विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

प्रतापसुर्य थोरले बाजीराव....

 

प्रतापसुर्य थोरले बाजीराव....

"घोडदळाचा देवदत्त सेनानी "


 १८ अॉगस्ट १७००"श्रीमंत बाजीराव पेशव्यांची" ३२१ वी जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.....


     भारताच्या  श्रेष्ठ  सेनानी मध्ये श्रीमंत  बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घेतले जाते.बाजीरावांनी आपल्या  उण्यापु-या ४० वर्षा आयुष्यात  अतुल पराक्रम  गाजवला. १७२० मध्ये पेशवाईची  मोठी जबाबदारी  बाजीरावांनी आपल्या  खांद्यावर  घेतली. आणि  त्याच्या  मृत्यूपर्यत म्हणजे  २५ एप्रिल  १७४० पर्यत अनेक  लढाया त्यांनी  केल्या. बाजीरावांच्या घौडदौडीचा पल्ला नि क्षेत्र  किती दुरवरचे होते. याचा थोडक्यात  आढावा घेतला तर दक्षिणेस  श्रीरंगपट्टण ते उत्तरेस  दिल्ली आणि  पश्चिमेस सुरत -बडोदा ते पूर्वस बुंदेलखंडातील जैतपूर पर्यत क्षेत्र  बाजीरावांनी आपला  दबदबा निर्माण  केला. नीरा , भीमा , कृष्णा  , गोदा , पूर्णा ,मांजरा ,तुंगभद्रा , तापी , नर्मदा , चंबळ , यमुना इत्यादी  नद्यांचे पाणी त्यांच्या  घोडदळाने मनःपूत चाखले. थोडक्यात  त्यांच्या लढाईतील सक्सेस रेट १००% होता. वेगवान हालचाल ही बाजीरावांची ओळख होती. विशेष म्हणजे  सैन्याच्या सर्वात पुढे बाजीरावांचा घोडा असे.  हा धाडसीपणा बाजीरावांनामध्ये होता.शत्रू  सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी  काही  झडप घालायची की त्याला सावरुन प्रतिकार करायला वेळच मिळायला नको. आपण" मैदानी  लढाई "लढून जिंकू शकतो हा आत्मविश्वास  मराठी सैन्यामध्ये निर्माण  करण्यास बाजीरावांचे युद्धकौशल्य कारणीभूत  आहे.  थोरले बाजीरावांचा  जन्म  १८ अॉगस्ट १७०० मध्ये झाला. त्यांचे मुळ नाव "विसाजी" होते. बाजीरावांनी वयाच्या  ११ व्या वर्षीच दिल्ली पाहिली होती.  सर्व हिंदुस्थानात  त्यांनी  आपल्या  नजरेत भरुन घेतला. त्यांनी  गाजवलेल्या मोहिमा लोकांना  परिचित नाहीत. इतिहासकारांनी जाणीवपूर्वक  दुर्लक्षित केल्या दिसतात. शालेय पुस्तकातच आजही  फारच त्रोटक  माहिती  बाजीरावांबाबत दिली आहे.  त्यांचे कारण इतिहासात राजकारण होय.त्यामुळे जो जिज्ञासू वाचक स्वतःहून बाजीरावांबाबत जाणुन घेतो त्यांना  बाजीरावांचा पराक्रम समजतो.  बाजीराव दिसायला कसे होते ?त्यांचे जीवन कसे होते ? याबाबत काही माहिती सखोल वाचनाने इतिहासात  मिळते. ती अशी ,बाजीराव हे ६ फूट उंच होते. उंचीबरोबरच त्यांचे हातही बरेच लांब होते. भक्कम  पीळदार शरीरयष्टी , तांबूस गौरवर्ण ,निकोप प्रकृती , तेजस्वी   कांती , न्यायनिष्ठुर स्वभाव असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने  कोणावरही त्यांची सहज छाप पडे.भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता.स्वतः  बाजीराव पांढरे किंवा  फिकट रंगाचे कपडे वापरीत. स्वतःची कामे शक्यतो  स्वतः  करण्यावर त्यांचा भार होता. नोकरावाचून त्यांचे काम  अडत नसे. त्यांचे खासगी ४ घोड्याचा उल्लेख  मिळतो.निळा , गंगा , सारंगा आणि  अबलख हे त्यांची नावे. ते त्यांचे दाणावैरण पाणी स्वतः  बघत असे. खोटेपणा , अन्याय ,ऐषआराम त्यांना  अजिबात खपत नसे.उभे सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. बाजीरावांनी पुण्याला शनिवारवाडा बांधून  घेतला. पण निवांतपणा त्यांच्या कधीही नशीबातच नव्हता. मोहम्मद खान बंशष हा बुंदेलखंडात चालून आला. तेव्हा  छत्रसाल राजाने बाजीरावांना मदतीसाठी पत्र लिहिले होते. त्यांत छत्रसाल लिहितो " जो गति ग्राह गजेंद्र की से गति भई जानहू  आज !! बाजी  यात बुंदेल की राखो बाजी लाज !!  हे पत्र मिळताच लगोलग बाजीरावाने बुंदेलखंड गाठले. महंमहखान बंगषचा दारुण  पराभव केला. उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका होता. मेवाडचे राज्यांशी स्वतःच्या सिंहासनावर बाजीरावांना बसण्याची  विनंती केल्यावर त्या सिंहासनाला नमन करुन बाजीराव म्हणाले ,"या सिंहासनावर महाराणाप्रतापसिंग बसले होते. ते आमच्यासाठी पूज्य आहेत. आम्ही या सिंहासनावर बसणार नाही. "  यावरुन आखिल भारतावर डंका असलेल्या बाजीरावांच्या वागण्यातील नम्रपणा खरोखरच  त्यांच्या मोठेपणाचे दर्शन देते.आपल्या  ४० वर्षाच्या जीवनात ४७ लढाया जिंकलेल्या बाजीरावा हे अपराजित सेनापती  होते. त्यामुळे बाजीरावांची प्रशस्ती करणाऱ्या  इतिहासाचार्य सर जदुनाथ सरकारांनी त्यांना  "घोडदळाचा देवदत्त सेनानी " बिरुदे  सार्थ वाटते. नेपोलियनने मातीतून मार्शल्स निर्माण  केले होते. त्याच्या आधी पाऊणशे वर्षै बाजीरावांनी अशीच किमया घडवून आणली. बाजीरावांनी अठरापगड जातीतून अनेक  गुणी सरदारांची निर्मिती  केली.  त्यामुळे  मराठी साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले.  एवढेच नव्हे मराठा साम्राज्याच्या भितीने कलकत्ता येथे ब्रिटिशांनी मोठे खंदक खोदून ठेवले होते. कविवर्य केशवसुतांनी "दोन बाजी " या कवितेत बाजीरावांचा महिमा सार्थपणे वर्णिला आहे.


त्या शूराने भगवा झेंडा हिंदुस्थानी नाचविला ,

 निज राष्ट्रांचे वैभव  नेले एकसारखे बढतीला , 

जिकडे तिकडे  समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली 

खूप -शर्तीने कदर आपली गनीमांस त्या लावियली

,गुणी जनांची पारख करुनी त्या धीराने गौरविले ,

 उत्साहाच्या वाते अपुल्या तेज तयांचे चेतविले 


,प्रतापदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी ,

 गनीममशके कितीक गेली तिच्यामध्ये खाक होवोनी !निजनामाचा "गाजी" ऐसा अर्थ उरवुनी तो गेला.

 तर हळहळली आर्यमाउली एकुनि त्याच्या निधनाला..

अशा या शूर-वीराचा मृत्यू  २८ एप्रिल  १७४० मध्ये झाला.


--- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड


संदर्भ -

1.प्रतापी बाजीराव - श्री.म.दिक्षित

 2 प्रतापसुर्य बाजीराव - प्र.के .घाणेकर

3.मराठ्यांचा इतिहास भाग -2

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...