विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

बचेंगे तो और लढेगें

 "हाँ , बचेंगे तो और भी लढेंगे !"...

१० जानेवारी १७६०


        मराठा साम्राज्याचा भगवा अटकेपार फडकला. पुढे मराठ्यानी पेशावरपर्यत मोहिम काढली. रघुनाथराव  पेशवे दक्षिणेस परत आल्यावर  नानासाहेब पेशव्यांनी पंजाबची व्यवस्था  लावण्याची जबाबदारी  दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्यावर सोपवली. दत्ताजी शिंदे हे राणोजी शिंदेचे दुसरे पुत्र तर जनकोजी शिंदे हे दत्ताजी शिंदेचे बंधू जयप्पा  शिंदे यांचे पुत्र होय. या काका -पुतण्यांचे शौर्याबाबत वाचले तर अंगावर  अक्षरशः  शहारे येतात. राजस्थानच्या मेवाड इतिहासातील गोरा व बादल या वीरांची आठवण होते. असाच यांचा पराक्रम  होता.  या दोन वीरांवर उत्तरेची सर्व व्यवस्था  लावण्याची  जबाबदारी  नानासाहेब  पेशव्यांनी  सोपवली होती. त्यांत १. पंजाबची व्यवस्था  लावणे.२.काशी व प्रयाग हे तीर्थक्षेत्र मुक्त करणे. ३.शुजा उद्दौलाशी हातमिळवणी करुन बंगाल प्रांतावर वर्चस्व  प्रस्थापित  करणे. व सर्वात महत्त्वाचे  म्हणजे  रोहिला नजीबखानाचे पारिपत्य करणे.  नजीबखानाबाबत नानासाहेब  आपल्या  पत्रात लिहितात ," नजीबखान  दिल्लीत प्रविष्ट जालिया अब्दालीचेच दिल्लीत ठाणे बसलेसे जाणावे. नजीबखान बेमान आहे.त्यास वाढवणे सर्पास दूध पाजण्याप्रमाणे आहे. फावले मानी त्याचे पारिपत्य करावे....." त्याप्रमाणे  हे दोन वीर  आपले कार्य मोठ्या   निष्ठेने करत होते.जनकोजी शिंदेनी राजपुतानातून चौथाई वसूल करुन डिसेंबर  १७५८ मध्ये दिल्लीवर चाल केली.त्यांनी गाजीउद्दीन या वजीराला शरण येण्यास भाग पाडले. दत्ताजी शिंदे दिल्लीला आपल्या  पुतण्यास येऊ मिळाले . फेब्रुवारी  १७५९ मध्ये आदिना बेगचा पुत्र दत्ताजींना सतलजच्या काठी "माचीवारा"येथे भेटला. व त्यांने शिंदेना  चौथाई दिली.दत्ताजींनी साबाजी शिंदे यांची पंजाबवर रवानगी  केली. व स्वतः  दत्ताजी शिंदे नजीबखानाचे पारिपत्य करण्यासाठी  निघाले. दत्ताजींच्या हालचालीकडे  नजीबखानाची काकदृष्टी होती.त्याने शुक्रताल याठिकाणी  आश्रय घेतला.  इकडे दत्ताजींशी नजीबखानाने वाटाघाटीचे नाटक चालू ठेवले.आणि  अफगाणचा  बादशहा  अब्दालीशी मदत करण्याचि विनंती केली. हा संदेश मिळताच अब्दाली  पुन्हा  भारतावर चालून आला. मराठ्यांचे शुक्रताल येथे नजीबशी छोटी  चकमक झाली. नजीबला अब्दाली येईपर्यंत  हा लढा पुढे रेटायचा होता. तिकडे अब्दाली पंजाबजवळ सिंधू ,सतजल या नद्या ओलांडून  पंजाबात आला. साबाजी शिंदेंचा पराभव  करुन तो पुढे आला. ही बातमी दत्ताजी शिंदे यांना मिळाली. इकडे दत्ताजींना त्वरीत मदतीला जावे, म्हणून  नानासाहेबांनी मल्हारराव होळकरांना पत्र पाठवले. मात्र  मल्हारराव होळकर  व जनकोजी शिंदे यांची त्वरीत मदत दत्ताजींना मिळाली नाही. तरी कोणतीही  तमा न बाळगता दत्ताजींनी शुक्रतालचा वेढा उठवून अब्दालीवर हल्ला  करण्याचे  ठरवले. त्याप्रमाणे  १० जानेवारी  १७६० रोजी बुराडी घाटाजवळ अब्दालीचे सैन्य यमुना ओलांडत असताना  दत्ताजींने हल्ला चढवला. जोरदार लढाई सुरु झाली. दत्ताजींनी असामान्य  शौर्य  गाजवले.  परंतु  या लढाईत दत्ताजींना गोळी लागली. ते रणांगणावर घायाळ होऊन कोसळले. त्यावेळी नजीबखानाचा सल्लागार  कुतुबशाह  हत्तीवरुन उतरुन घायाळ झालेल्या दत्ताजींजवळ आला. आणि  दत्ताजींना विचारले ," क्यों पाटील जी , हमारे साथ तुम और भी लढेंगे?" दत्ताजी जबर घायाळ अवस्थेत  होते.पण कुतुबशाहाचे शब्द ऐकताच त्यांनी बाणेदार उत्तर दिले, "हाँ , बचेंगे तो और भी लढेंगे !" अखेर रणांगणावर  दत्ताजीस वीरमरण आले. 


---- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड

संदर्भ -१) मराठ्यांचा इतिहास खंड -2 - अ.र.कुलकर्णी 

         २) पेशवे घराण्यांचा इतिहास  -प्रमोद  ओक

       ३) पेशवाई - सुवर्ण पान - कौस्तुभ कस्तुरे


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...