विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 11 October 2021

गड-किल्ल्यांवरील देवीस्थाने

 Post By..

Tushar Patil











गड-किल्ल्यांवरील देवीस्थाने
गडकिल्ले आपल्याला माहीत असतात ते एकेकाळचे स्वराज्याचे रक्षणकर्ते म्हणून. मराठेशाहीत याच गडकिल्ल्यांवर मोठी गजबज असायची. साहजिकच तिथे देवदेवतांची मंदिरंही उभारली गेली.
भारतीय संस्कृतीने स्त्रीशक्तीची विविध रूपात नेहमी उपासना केली आहे. आपल्या देशभरात आदिशक्तीची ५१ शक्तिपीठं आहेत. त्यातील साडेतीन पीठं पुण्यभूमी महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची अंबाबाई ऊर्फ महालक्ष्मी, तुळजापूरची भवानीमाता, माहूरगडावरची रेणुकामाता ही संपूर्ण तीन पीठं तर नाशिक जिल्ह्य़ातील सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगीदेवी हे अर्ध पीठं मानले जाते. हे पीठ अर्धच का, तर महिषासुराचा वध केल्यानंतर काहीच काळ ही आदिशक्ती येथे विसावली होती असे मानले जाते म्हणून. या साडेतीन पीठांशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आदिशक्तीची मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे वेगवेगळ्या कारणांमुळे सर्वाना तशी परिचित आहेत. पण शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा प्राण असणाऱ्या गडकोटांवरील देवीची मंदिरे आपणास तशी फारशी परिचित नाहीत. याला अपवाद आहे प्रतापगडावरील भवानीमातेचे मंदिर. संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ ४००च्या आसपास गडकोट आहेत. या सर्व गडकोटांवर कुठल्या ना कुठल्या देवीदेवतांचे मंदिर आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील देवगिरीच्या किल्ल्याचे इब्न बतूता, थेव्हेनॉट या त्या काळातील युरोपीय प्रवाशांनी ‘शक्तिशाली किल्ला’ असे वर्णन करून त्याची तुलना थेट युरोपातल्या मध्ययुगीन लढाऊ किल्ल्यांशीच केलेली आहे. यादव साम्राज्यात या राजदुर्गाची प्रतिष्ठा, वैभव, ऐश्वर्य व दरारा इतक्या उत्कर्षांच्या शिखरावर पोहोचले होते की याची तुलना साक्षात इंद्रनगरीशी होत असे. या गडावरील भारतमातेचे मंदिर तर सर्वाना ज्ञात आहे. पण या गडाच्या खंदकातील रासई देवीस्थान स्थानिक लोक सोडून इतरांना ज्ञात नाही. या देवीचे मंदिर खंदकात कोरून काढलेल्या गुहेत असून संपूर्ण मूर्तीस शेंदूरलेपन केलेले आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून या देवीचे स्थान थोडे आडमार्गावर असल्याने या देवीच्या दर्शनाला फारसे कोणी येत नाही. खरे तर ही देवता म्हणजे यादव घराण्याची कुलदेवता होय. पण सध्या मात्र चैत्र पौर्णिमेच्या या देवीच्या उत्सवाशिवाय या गुहेतील देवीस्थानाकडे फारसे कोणी जात नाही. देवगिरीच्या किल्ल्यातील सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे भारतमातेचे मंदिर होय. सध्या ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या ठिकाणी यादवांच्या काळात दहाहून अधिक मंदिराचा समूह होता. पण दिल्लीच्या कुतुबुद्दीन मुबारक खिल्जीने १४ व्या शतकात या मंदिराचा विध्वंस करून येथे जुम्मा मशीद नावाची वास्तू उभारली. पुढे १९४८ साली हैदराबादच्या उत्सानशहा निजामाला शरण येण्यास भाग पाडल्यावर स्थानिक लोकांनी तत्परतेने येथे भारतमातेची मूर्ती प्रतिष्ठापित केली. महाराष्ट्रातील गडकोटांवर देवीची शेकडो मंदिरे आहेत. पण भारतमातेचे हे देवगिरी वरील मंदिर एकमेव असल्याने त्याचे महत्त्व और आहे.
शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरी गडाचे महत्त्व शिवप्रेमींच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. या गडाची आधिष्ठाती असणाऱ्या शिवाई देवीचे मंदिर एका कोरीव लेण्यामध्ये आहे. या देवीची मूळ मूर्ती तांदळा स्वरूपात असून या शिळेच्या मागेच सिंहावर आरूड देवीची चतुर्भुज मूर्ती आहे. ही मूर्ती १९४८ साली कुसुर ग्रामवासीयांनी बसविली. ही शिवाई देवी जुन्नर परिसरातील आदिवासी, ठाकर, कोळी समाजाची कुलदेवता होय. याच शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘शिवाजी’ हे नाव ठेवले असे मानले जाते. शिवभारतकार कवींद्र परमानंद यांनी आपल्या शिवभारत या काव्यात याविषयी पुढीलप्रमाणे लिहिले आहे-
यत: शिवगिरेन्र्घि जात:स पुरुषोत्तम:।
तत: प्रसिद्ध लोकेऽस्य शिव इत्याभिधाऽ भवत्॥ ६३॥
शिवनेरी किल्ल्यावर या पुरुषश्रेष्ठाचा जन्म झाला म्हणून त्याचे ‘शिव’ असे नाव लोकप्रसिद्ध झाले. या शिवाई देवीचे मंदिर आयताकृती सभामंडप पुढे ओवरी; दीपमाळ असे साध्याच पद्धतीने सजवलेले आहे. पण या देवीचा महिमा शिवभक्तांच्या दृष्टीने खूप मौलिक आहे.
तोरणा ऊर्फ प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्य़ातील सर्वात उंच गड होय. या गडावरील प्रमुख देवी मंदिर म्हणजे गडदेवता मेंगाई देवीचे मंदिर होय. या मंदिराच्या आत घुमटीत चारहात असलेली मेंगाई देवीची मूर्ती उभी असून तिच्या उजव्या खालच्या हातात पात्र, वरच्या हातात तलवार, डाव्या वरच्या हातात त्रिशूल तर खालच्या हातात राक्षसाचे मुंडके आपणांस दिसते. हे मेंगाई देवीचे मंदिर म्हणजे तोरणगडावरील मुख्य मंदिर होय. याशिवाय कोठी दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला तोरणजाई देवीची घुमटी लागते. या घुमटीत मध्यभागी तोरणजाई, तिच्या उजव्या हाताला सोमजाई तर डाव्या हाताला आणखी एका अज्ञात देवीची मूर्ती आहे. या घुमटीच्या ठिकाणीच शिवरायांना या गडाची दुरुस्ती चालू असताना गुप्तधन सापडले. या घटनेचे स्मरण म्हणून शिवरायांनी येथे तोरणजाई देवीची घुमटी बांधली असे म्हणतात. या तोरण्यावरील धनाच्या साहाय्यानेच शिवरायांनी गुंजण मावळात मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगड बांधला. या राजगडाच्या बालेकिल्ल्यावर एका कडय़ाच्या पोटात जननी देवीचे छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात तांदळा स्वरूपात शेंदूर फासलेली जननीदेवीची मूर्ती आहे. आदिशक्तीच्या अनेक नावांपैकी ‘जनी’ हे एक नाव आहे. या जनीचा अपभ्रंश पुढे जननी असा झाला.
या देवी मंदिराशिवाय राजगडाच्या पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आतील घुमटीत देवीच्या तीन मूर्ती आहेत. मुख्य मूर्तीच्या डाव्या हाताला देवीचा तांदळा आहे. त्याच्या शेजारीच भोर संस्थानचे पंतसचिव यांनी बसविलेली पद्मावती देवीची मूर्ती असून घुमटीच्या डाव्या हाताला भिंतीला टेकून असणारी पद्मावती देवीची मूर्ती शिवकालातील आहे. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर ब्रम्हर्षीची गुहा आहे. या ऋ षींची पत्नी म्हणजे पद्मावती. लक्ष्मीदेवीची कथा वाचत असताना आपल्या असे लक्षात येते की, जेव्हा लक्ष्मी सागरामधून बाहेर आली, तेव्हा एका पद्मावर ती उभी होती व नंतर तिने भूतलावर पाय ठेवले. त्यामुळेच लक्ष्मीचे नाव पद्मावती असे पडले. या पद्मावती देवीच्या मंदिराशेजारी एक तळे असून त्याला पद्मावती तळे असे म्हणतात. जिथे जिथे पद्मावती देवीचे मंदिर असेल त्या त्या ठिकाणी त्याच्या पुढे-मागे तळे बांधण्याचा प्रघात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी देवीवरील प्रगाढ श्रद्धा सर्व शिवभक्तांना ज्ञात आहे. याच श्रद्धेपोटी त्यांनी अनेक किल्ल्यांवर भवानी देवीची मंदिरे बांधली. त्यातील सर्वात सुप्रसिद्ध मंदिर म्हणजे प्रतापगडावरील भवानीमातेचे मंदिर होय. हे मंदिर शिवरायांनी अफझलखानाच्या वधानंतर बांधले. या मंदिरात देवीची मूर्ती प्रतिष्ठापीत करण्यासाठी पवित्र आणि सर्वोत्तम शिळा मिळविण्याकरिता त्यांनी मंबाजी नाईक पानसरे या आपल्या सरदाराला नेपाळ येथील त्रिशूलगंडकी, श्वेतगंडकी, सरस्वती या नद्यांच्या संगमावरील शिळा आणावयास पाठविले. नाईकांनी नेपाळनरेशाच्या मदतीने अशी शिळा मिळवून त्यातून एक उत्कृष्ट भवानीची मूर्ती करवून घेतली. या देवीची स्थापना शिवरायांनी मोरोपंताच्या हस्ते प्रतापगडावर केली. शिवराय वेळोवेळी या देवीच्या दर्शनार्थ प्रतापगडावर येत असत. राज्याभिषेकाच्या अगोदर राजांनी या देवीस सव्वा मण वजनाचे सोन्याचे छत्र अर्पण केले होते. आजही प्रतापगडावरील या भवानी मंदिराची व्यवस्था सातारकर छत्रपती घराण्याकडून व्यवस्थित केली जाते. प्रतापगडावर नवरात्रोत्सव ऐतिहासिक काळाला साजेसा केला जातो. नवरात्रोत्सवापैकी ललिता पंचमीचा कार्यक्रम खूपच देखणा असतो.
प्रतापगडाप्रमाणेच शिवरायांनी कल्याण जवळील दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवीची तर मालवणजवळील सिंधुदुर्गावर भगवती देवीची स्थापना केली. दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवीची मूर्ती तांदळाच्या, स्वरूपात तर सिंधुदुर्गावरील भगवती देवी कोरीव मूर्तीच्या स्वरूपात आजही आपणास डोळे भरून पाहता येते. भगवती मंदिरातील देवीची मूर्ती चतुर्भुज असून ती शस्त्रसज्ज आहे. प्रतापगडाप्रमाणेच शिवरायांनी स्वत: स्थापन केलेली दुसरी महत्त्वाची भवानीची मूर्ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्य़ातील पारगडावरील भवानी देवीची मूर्ती होय. तानाजी मालुसरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलग्याचे म्हणजे रायबाचे लग्न स्वत: शिवरायांनी वरपिता म्हणून लावून दिले. त्यास चंदगड जवळ पारगड हा नवीन किल्ला बांधून त्याचा किल्लेदार नेमले. याच पारगडावर दिमाखदार असे महिषासुरमर्दिनी रूपातील भवानीमातेचे मंदिर आजही मोठय़ा डौलात उभे आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यातील काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती नेत्रसुखद असून या गडावरही दसऱ्याचा महोत्सव दिमाखदार पद्धतीने साजरा करतात. विशेष म्हणजे ‘‘जोपर्यंत आकाशी चंद्र-सूर्य तळपत आहेत तोपर्यंत गड खाली करू नका!’’ हा शिवरायांचा आदेश शिरसावंद्य मानून गडांवरील झेंडे, मालुसरे, माळवे ही घराणी आजही पारगडावरील देवी मंदिराची व्यवस्था मोठय़ा अभिमानाने राखत आहेत. पारगडावरील भवानीसमोर आजूबाजूचे पंचक्रोशीतील भक्तगण आजही आपले गाऱ्हाणे घालतात, देवीला कौल लावतात. शिवप्रेमीची साक्ष म्हणून शिवप्रेमींनी पारगडावरील हे भवानीचे मंदिर आवर्जून पाहावे.
