( महत्वाची सूचना: हा लेख पूर्णतः हैद्राबादच्या निजामाच्या काळातील घटनांवर आधारित आहे. वर्तमानातील कुठल्याही जाती धर्मांशी आणि घटनांशी ह्या लेखाचा कुठलाही संबंध नाही. )
बऱ्याच जणांना हैद्राबाचा निजाम हे नेमके काय प्रकरण आहे हे नीट असे माहीत नाही. बऱ्याच जणांना हैदराबादचे निजाम हे फारच धर्म सहिष्णू होते असेही वाटते.
पण सत्यता खरच अशी होती का? चला पाहुयात..
सुरवातीला लेखात आपण ह्या हैद्राबादच्या निजामाची अत्यंत सोप्या भाषेत माहिती समजावून घेऊ.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाच्या पडत्या काळात 'मीर क़मर-उद-दीन सिद्दीकीने' ज्याला 'असफजहा' असेही म्हणतात हा दिल्लीच्या मुघल बादशाचा वजीर होता.
१७१३ ते १७२१ ह्या काळात हा मुघल साम्राज्याचा दक्खनचा सुभेदार होता. १७२४ मध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाच्या पडत्या काळात दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून हा दक्षिणेत आला.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७ वर्षांनी म्हणजे इसवीसन १७२४ मध्ये साखरखेड्याच्या लढाईत स्वतःच्याच मुबाजीरखान ह्या मुघल सेनापतीचा पराभव करून 'निजाम उल मुल्क असफजहा पहिला' याने स्वतःच्या हैद्राबाद राज्याची स्थापना केली. ह्या हैद्राबाद राज्याचा विस्तार हा आजच्या आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागात होता.
हा निजाम उल मुल्क अत्यंत धूर्त आणि धोरणी असल्याने ह्याने परधर्म सहिष्णुतेचे धोरण अंगिकारले आणि सर्व धर्मियांचा पाठिंबा मिळवून आपली सत्ता बळकट करून स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
निज़ाम-उल-मुल्क ह्याला संक्षिप्त मध्ये 'निजाम' असे म्हंटले जाते. निजाम शब्दाचा उर्दू भाषेत अर्थ होतो क्षेत्र प्रशासक. हैद्राबादच्या सर्व शासकांचा निजाम हा शब्द लावून उल्लेख केला जातो. ह्यालाच आसफ़ जाही राजवंश असेही म्हणतात.
२१ मे १७४८ मध्ये ह्या निजाम उल मुल्क चे निधन झाले.
ह्याच्या मृत्यू नंतर पुढे चौदा वर्ष गादीवर कोणी बसायचे ह्यासाठी सत्ता स्पर्धा सुरु होती.
शेवटी ह्या स्पर्धेतून १७६२ मध्ये निजाम अली हा सत्ताधीश झाला.
ह्या निजाम अलीने १८०३ पर्यंत राज्य केले.
त्या नंतर ह्या निजाम अलीचा मुलगा सिकंदरजहाँ हा हैद्राबादचा राजा झाला. ह्याचा कार्यकाळ हा १८०३ ते १८२९ असा होता. ह्या सिकंदरजहाँ च्या काळात त्याच्या राज्यकारभाराची सगळी सूत्रे हि राजा चंदुलाल
नावाच्या मंत्र्याकडे असल्याने परधर्म सहिष्णुता कायम राहिली.
सिकंदरजहाँ नंतर नासिर उद्ददौला हा गादीवर बसला.
नासिर उद्ददौला नंतर अफजल उद्ददौला हा गादीवर बसला.
अफजल उद्ददौला नंतर मीर मेहबूब अली खान हा गादीवर बसला.
आता महत्वाचे:
ह्या मीर मेहबूब अलीखान च्या काळात त्याच्या राज्याचा पंतप्रधान हा 'सालारजंग' म्हणून होता. ह्या सालारजंगने हैद्राबाद संस्थानात प्रशासनिक सुधारणा करून उत्तर हिंदुस्थानातून बरेच विद्वान आणि तज्ज्ञ लोक हैद्राबादला आणले. ह्यात बरेच मुस्लिम होते.
