चंद्रवंशीयांच्या यादव कुळातील अनेक शाखांपैकी वृष्णीवंशात सामंत वसुदेवापोटी जन्म घेतलेल्या श्री कृष्णाने आपल्या मामा कंसाचा वध करून मथुरेला आपली गादी स्थापन केली. जरासंधाच्या सततच्या आक्रमणामुळे द्वारका नगरीची स्थापना करुन कृष्णाने आपली गादी व्दारकेला हलवली.
पुढे अंतर्गत यादवीमुळे श्रीकृष्णाच्या प्रद्युम्न या पुत्राचे सुबाहु-दृढप्रहार वैगरे वंशज महाराष्ट्रात आले. सेऊनदेश येथून राज्य करणाऱ्या या यादवांनी पाचव्या भिल्लमाच्या काळात 'देवगिरी' राज्याची स्थापना केली. यादवांचा दरबारी हेमाद्री पंत याच्या 'हेमाद्रीव्रतखंड' या ग्रंथात हि वंशावळ मिळते. पण याहूनही सबळ पुरावा ठरतो तो सिंघणदेवाचा इ.स. १२१६ चा श्रीकरहाड (कराड) येथील शिलालेख..
या शिलालेखात यादवराजा सिंघणदेवाला पृथ्वीवल्लभ, महाराजाधिराज, राज परमेश्वर आणि प्रतापचक्रवर्ती अशा गौरवशाली राजउपाधी तर आहेतच पण महत्त्वाचे म्हणजे ते स्वतःला अभिमानाने 'श्रीद्वारावतीपुरवराधीश्वर' अर्थात व्दारकेचे राजे, 'विष्णुवंशोद्भव' अर्थात विष्णुच्या (श्रीकृष्णाच्या) वंशात जन्मलेले किंवा विष्णु ज्यांच्या वंशात अवतरीत झाला असे, आणि '(श्री)जादवकुलकमलकलिकाविलासभास्कर' अर्थात जाधवांच्या कुळ कमळाची कळी फुलवणारा भास्कर (सुर्य) या उपाधी अगदी नावापुढे अभिमानाने लावून गौरवान्वीत करतात.
या एकाच शिलालेखामधून अनेक गोष्टी स्पष्ट होतात..
१) देवगिरीचे यादव हे दक्षिणी होयसळ यादव नसून व्दारकेचे उत्तराधिकारी आहेत.
२) हे यादव स्वतःला अभिमानाने कृष्णाचे वंशज समजत असत. यादवांचा चंद्रांकीत कृष्णध्वज (काळा ध्वज) हाच देवगिरीचा राजध्वज होता असे मत अनेक अभ्यासक नोंदवतात.
३) यादव स्वतःसाठी 'जाधव' हे उपनाम कमीतकमी ८०० वर्षांपूर्वीपासून वापरत आहेत. याच पाचव्या सिंघणदेवाचे पुत्र कृष्ण (कान्हरदेऊ) हे देखील इ.स.१२४८ च्या मानूर शिलालेखात स्वतःला 'जादवकुलटीलक' म्हणवतात. याच कालखंडात उत्तरेतील कृष्णशाखांनी यादव कुलनाम सोडून जादव, जादौन, जडेजा, भाटी इत्यादी उपनामे स्विकारली होती.
स्वप्नील महेंद्र जाधवराव.
नमस्कार मी राजेद्र यादव . तुमची माहिती आवडली पण अजून हि यादव आडनाव लावणारे आहेत . जसे अर्जोजीराजे यादव , गिर्जोजिराजे यादव . आम्ही ही अजून यादव आडनाव लावतो . काही सोलस्कर यादव लावतात.
ReplyDeleteसातारा जिल्ह्यातील पारगाव , गुळुंब, सोलशी, घाटदारे, अशा बऱ्याच गावा मध्ये यादव क्षत्रिय मराठा आहेत. छत्रपती चा काळात आम्हाला इनामे मिळाली होती. आमचे वंश - चंद्र ,गोत्र - अत्री , देवक - पानकणीस असे लावतो.