महाराष्ट्रातील अनेक गडकोटांवर तांदळा स्वरूपातील (म्हणजे एक वाटोळा गुळगुळीत दगड स्थापून त्याला शेंदूर फासणे) देवीच्या मूर्ती आहेत. मूर्ती कोरण्याचे शास्त्र विकसित होण्याअगोदरच्या या तांदळा स्वरूपातील मूर्ती आज हजारो र्वष झाली तरी पूजनात आहेत. या स्वरूपातील मूर्ती पुरंदरगडावर मरीआई, तिकोना किल्ल्यावर तळजाई, भांगशी गडावर भांगसाई, राजगडावर जननीदेवी अशा अनेक गडांवर शेंदूर फासलेल्या शिळेच्या स्वरूपात आपणास पाहायला मिळतात. तर अनेक ठिकाणी स्वतंत्र शिळा न पूजता गुहेतील पुढे आलेल्या दगडाच्या टेंगळास शेंदूर फासून देवी म्हणून पुजण्यात आले आहे. रायगडावरील भवानी टोकाच्या भवानी गुहेत कोणतीही मूर्ती नसून पुढे आलेल्या टेंगळास शेंदूर फासण्यात आले आहे. त्यासच भवानीदेवी म्हणून पुजले जाते अशाच प्रकारे रतनगडावरील रत्नुबाईच्या गुहेत दगडी टेंगळास शेंदूर फासून रत्नुबाई म्हणून आजही पूजण्यात येते. काही गडावर मूळच्या तांदळ्याच्या मूर्ती शेजारीच इतिहास काळात नवीन, घडीव मूर्ती बसविण्यात आल्या. अशा प्रकारच्या मूर्ती आपणास राजगडावरील पद्मावती मंदिरात, शिवनेरी गडावरील शिवाई मंदिरात आजही अभ्यासता येतात. नाशिक जिल्ह्यातील धोडप या सुप्रसिद्ध किल्ल्यावर मला व्यक्तीश: मूर्तीसोबत एक नवीनच गोष्ट अभ्यासायला मिळाली. १९८८ साली धोडप गडावर गेल्यावर त्याच्या बालेकिल्ल्यावरील भवानी गुंफेच्या गाभाऱ्यात मला पुढे आलेल्या दगडास शेंदूर फासून पूजलेली भवानी देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती पाहायला मिळाली. त्यानंतर २००८ साली मी धोडप गडावर गेल्यावर त्याच भवानी गुंफेतील तांदळा स्वरूपातील देवी कोरून त्यातून घडवलेली भवानी देवीची मूर्ती तेथे मला पाहायला मिळाली. हे १० वर्षांतील स्थित्यंतर मुद्दाम एक वेगळे उदाहरण मी या लेखात दिले आहे. अशाच प्रकारे अनेक गडावर मूळचा तांदळा कोरून त्यातून मूर्ती घडविली गेली असेल. फक्त ते उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर (धोडपसारखे) घडल्यावरच लक्षात येते. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाईच्या डोंगरावरील छोटय़ा देवळातसुद्धा अशीच कळसुबाईची प्रतिमा तांदळा स्वरूपातच आहे.
महाराष्ट्रातील लळिंगगडावर, कर्नाळागडावर, पट्टा ऊर्फ विश्रामगडावर सिंहावर आरूढ देवी मूर्त्यां कर्णाईमाता, पट्टाईमाता या नावाने पूजलेल्या आपणास पाहायला मिळतात. या देवी दुर्गच्या स्वरूपातील असून त्या ज्या त्या गडाच्या नावानेच ओळखल्या जातात. अशाच प्रकारे काही गडावर वाघावर आरूढ देवी मूर्त्यां पाहायला मिळतात. या वाघावर आरूढ देवींना वाघजाई म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर, अहमदनगर जिल्ह्यातील पेमगिरी गडावर, नाशिक जिल्ह्यातील रामशेज गडावर वाघजाईच्या मूर्ती आपणास पाहायला मिळतात. प्राचीनकाळी एखाद्या जंगलभागाने व्याप्त असणाऱ्या डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरल्यावर बेलदार, गवंडी, सुतार, लोहार असे शेकडो लोक राहायला येत असत. या मजूर लोकांना जंगलात किल्ला बांधत असताना वाघ, बिबटय़ा वाघ यांचे भय असे. हे भय त्यांच्या मनातून घालविण्यासाठी वाघाला अंकित करून त्यावर स्वार झालेल्या वाघजाई देवीचे मंदिर त्या-त्या वेळचे शासनकर्ते बांधत असत. अशी वाघावर स्वार झालेली देवी आपले वाघांपासून संरक्षण करेल अशी त्या लोकांची श्रद्धा होत. त्यामुळे ते मजूर निर्धास्त मनाने गड बांधण्याचे काम करीत असत. अशाच प्रकारे रानावनातून डोंगरातून निर्धास्तपणे फिरण्यासाठी रानजाई, डोंगराई अशा देवींची स्थापना केलेली आढळते.
प्राचीन काळी गडकिल्ले बांधत असताना त्या त्या डोंगरावर मनुष्यवस्ती नसे. गर्द झाडी, जंगली श्वापदे, आडवाटेवरील रान, अशा सुनसान वातावरणामुळे गड बांधणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची अनामिक धास्ती असे. ही धास्ती वाटू नये, सर्वजण आश्वस्त व्हावेत म्हणून त्या त्या डोंगरावर गडदेवतेची प्रथम स्थापना करून तिची घुमटी अथवा मंदिर बांधले जात असे. नंतरच्या काळात तो तो गड त्याच देवतेच्या नावाने ओळखला जात असे. पुणे जिल्ह्यातील कोरीगड तेथल्या कोराईदेवीच्या नावाने, सातारा जिल्ह्यातील वर्धनगड तेथल्या वर्धनीमातेच्या नावाने, कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणगड तेथल्या रांगणाई देवीच्या नावाने इतिहासात ख्यातकीर्त झाले आहेत. यातील कोराईगडावरील कोराईदेवी आजही खूप प्रसिद्ध असून या देवीची भव्य मूर्ती लक्षवेधक अशीच आहे. या चतुर्भुज देवीने दैत्यसंहारासाठी गदा, त्रिशूळ, डमरू हातांमध्ये धारण केली आहेत. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी कोरीगड जिंकल्यावर या देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने काढून घेऊन मुंबईच्या मुंबादेवीला दान केले.
रायगड जिल्ह्यतील सुधागडावरील भोराईदेवीचे महत्त्व आजही टिकून आहे. ही देवता भोरच्या पंतसचिवांच्या घरण्याची कुलदेवता होय. त्यामुळे या देवीची व्यवस्था इतिहास काळापासून ते आजतागायत चोख ठेवण्यात आली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवस आजही मोठय़ा प्रमाणात भोराईदेवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. या देवीची मूर्ती वालुकाश्म दगडात कोरलेली असून ती कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रूपाप्रमाणेच कोरलेली आहे. या देवीची स्थापना भृगऋ षींनी केली असे मानले जाते. म्हणून या देवीला ‘भृगुअंबा, भोरांबा, भोराई या नावानेही ओळखले जाते.
भोराईदेवीप्रमाणेच सातारा शहराजवळील परळीचा किल्ला ऊर्फ सज्जनगडावरील श्रीांगलाईदेवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. ही देवी अंगापूरच्या डोहात समर्थाना सापडली व त्यांनी तिची स्थापना सज्जनगडावरील मंदिर बांधून केली. श्रीआंग्लाईदेवीचे मंदिर त्याच्या समोरील ध्वजस्तंभावर नेहमी डौलाने फडकणारा परमपवित्र भगवाध्वज पाहिल्यावर कोणाही शिवप्रेमीस अभिमान वाटावा असेच या गडावरील वातावरण नेहमी भारलेले असते. हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडाची गडदेवता म्हणजे शिरकाईदेवी. ही देवी शिरकाई म्हणजेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी महिषासूरमर्दिनी होय. शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्याकडून रायरीचा ताबा घेतला. पण मोरे यांच्या अमलाआधी तो शिर्के सरदारांच्या ताब्यात होता. या शिक्र्याची कुलदेवता म्हणजे शिकाईदेवी होय. शिवरायांनी रायरीचा ताबा मिळाल्यावर या गडाचे नाव बदलून रायगड ठेवले व गडदेवता म्हणून शिर्काईचा मान आहे तसा पुढे चालू ठेवला. शिवकाळात व नंतरच्या पेशवेकाळात शिर्काईस वेगवेगळ्या निमित्ताने नवस केल्यास व ते फेडल्याचे उल्लेख आपणास दप्तरात अभ्यासावयास मिळतात. सध्याची रायगडावरील छोटेखानी पण देखणी घुमटी ही नंतरच्या काळात बांधलेली असून मूळ मंदिर हे होळीच्या माळावरील शिर्काईचा घरटा नावाच्या चौथऱ्यावर होते. आजही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देवी शिर्काईसमोर गोंधळ, जागरण असे कार्यक्रम केले जातात. या भवानीच्या मंदिराशिवाय रायगडावरील भवानी टोकावर भवानी गुंफा असून त्या ठिकाणी जाणे सामान्यजणांच्या दृष्टीने थोडे अवघड आहे. या गुहेत कोणतीही मूर्ती असून काही पाषानांना शेंदूर फासून भवानीमाता म्हणून भक्तिभावाने पूजले जाते.
समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला किल्ला म्हणजे कोटकामत्याचा भुईकोट किल्ला होय. सध्या जरी या गडाचे मोजके अवशेष उरले असले तरी कोटकामते गाव सध्या प्रसिद्ध आहे ते येथील देवी भगवतीच्या देवस्थानामुळे. या देवळाच्या गाभाऱ्यात भगवतीदेवीची चतुर्भुज सुंदर मूर्ती असून या देवळातील सरखेल कान्होजी आंग्रेचा नामोल्लेख असणारा शिलालेख इतिहास अभ्यासकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. कोटकामथ्याचा किल्ला, भगवती देवीचे मंदिर इतिहासप्रेमींनी न चुकता पाहावे असेच आहे.
‘महिषासुरमर्दिनी’ हे देवीचे सर्वमान्य रूप होय. महिषासुर नावाच्या उन्मत्त राक्षसाचा वध करणारी देवी म्हणून आपण महिषासुरमर्दिनीस ओळखतो. या रूपातील देवीची सर्वात सुंदर मूर्ती नाशिक जिल्ह्यातील मुल्हेर या किल्ल्यावर आहे. दुर्दैवाने ही मूर्ती उघडय़ावरच एका झाडाखाली ठेवलेली, असून तिचे रूप मात्र कोणाच्याही डोळ्याचे पारणे फेडेल असेच आहे. महिषासुर राक्षसास मारण्याचा संपूर्ण कथाभाग ही सुंदर मूर्ती पाहताना झर्र्झ आपल्या डोळ्यासमोरून तरळू लागतो. इतकी ही मुल्हेरगडावरील महिषासुरमर्दिनीची मूर्ती प्रत्ययकारी आहे.