गादीवर बसल्यावर सुरवातीस ह्या निझाम मीर मेहबूब अलीखानाने "धार्मिक बाबतीत उदार धोरण अवलंबिले जाईल" अशी घोषणा केली.
धार्मिक श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही सक्ती केली जाणार नाही आणि तुमच्यासाठी तुमचा धर्म आणि आमच्यासाठी आमचा धर्म असे उदार धार्मिक धोरण त्याने अवलंबिले.
पण हे धोरण फसवे होते.
पुढच्या १५ वर्षातच ह्या मीर मेहबूब अलीखानने आपले धार्मिक सहिष्णू धोरण बदलायला सुरवात केली.
इसवीसन १८८५ मध्ये दसरा आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच दिवशी आले.
हिंदूंनी दसरा कसा साजरा करावा आणि कसा साजरा करू नये या संबंधी अत्यंत कडक नियम निजाम सरकारने जाहीर केले.
नवीन नियमांनुसार आता हिंदूंनी स्वतःच्याच घरात पूजा करावी आणि वाद्ये वाजवू नयेत आणि फटाकेही उडवू नयेत अथवा मौज करू नये असा नियम होता.
पुढचा नियम म्हणजे हिंदूंनी दसऱ्याच्या मिरवणुका काढू नये.
शिवाय मोठ्या मंदिरात पूजा चालू असताना मंदिराच्या कंपाउंड भीतीच्या बाहेर वाद्यांचा आवाज येत काम नये.
ह्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंदूंवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही निजाम सरकाकडून जाहीर करण्यात आले.
हिंदूंच्यासाठी हे नियम अत्यंत अन्यायकारक आणि एकतर्फी असे होते.
आता नव्या नियमानुसार हिंदूंनी आपल्या परंपरागत दसरा सणाचा आनंद उपभोगायचा नव्हता. कायदा आणि शांतता पालन करण्याची सर्वस्वी जबादारी फक्त हिंदूंची होती.
ह्या शिवाय सहाव्या निजामाने इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाज यांना विशेष सवलती देण्यास सुरवात केली. आणि इथेच असंतोषाची ठिणगी पडली.
२९ ऑगस्ट १९११ या दिवशी वयाच्या २५ व्या वर्षी मीर उस्मान अलीखान बहादूर आसफजाह हा सातवा निझाम म्हणून हैद्राबादच्या गादीवर आला. हा अत्यंत धनलोभी आणि चिक्कू स्वभावाचा होता. ह्याची राहनी अत्यंत साधी असायची. ह्यानेच रझाकार नावाची जी सशस्त्र संघटना निर्माण झाली तिला मोठे पाठबळ दिले.
इसवीसन १९१६ नंतर ह्या सातव्या निजामाच्या धार्मिक धोरणांत आमूलाग्र बदल झाला आणि त्याने हिंदूंवर अनेक निर्बंध घातले.
हैद्राबाद राज्यात सरकारची धार्मिक धोरणाबद्दल जी फर्माने निघत त्याला 'अहकामे उमरे महजबी' असे म्हणत.
आता परत १९१७ मध्ये दसरा आणि मोहरम हे दोन्ही सण एकाच दिवशी आले. तेंव्हा निजाम सरकारने नवा धार्मिक आदेश जरी केला. ह्यांतील काही आदेश हे सहाव्या निजामाने जाहीर केलेलेच होते. सातव्या निजामाने ह्यात आणखी भर घातली.
ते आदेश असे:
आदेश १. हैद्राबाद शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व हिंदूंनी स्वतःची पूजा ही कोणतेही वाद्य न वाजविता करावी.
आदेश २. आंध्र प्रदेशातील एक देवता जिचे नाव भक्तामा म्हणून आहे तिची घराबाहेर मिरवणूक काढू नये. हिंदूंनी घरातील मंदिरांमध्येही वाद्ये वाजवू नयेत.
