भाग ९
पुढे इसवीसन 1726 मध्ये उदाजीराव व छत्रपती शाहू महाराज यांच्या मध्ये जो तहनामा झाला त्यात उदाजीरावांना गुजरात व माळवा प्रांतावरील चौथाई व सरदेशमुखीचा अखत्यार दिला असल्याचे स्पष्ट आहे ; व त्याप्रमाणे यावेळी गुजरातेत उदाजीरावां कडुन हक्क वसुलीचे काम चालले होते. परंतु गुजरातेत उदाजीरावां प्रमाणेच पिलाजी गायकवाड व कदम बांडे या दाभाड्यांकडील सरदारांनीही त्या प्रांतात आपला जम बसवण्याचे काम चालवले असल्याने, गुजरातेतील उदाजीरावांच्या प्रयत्नांना या सरदारांकडून बराच अडथळा होत गेला. कित्येक वेळा उभयतांच्या चकमकी झाल्या व त्यात अनेक प्रसंगी उदाजीराव यांची सरशी झाली ; तथापि अखेरीस डभोई व बडोदा हे किल्ले उदाजीरावांना पिलाजी गायकवाड यांच्या स्वाधीन करावे लागले . गुजरातेत उदाजीरावांना अशी माघार घ्यावी लागली ; तेव्हा ते पुढे माळव्यात धार कडे निघून गेले. तथापि त्यानंतर त्यांनी गुजरातेतील आपला प्रयत्न अगदी सोडून दिला असे म्हणता येत नाही.
यापुढे उदाजी पवार ,कंठाजी कदम बांडे व पिलाजी गायकवाड यां त्रिवर्गाही काही मनसुब्याचे प्रसंगाकरता छत्रपती शाहू महाराजांनी हुजूर बोलावून घेतले होते.(शा.म.रो.ले. 25 तारीख 19 मार्च 1727)
इसवीसन 1727 च्या पावसाळ्यानंतर उदाजी पवार पुन्हा चिमणाजीआप्पा बरोबर गुजरातच्या स्वारीवर आले. यावेळी गुजरातचा सुभेदार सर बुलंद खान याच्याशी मराठ्यांची चौथाई वगैरे हक्क वसुली संबंधाने बोलणे चालले होते, परंतु उभयंतात करार-मदार कायम झाले नाहीत ; तेव्हा या मराठा सरदारांनी आपल्या वहिवाटीप्रमाणे मुसलमानी मुलखातून हल्ले करून खंडणी वसूल केली. त्यानंतर गोध्रा दोहद मार्गाने चिमणाजीआप्पा उदाजी पवार माळव्यात आले. रस्त्यात चापानेर किल्लाही त्यांनी जिंकला.(irvine)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment