१८१७ च्या होळकर-इंग्रज लढाईतील शहीद स्त्रीरत्न तुळसाराणी होळकर
तुळसाराणी होळकर
होळकरशाहीचे पहिले महाराजा यशवंतराजे होळकर यांना एकूण चार पत्नी होत. त्यापैकी एक तुळसाराणी होळकर. तुळसाराणी या महानुभाव संप्रदायाच्या व मुळच्या जेजुरी येथील होत्या. हा त्या काळातील एक अतुलनीय असा आंतरजातीय प्रेमविवाह होता. यशवंतराव यांच्या शासनकाळात सन १८०७-१८११ व यशवंतरावांच्या मृत्यू नंतर त्यांचे पुत्र मल्हारराव(दुसरे) या वय वर्ष ६ असणाऱ्या मुलाला होळकर गादीवर बसवुन त्याच्या तर्फे रिजंट महाराणी म्हणून तुळसाराणी राज्यकारभार पाहु लागल्या.
यशवंतरावांच्या मृत्युपासून ते १८१७ पर्यंत यशवंतरावांची दृष्टी ठेवत इंग्रजांना होळकरी राज्यात पाय ठेवू न देण्याची त्यांनी दक्षता घेतली. मल्हाररावांचा रिजंट म्हणून तुळसाराणींनी काम पहायला सुरुवात केली. तुळसाराणी यांनी मराठा राजमंडळात राहुन ब्रिटिशांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पेशव्यांच्या दरबारी वकील पाठवून आपल्या तयारीची माहिती ही दिली होती. तुळसाराणी ला हटवल्याखेरीज होळकरी राज्य इंग्रजांना ताब्यात घेता येणार नव्हते. होळकरांची फौज बलाढ्य होती आणि यशवंतरावांनी ती प्रशिक्षीतही केली होती. त्यामुळे तुळसाराणी विरुद्ध इंग्रजांनी हळूहळू कटकारस्थाने सुरु केली. बदनामी करुनही कोणी बधत नाही म्हटल्यावर त्यांनी तुळसाराणीचा खून करायचे ठरवले.
गफुरखान हा आमिरखानाचा होळकरांच्या दरबारातील प्रतिनिधी व सख्खा मेहुणा होता. माल्कमने त्याला जाव-याची जागीर देण्याच्या बदल्यात विकत घेतले (९ नोव्हेंबर १७१७) आणि तुळसाराणी, मल्हारराव व अन्य होळकरी परिवाराला ठार करण्याचे कारस्थान रचले गेले. तुळसाराणी व मल्हारराव ठार झाल्यानंतर झपाट्याने हालचाल करून होळकर राज्य गिळंकृत करण्याचे त्यांचे धोरण होते. त्यानुसार गफुरखानाने संधी साधून तुळसाराणी व मल्हाररावांना अटक केली व त्यांना घेवुन जाव-याकडे निघाला. हत्याकांड होळकरी सीमेच्या बाहेर करावे अशी त्याची योजना असावी. पण यशवंतरावांचा विश्वासू सेनानी धर्मा कुंवरला हे कळताच त्याने गफुरखानाचा पाठलाग सुरु केला. गफुरखान व अमिरखानाशी त्याची लढाईही झाली, पण त्यात धर्माचा पराभव झाला. धर्माला शिरच्छेद करुन ठार मारण्यात आले. पण बोभाटा झाल्याने चित्र असे उभे केले गेले की जणू धर्मानेच तुळसाराणी व मल्हाररावाला अटक केली होती व गफुरखानानेच त्यांना सोडवले. हा बेत फसल्याने हत्याकांडाची योजना त्यांना थोडी पुढे ढकलावी लागली. ब्रिटिशांशी शिंद्यांनी जसा करार केला तसाच होळकरांनी ब्रिटिश सार्वभौमत्वाचा करार करावा असा माल्कमने लकडा लावला होता मात्र तुळसाराणी यांनी त्याला भिक घातली नाही.
मेजर माल्कम २६ नोव्हेंबर १८१७ रोजी तालेन येथे आपले सैन्य घेऊन आला. इंग्रजांच्या हालचालींची खबर लागल्याने तुळसाराणींने ही ब्रिटिशांशी युद्धाचा निर्णय घेतला. सरदार तात्या जोग यांना होळकरशाहीचे प्रमुख दिवाण पदी नेमले होते आणि तुळसाराणी यांच्या सवत कृष्णाबाई किंवा केसराबाई या किल्ले भानपुरा(मध्यप्रदेश) येथे राखीव लष्करी तुकडी बरोबर उपस्थित होत्या.. तुळसाराणी, मल्हारराव, सरदार हरिराव होळकर, सरदार तात्या जोग, भीमाबाई होळकर व सर्व होळकर सेनानी किल्ले अलोट हुन किल्ले महिदपुरकडे निघाले होते. गफूरखान तेवढा मागे राहिला होता. त्याचे सैन्य मात्र श्रीमंत महाराजा मल्हाररावांसोबत रवाना झाले होते. या वेळीस होळकरांकडे शंभर तोफा, पंधरा हजार घोडदळ व दहा हजारांचे प्रशिक्षित पायदळ होते. यामुळे माल्कम पुन्हा तुळसाराणी यांच्याशी तह करण्याच्या मागे लागला. १५ डिसेंबर रोजी होळकरांच्या तीन वकिलांशी त्याने वाटाघाटी करायचा निष्फळ प्रयत्न केला. या वाटाघाटीतुन काहीही निष्पन्न होत नाही हे लक्षात आल्यावर नेमके १९ डिसेंबर रोजीच त्यांनी वकिलांची परत रवानगी केली. कारण तुळसाबाई आहे तोवर आपला निभाव लागत नाही हे माल्कमच्या लक्षात आले होतेच आता खात्री पटली.
१९ डिसेंबर १७१७ ला दिवस मावळणींला आला होता म्हणून सारे होळकर सैन्य या दिवशी किल्ले महिंदपुर येथे मुक्कमी होते. वास्तविक होळकर सेन्य हे महाराष्ट्रात कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ ला होणाऱ्या तृतीय मराठा-इंग्रज युद्धात सामील होण्यासाठी निघाले होते मात्र इंग्रजांनी फुटीचा डाव आखला होता आणि गफुरखान हा घरचा भेदी गळाला लागला होता. त्याने ही संधी साधली. यासाठीच तो मागे राहिला होता. त्याने महालात अचानक तुळसाराणीना गुप्त निरोप धाडून क्षिप्रा नदीच्या गऊ घाटावर महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी एकटे यावे असे सांगितले. क्षिप्रा नदीच्या काठी श्रीमंत तुळसाराणी एकट्या आल्या व त्यांचा विश्वास घाताने तुरंत शिरच्छेद करुन ठार मारले.
दोन्ही सैन्य दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० डिसेंबरला एकमेकांना समोर लढाईला उभे राहिले. या लढाईत होळकर पराभूत झाले त्यांनतर किल्ले भानपुरा येथे असणाऱ्या कृष्णाबाई होळकर यांनी मल्हारराव होळकर(दुसरे) यांच्या वतीने सन १८१८ चा इंग्रजांबरोबर तह केला. तो “मंदोसौरचा तह” या नावाने ओळखला जातो. या तहानंतर कृष्णाबाई होळकर या भानपुरा हुन इंदोर येथे वास्तव्यास आल्या व त्यांनी पुन्हा इंदोरची राजधानी म्हणून घोषणा केली. तुळसाराणी होळकर यांच्या शरीराचे काही तुकडे महिंदपुर पासून काही अंतरावर क्षिप्रा नदीकाठी असणाऱ्या गावी सापडले. त्यांनतर ते महिंदपुर येथे आण्यात आले व त्या ठिकाणीच त्यांची समाधी बांधण्यात आली. त्या समाधीचा निर्माण तत्कालीन होळकर राज्याची रिजंट महाराणी कृष्णाबाई उर्फ केसराबाई होळकर यांनी केला.
No comments:
Post a Comment