ठाणे जिल्ह्यतील बेलापूरचा किल्ला आता अल्पसल्प स्वरूपातच उरला आहे. पण या गडाची गडदेवता गोवर्धनीमाता हे देवी स्थान जीर्णोद्धारामुळे सुस्थितीत राहिले आहे. नवरात्रात मोठा उत्सव साजरा करण्यात येणाऱ्या या मंदिरातील गाईला टेकून उभारलेली देवीची मूर्ती फारच लावण्यमयी आहे. या गोवर्धनीमातेची मूर्ती महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यात आपल्या रूपामुळे वेगळी ठरते.
जळगाव जिल्ह्यतील चाळीसगांवापासून फक्त १८ कि.मी. अंतरावर असणारा कन्हेरगड हा गौताळा अभयारण्यातील किल्ला फारसा कोणास माहीत नाही. या किल्ल्याच्या पायथ्याला पाटणादेवीचे पुरातन मंदिर आहे. देवीची गाभाऱ्यातील भव्य-दिव्य मूर्ती, मंदिरासमोरील दोन भव्य दगडी दीपमाळा व या मंदिर परिसरात असणारी प्राचीन शिल्पे हे सर्व भान हसून पाहावे असेच आहे. या ठिकाणी प्रसिद्धी गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती ग्रंथाबद्दलची महिती असणारा शिलालेख भारतीय पुरातत्त्व विभागाला मिळाला. याच भास्कराचार्यानी गणिताची शून्याची संकल्पना मांडून गणिताचे एक नवे युग सुरू केले. त्यामुळे पाटणादेवी मंदिरास फार महत्त्व आहे. याच मंदिराच्या शेजारी पितळखोरे लेणी असून तीही कन्हेरगड पाटणादेवी भेटीत पाहता येतात.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड पायथ्याचे श्रीक्षेत्र माहूर हे जागृत शक्तिपीठ पाहिल्याशिवाय गडकोटांवरील देवीमहात्म संपणार नाही. माहूर येथे रेणुकादेवी कशी स्थिरावली यासंब्ांधीची माहिती रेणुका महात्म व स्कंदपुराणात अभ्यासाला मिळते. यादव काळापासून माहूरच्या रेणुकादेवीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेले. माहूरगडाच्या भेटीत माहूरगडावरची महाकाली देवी, माहूरचे ऐतिहासिक संग्रहालय व माहुरची रेणुका माता सर्वानी अवश्य पाहावी अशीच आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील गडकोटांवर अनेक देवीदेवता असून खरेतर हा विषय स्वतंत्र ग्रंथाचाच आहे. अजिंक्यतारा गडावरील मेंगाईदेवी, वसईच्या किल्ल्यावरील चिमाजी आप्पांना पावलेली वज्रेश्वरी देवी, भूषणगडावरील हरणाई माता, अहिवंत गडावरील दशभुजा भवानी, भवानीगडावरील भवानीमाता, नारायणगडावरील मुक्ताईमाता, अंजनेरीगडावरील अंजनीमाता, भिलाईगडावरील भवानी माता, लळिंगगडावरील दुर्गामाता अशा अनेक देवीदेवता अभ्यासकांच्या प्रतीक्षेत आहेत. गडकोटांवरील देवदेवता, त्यांचे स्थळ महात्म्य, मंदिर व मूर्ती वर्णन, त्यांच्या उत्पत्तीच्या पुराणकथा अशा अनेक अंगाने या सर्व देवींचा अभ्यास होण गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...