पुणे जिल्ह्यातील पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सासवड या तालुक्याच्या गावी अनेक ऐतिहासिक व्यक्तींची स्मृतीचिन्हे पहावयास मिळतात. त्यातलाच सासवडच्या थोड्या बाहेरच हा वाडा आपल्या चिरेबंदी जोत्यांवर सध्या एक मजला घेऊन निवांत उभा आहे. पूर्वी वाडा दोनमजली होता. त्या वेळी त्याचा डौल कसा असेल याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. वाड्याचा दिंडी दरवाजा सुद्धा तोलामोलाचा, भव्य दणकट आणि रेखीवसुद्धा!
हा वाडा मोडवेकर पुरंदऱ्यांनी बांधला असावा असे मानले जाते. 'लोकरस' उर्फ 'वाघ' पुरंदरे हे इ.स. १७०० पर्यंत पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. हे घराणे सासवडला स्थायिक झाले. पुढे त्यांच्या दोन शाखा झाल्या. त्यांपैकी अबाजी त्र्यंबक यांना 'सुपे' व त्यांचे बंधू तुको त्र्यंबक यांना मोडवे हे गाव मिळाले. त्यांनी त्या ठिकाणी वस्ती केली व वाडे बांधले. उपरोक्त वरील 'सरकारवाडा' म्हणून ओळखला जाणारा वाडा त्यांच्या पुत्रांनी बांधला असावा. जिंजीच्या वेढ्यात सेनापती धनाजी जाधवांच्या सैन्यात तुकोपंत यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना सुपे आणि ब्राम्हणी ही दोन गावे इनाम म्हणून मिळाली. सेनापती धनाजी जाधव यांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती.
नंतर हा वाडा दुसरा बाजीराव पेशवा यांनी आपल्या ताब्यात घेतला. नंतर पेशवाईचा अस्त झाला. इंग्रजांनी शनिवारवाडा ताब्यात घेतला व त्यानंतर हा वाडा सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला. संपूर्ण देशात इंग्रजी अंमल सुरु झाला. पूर्वीची प्रशासकीय व्यवस्था त्यांनी बदलली. प्रांताला गव्हर्नर, जिल्ह्याला कलेक्टर व तालुक्याला मामलतदार किंवा तहसीलदार असे अधिकारी नेमले गेले. पुरंदर तालुक्याचे मुख्यालय सासवड हे झाले व त्या ठिकाणी मामलेदार (तहसीलदार) कचेरी निर्माण झाली. ही कचेरी तेव्हापासून आजमितीपर्यंत या वाड्यात चालू आहे.
(संदर्भ - महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग २)
-सरकारवाडा
(तहसिलदार कार्यालय पुरंदर)
सासवड, पुणे.
No comments:
Post a Comment