आदेश ३. हिंदूंनी दसऱ्याच्या सीमोल्लंघनाला जायचे असेल तर अत्यंत शांत पद्धतीने आणि सुतकी चेहऱ्याने जावे. दसऱ्याच्या दिवशी भगवा ध्वज लावू नये.
आदेश ४. हिंदूंना कोणताही धार्मिक उत्सव निजाम सरकारच्या धर्मखात्याच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.
आदेश ५. म्हशीदीसमोर अथवा म्हशीदीपासून ३०० पावलांच्या आत हिंदूंना वाद्य वाजवीत येणार नाही. या आदेशात केवळ नमाजाची वेळी वाद्य वाजवू नये असे न म्हणता पूर्ण वेळ वाद्ये वाजवूच नयेत असे म्हंटलेले होते.
आदेश ६. एखाद्या सार्वजनिक ठिकाणी हिंदूंनी एखादा धार्मिक उत्सव साजरा केला असेल आणि त्यामुळे जर सामाजिक शांततेचा भंग झाला असेल तर हिंदूंच्या त्या धार्मिक उत्सवावर ताबडतोब कायमस्वरूपी बंदी घालण्यात येईल.
आदेश ७. हैद्राबाद शहर आणि इतर सर्व जिल्ह्यांत मुसलमानांची संख्या जर खूप जास्त असेल तर तेथील हिंदूंच्या मंदिरांचा विस्तार आणि त्यांची डागडुजी करता येणार नाही. कोणताही खाजगी व्यक्ती देखील स्वखर्चाने अश्या मंदिरांची डागडुजी करू शकणार नाही.
आदेश८. हिंदूंना कुठलीही मिरवणूक काढायची असल्यास त्यांनी जिल्ह्यातील तहसीलदाराला आणि हैद्राबादच्या कमिशनरला दहा दिवस अगोदर पूर्व सूचना द्यावी.
शिवाय हिंदूंच्या धार्मिक प्रवचनांनाही सरकारच्या धर्मखात्याची पूर्व परवानगी सक्तीची करण्यात आली.
निजामाच्या ह्या धार्मिक ढवळाढवळीमुळे आणि धार्मिक असहिष्णुतेमुळे त्याच्या राज्यातील हिंदू आणि इतर सर्व जाती धर्मांचे लोक भयंकर चिडले आणि योग्य संधीची वाट पाहू लागले.
सातव्या निजामाने ही धार्मिक बंधने हिंदूंवर का घातली?
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार सातव्या निजामाने आपली सत्ता अधिक बळकट करण्यासाठी स्वतःच्या मुस्लिम जातीचा अव्याहत पाठिंबा मिळत राहावा म्हणून हिंदूंवर धार्मिक बंधने घातली. आता मुस्लिम समाजाचा असा पाठिंबा मिळविण्यासाठी मुस्लिमांना खुश करणे गरजेचे होते.
शिवाय अत्यंत महत्वाचे म्हणजे हिंदू हे शासित आहेत आणि मुसलमान हे शासक आहेत ह्याची जाणीव हिंदूंना करून देणे आवश्यक होते.
ह्या घटनांमुळे हैद्राबादच्या मुसलमानांचा राजसत्तेशी बिनशर्त पाठिंबा कायम राहिला.
हिंदूंच्या सर्व सण- उत्सवांमध्ये मुसलमानांकडून अडथळे सुरु झाले आणि त्यामुळे हिंदूंच्या मनात असंतोष अधिक वाढू लागला. आणि ह्याचा व्हायचा तो परिणाम झालाच.
२ ऑक्टोबर १९२८ मध्ये नांदेड येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीवर मुसलमानांकडून हल्ला झाल्याने मोठी दंगल उसळली. ह्या दंगलीत दोन्हीकडून बरेच जण प्राणास मुकले.
१६ ऑक्टोबर १९२८ रोजी आष्टी ( जिल्हा बीड) येथील गणपतीची मूर्ती भंग केल्यामुळे तिथे दंगा झाला.
२० मे १९२९ रोजी नांदेड येथे काही मुसलमान हे बकरी ईदचा नमाज पढून परत येत होते. हे लोक घोड्यावर आणि उंटावर आरूढ झालेले होते.
गुरुद्वारासमोरून जाताना शिखांनी ह्या मुस्लिमांना उंट घोड्यावरून खाली उतरायची विनंती केली पण त्यांनी नकार दिला आणि मोठी दंगल उसळली.
पैठण येथीही असाच धिंगाणा झाला.
पैठणच्या हिंदूंनी गणपती उत्सवाची आणि गणपतीच्या मिरवणुकीची रीतसर परवानगी १३ ऑगस्ट १९२९ ला मागितली. पैठणच्या मामलेदारांनी २६ ऑगस्ट १९२९ च्या पत्रान्वये मिरवणुकीची परवानगी दिली.
पण तेथील स्थानिक मुसलमान अधिकाऱ्यांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीस अडथळा आणला. मिरवणुकीच्या रस्त्यावर दोन म्हशीदी आहेत म्हणून ४० यार्ड ( म्हणजे साधारण ३६ मीटर) अलीकडे आणि ४० यार्ड पलीकडे वाद्ये बंद ठेवावीत असा हुकूम हिंदूंना देण्यात आला.
या पूर्वीही पैठण येथे धार्मिक मिरवणुकीत म्हशीदीवरून वाद्ये वाजवीत जाण्यासंबंधी हिंदू मुस्लिमांमध्ये तंटा झाला होता. त्यावेळी निजाम सरकारने स्व-खर्चाने हिंदूंच्या मिरवणुकीसाठी म्हशीद नसलेला एक नवीन रास्ता तयार करून दिला होता. आणि ह्या नव्या रस्त्यावर म्हशीद बंधू नये म्हणून आदेश काढला होता.
परंतु मुसलमानांनी पुढे त्या नवीन रस्त्यावर दोन म्हशीदी बांधल्या. हिंदूंनीही सुरवातीस याकडे दुर्लक्ष केले तसेच मुसलमानांनीही हिंदूंनी म्हशीदीसमोरून वाद्ये वाजवीत जाण्यासंबंधी अडथळे आणले नाहीत. त्यामुळे हिंदूंच्या पुढील काही मिरवणूका ह्या शांततेत पार पडल्या.
खरे तर पैठणच्या मुसलमानांनी जेंव्हा ह्या नवीन रस्त्यावर म्हशीदी बांधल्या तेंव्हाच निजाम सरकारने ह्यावर कारवाई करायला हवी होती.
पण का कारवाई केली नाही?
पुढे १९३१ पासून हिंदू मुस्लिम दंग्यांच्यामुळे पैठण येथील मिरवणूक बंद पडली.
याचा अर्थच असा कि निजाम सरकारने मुसलमानांची बाजू उचलून धरली आणि धर्म सहिष्णुतेचा विचारच केला नाही.
इसवीसन १९३१ मध्ये परभणी येथे आणि १९३२ मध्ये पूर्णा ( जिल्हा परभणी) या ठिकाणी गणपतीच्या मिरवणुकीस अडथळे आणल्यामुळे जातीय दंगली झाल्या.
इसवीसन १९३६ मध्ये नांदेड येथे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात जातीय दंगल झाली कारण शिखांच्या मालकीच्या एका टेकडीवर मुसलमानांनी एक प्रेत पुरले. ती टेकडी ताब्यात घेण्यासाठी शिखांनी अभूतपूर्व आंदोलन केले.
नांदेड हे गुरु गोविंद सिंग यांच्या समाधीचे स्थान असल्यामुळे थेट पंजाबातुनही अनेक शीख ह्या नांदेड येथील टेकडीवर जमा झाले.
