हुतात्मा बाबू गेनू
१२ डिसेंबर त्यांचा स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
भारतीय स्वातंत्र्याच्या स्वदेशी चळवळीत ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देणारा पहिला हुतात्मा म्हणजे बाबू गेनू होय.एक गरीब शेतकऱ्यांचा मुलगा ते मुंबईतील गिरणी कामगार असलेला बाबू गेनू हा स्वदेशी चळवळीने भारावलेला होता. भारतात" तोडा फोडा व राज्य करा " या वृत्तीने ब्रिटिशांनी १९०५ मध्ये बंगालची फाळणी केली. या फाळणीविरोधात लोकमान्य टिळकांनी स्वदेशी व बहिष्कार या आपल्या चतुःसुत्रीचा दोन आयुधांचा वापर मोठ्या कौशल्याने केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिली परदेशी कापडाची होळी भारतात केली. त्यानंतर या स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली होती. टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधीनी या चळवळीचे नेतृत्व केले. १९३० मध्ये ही चळवळ चांगली जोर धरु लागली होती. याच काळात बाबू गेनू यांनी या चळवळीत हिरहिरीने भाग घेतला. बाबू गेनू यांचा जन्म २ जाने १९०८ मध्ये महाळुंगे पडवळ ता- आंबेगाव जि-पुणे येथे झाला. त्यांचे वडील कृष्णाजी सैद एक गरीब शेतकरी होते. वडीलांचे लवकरच निधन झाल्यावर त्यांची आई बाबू यांना मुंबईत घेऊन आले. त्याठिकाणी बाबू गेनू लहानाचे मोठे झाले. घरात प्रचंड दारिद्रय होते. बाबू गेनूचे शिक्षण झाले नाही. मात्र त्यांच्या संवेदनशिल मनाने त्यांना अनुभवांच्या शाळेत खूप काही शिकवले. मुंबईच्या गिरणीत काम करत असताना बाबू गेनू यांनी स्वदेशी चळवळीत भाग घेतला. त्याच्या पथकांचे नाव "तानाजी पथक" होते. बाबू गेनूवर सरदार भगतसिंग यांच्या विचारांचा प्रभाव होता. मात्र महात्मा गांधीच्या अहिंसक चळवळीच्या मार्गावर देशाला स्वातंत्र्य मिळेल यावर विश्वास होता. डिसेंबर १९३० मध्ये परदेशी कपड्यांची होळी व स्वदेशीचा वापर ही चळवळ मुंबईत मोठ्या प्रमाणात राबवली जात होती. भारतातून कच्चामाल परदेशात पाठवून भारतात पक्का माल आणून ब्रिटिश भारतीयांची आर्थिक लूट करत होते यावर उत्तर म्हणजे बाबू गेनूच्या नेतृत्वाखाली त्यांच्या तानाजी पथकाने परदेशी कापडची ट्रक अडवली. तो दिवस होता १२ डिसेंबर १९३० काळबादेवीच्या मुळजी जेठा मार्केट मधून परदेशी माल ट्रकमधून जात होते. बाबू गेनू या ट्रकसमोर आडवे झाले.चालक भारतीय होता तो ट्रक चालविण्यास तयार नव्हता. मात्र गोरा पोलिस सार्जंट चिडला. त्याने स्वतः ट्रक चालविण्यास घेतली. बाबू गेनू घाबरला नाही. तो ट्रेक समोर झोपला. त्या निदर्यी सार्जंटने ट्रक बाबू गेनूच्या अंगावरुन नेली. बाबू गेनूच्या मेंदूला मोठी इजा झाली. त्यांत पुढे त्यांचे निधन झाले. बाबू गेनू यांचे निधन वयाच्या फक्त २२ व्या वर्षी झाले तो दिवस होता १२ डिसेंबर १९३० आत्मनिर्भर भारतासाठी प्राण दिलेला पहिला हा भारतीय म्हणजे हुतात्मा बाबू गेनू ....आज त्यांचा स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
---- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment