ठाम धारणा होती. इ.स.१७२९ मधे पहिले बाजीराव पेशव्यांनी पुण्यात शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू करून महाराष्ट्रातील अतिशय टोलेजंग व देखणी वास्तू उभी केली. महाराष्ट्रातील सामान्य रयत शिवकाळापासून औत सोडून राऊत झाली होती ती पेशवाईत मुलुखगिरी करून धनसंपन्न होऊ लागली. आर्थिक संपन्नता आल्याने वाडे, मजबूत घरे, देखणी देवालये व नद्यांना प्रेक्षणीय घाट बांधले गेले की, त्यामुळे अखिल महाराष्ट्र नव्याने बांधून निघाला असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. हे जे चैतन्य व उत्साह समाजात निर्माण झाला त्याला सरदार व सावकार हे अपवाद कसे असतील? आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुशाजीराव नाईक निंबाळकर हे होय. त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी भुईकोट किल्ल्यासम दक्षिणोत्तर असलेला व मुख्य प्रवेशद्वार उत्तरेला असलेला टोलेजंग वाडा बांधला. यावाड्याच्या अंतर्गत भागात आपल्या नऊ मुलांच्या कुटुंबाची स्वतंत्र राहण्याची कल्पक योजना केली होती. वाड्याचे अंतर्गत क्षेत्रफळ अतिशय विशाल असून सभोवती सुमारे ५० फूट उंचीची व १२ -१५ फूट रूंदीची संरक्षक तटबंदी आहे. या वाड्याच्या तटबंदीत सुमारे ७५ फूट परिघाचे ९ बुरूज आहेत. बुरूजाचा खालचा भाग हा काळ्या पाषाणाचा असून वरील ५|६ फूटातील बांधकाम भाजक्या विटा व चुन्याच्या बांधकामातील आहे. आक्रमक शत्रूला लांबून व जवळून टिपण्यासाठी बुरूजावर रंदे बांधलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराचे घडीव दगडी बांधकाम चुण्याच्या मिश्रणात केले असून ते पाहताना आपल्या लक्षात देखील येत नाही. मुख्य दरवाजाचे आतील बाजूला पाच खणी तीन मजली इमारत बांधलेली होती, तिच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील दिवाणखाने प्रेक्षणीय होते. विशेषतः दुसऱ्या मजल्यावरील दिवाणखान्यात महिरपी कमानी कोरलेल्या होत्या, तर छतावर हस्तिदंती चिपा बसविल्याने छताचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसायचे. हे छत पाहताना रंगीबेरंगी फुलांचा गालिचा असल्याचा नक्कीच भास होत होता. ह्या वाड्याच्या बांधकामातील सागवानी लाकडे शिरवळ येथून आणण्यात आली होती. हा वाडा कुशाजीने आपल्या नऊ मुलांसाठी बांधला असल्याने यास समाईक वाडा हे संबोधन मिळाले. ह्यात जामदारखाना असून त्याकरिता तळघराची व्यवस्था होती. वाड्यातील मुख्य दरवाजावरील नगारखान्यात प्रत्येक तासाला घंटा वाजविण्यात येत असे. वाड्याचा दरवाजा वेशीचे दारासमोर एखाद्या किल्ल्याला ज्याप्रमाणे पुढे भिंत बांधून, त्याच्या शेजारून रस्ता ठेवलेला होता. मुख्य दरवाजाच्या देवडीवर पाहारा देण्यासाठी अरब शिपायांची नियुक्ती असायची व या शिपायांना तेथे राहण्याची सोय देखील केलेली होती. या वाड्याच्या बाहेरील चोहोबाजूने सुमारे ३०० फूटाचे आवार आत ठेवून दुसरा कोट बांधला आहे. त्यास दोन मुख्य दरवाजांना वेशी म्हणण्याचा प्रघात होता. हे दोन्ही दरवाजे सुमारे ५०|६० फूट उंचीचे व भक्कम सागवाणी लाकडाचे होते. जरी खवळलेला हत्तीने जोराची धडक दिली तरी दरवाजा उघडू शकणार नाही असे होते. या वाड्याचे बांधकाम इ.स.१७९६ ते १८०५ पर्यंत सुरू होते तर यासाठी सुमारे एक कोट रुपये इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे. ह्या वाड्याखेरीज नऊ मुलांसाठी स्वतंत्र नऊ वाडे देखील बांधण्यात आले होते.
No comments:
Post a Comment