शेवटी अत्यंत जातीय तणावामुळे निजाम सरकारने हे प्रकरण एका युरोपियन अधिकाऱ्याकडे चौकशीसाठी दिले. त्याने पुरावे तपासून शिखांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे मुसलनांना तिथून पुरलेले ते प्रेत हलवावे लागले.
त्यामुळे नांदेडच्या मुसलमानांनी हिंदू मंदिरांची आणि गुरुद्वारांची तोडफोड सुरु करून देवतांचीही विटंबना केली. त्यामुळे नांदेड येथे मोठी दंगल उसळली.
निजाम सरकारने हिंदू मंदिरांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांचा जाणूनबुजून कुठलाही शोध घेतला नाही. त्यामुळे दंग्यातील गुन्हेगार मोकाट फिरत राहिले. ह्यांना कुठलीही शिक्षा निजाम सरकारने दिली नाही. त्यामुळे जातीय दरी अजून वाढली आणि मुस्लिम सोडून इतर सर्व समाज हा निजामाच्या विरुद्ध गेला.
१९२६ मध्ये 'महंमद नवाजखान' याने 'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' या संघटनेची स्थापना केली. ( आजची एम. आय. एम. संघटना. जिचा नेता असदुद्दीन ओवैसी हा आहे. )
संघटनेचा उद्देश होता कि निजामशाही सत्तेला पाठिंबा देणं, सर्व मुसलमानांचे एकीकरण करणे आणि धर्मांतर करणे आणि हैद्राबाद संस्थानला भारतात विलीन होऊ न देणे.
सातव्या निजामाचा ह्या संघटनेस वरदहस्त होताच.
लवकरच बहादुरजंग हा 'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' ह्या संघटनेचा नेता झाला आणि त्याने धर्मांतराची मोठीं मोहीम हाती घेतली.
बहादुरजंग याने बीड जिल्ह्यातील, धोंडराई आणि गेवराई ह्या खेड्यातील ५०० हरिजनांना बळजबरीने मुस्लिम धर्माची दीक्षा दिली. तसेच पैठण येथीलही काही हरिजनांना मुस्लिम केले गेले.
उस्मानाबादमधील उदगीर तालुक्यातील राजाबाई ह्या स्त्रीस बळजबरीने मुसलमान केले गेले मात्र अल्पावधीतच आर्यसमाजतील लोकांनी तिला शुद्ध करून पुन्हा धर्मात घेतले.
औरंगाबाद जिल्ह्यातील जालना तालुक्यातील हिवरा खेड्यातील मधू कुटे नावाच्या इसमासही मुसलमान केले गेले.
बीड जिल्ह्यातील गोविंद आणि त्याची आई यांनाही सक्तीने इस्लाम धर्माची दीक्षा दिली गेली. याच जिल्ह्यातील इंदिराबाई नावाच्या स्त्रीस मन्सूरबेग नावाच्या पोलिसाने बळजबरीने पळवून नेऊन तिला इस्लाम धर्म साकारण्यास भाग पाडले.
तसेच दुध्या, बापू आणि महाद्या ह्यांना मुसलमान करून अब्दुल रहीम, बहादूरखान, आणि अब्दुलसलीम अशी नावे देण्यात आली.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार धार्मिक जीवनाशिवाय सामाजिक जीवनातही आता निजामाच्या राज्यात सर्रास ढवळाढवळ होऊ लागल्याने लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. काही ठिकाणी जातीय दंगली झाल्या. यामुळे भीती, संशय आणि अविश्वास यांचे बीज वेगाने वृक्षात परिवर्तित होऊ लागले.
आर्य समाज आणि हिंदू महासभा यांनी जुलमी निजाम सरकारच्या विरुद्ध सत्याग्रह सुरु केला.
इसवीसन १९४६ साली 'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' या संघटनेचा कासीम रझवी हा अध्यक्ष झाला. या संघटनेने एक स्वयंसेवक दल तयार केले. रझवी नावावरून पुढे ह्या संघटनेस रझाकार संघटना असे म्हणू लागले. ह्या रझाकारांचे जे दल होते ते सशस्त्र दल होते.
रझाकारांनी इतर धर्मियांची लूटमार सुरु केली. हिंदू आणि गरीब लोक नागविले जाऊ लागले. बायकांचे बलात्कार केले गेले. देवळे पाडली गेली. देवतांची विटंबना झाली. घरे जाळली गेली. मारहाण आणि लुटापटीला नुसता ऊत आला.
कासीम रझवी हा अध्यक्ष झाल्यापासून रझाकारांचे अत्याचार वाढू लागले. त्यामुळे जातीय वैमनस्यात अजून भर पडली.
आता निजाम संस्थानात मोठ्या प्रमाणात दंगे सुरु झाले.
निजमाने स्वतंत्र इस्लामी राष्ट्राच्या कल्पनेमुळे भारतीय संघ राज्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला पण हा त्याचा प्रयत्न फसला. कासीम रझवी आणि 'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' या संगटनेच्या जोरावर आपले अस्तित्व टिकेल असे निजामास वाटत होते पण प्रत्यक्षात तसे झाले नाही.
शेवटी भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ ला पोलीस ऍक्शन सुरु केली.
भारतीय फौजेने 'ऑपरेशन पोलो' ह्या नावाने हैद्राबाद निजामावर कारवाई सुरु केली आणि १६ सप्टेंबर १९४८ पर्यंत ते पूर्ण केले. १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाने पूर्ण शरणागती पत्करली.
या वेळी निजामाचा जो कमांडर होता तो अरब होता. ह्याचे नाव 'अल इदरूस' असे होते. ह्याला भारतीय फौजेच्या जनरल चौधरी यांच्यासमोर आत्मसमर्पन करून गुढगे टेकावे लागले.
ह्या लढाईत भारतीय फौजेचे ३२ जवान मारले गेले.
निजामाच्या बाजूच्या मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या हि १८६३ अशी होती.
ह्या व्यापक सशस्त्र कारवाईत आणि अंधाधुंद धामधुमीत मरणाऱ्यांची संख्या हि ५० हजारापासून थेट २ लाखापर्यंत होती असेही काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. (अधिकचे संशोधन हवे. )
'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' (आजची एम. आय. एम. संघटना. ) हि रझाकार संघटना काहीही करू शकली नाही. ह्यामुळे निजामाचा पूर्ण हिरमोड झाला.
'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' या संघटनेचा अध्यक्ष कासीम रझवी ह्याला हिंदच्या फौजेने गिरफ्तार करून तुरुंगात पाठविले होते. शेवटी पाकिस्तानात निघून जाण्याआधी ह्या कासीम रझवीने आपल्या 'मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन' (आजची एम. आय. एम.) ह्या संघटनेचे नेतृत्व वकील अब्दुल वहाद ओवैसी याच्याकडे सुपूर्त केले. तेंव्हापासून ह्या संघटनेचे नेतृत्व हे ह्या ओवैसी घराकडेच आहे.
अब्दुल वाहेद नंतर सलाहुद्दीन ओवैसी हा ह्या संघटनेचा अध्यक्ष झाला. आता त्याचा मुलगा असदुद्दीन ओवैसी हा ह्या संघटनेचा अध्यक्ष आहे.
धार्मिक भानगडी निजामास फार महागात पडल्या.
जर निजामाने धर्मनिरपेक्ष धोरण नीट पाळले असते तर कदाचित त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकले असते.
पण घटना ह्या जर-तर वर अवलंबून नसतात हेच सत्य.
निजामाने धर्मनिरपेक्ष धोरण नीट पाळले असते हिंदू आणि मुसलमान यांच्यात प्रेमाची आणि समन्वयाची भावना दृढ झाली असती.
पण निजाम हे करू शकला नाही...
लेख समाप्त.
लेख आवडल्या शेअर करा आणि मित्र मंडळींस महाराष्ट्र धर्म जॉईन करायला सांगा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
No comments:
Post a Comment