विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 25 March 2022

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…भाग ३

 

दंडकारण्याचे महाराष्ट्र होताना…
लेखक ::– डॉ. सदानंद मोरे
(सौ .साप्ताहिक सकाळ )

भाग ३
दत्तोपंत पोतदारांची निरीक्षणे वस्तुस्थितीस धरूनच असल्याचे म्हणावे लागते. राजवाड्यांमधील ब्राह्मण्याच्या ज्या उत्कट अभिमानाचा ते उल्लेख करतात, त्याने राजवाड्यांची इतिहासमीमांसा झाकोळून गेली आहे. वरील लांबलचक उताऱ्यात त्यांनी महाराष्ट्र हा ब्राह्मण मराठ्यांच्या व म्हणून त्याची काळजी ब्राह्मण मराठ्यांनाच, असे म्हटले असले आणि त्यामुळे ते सकृत्‌दर्शनी ब्राह्मण मराठा युतीचे पुरस्कर्ते वाटत असले, तरी विश्लेषणाअंती त्यांनी मराठ्यांना कसे दुय्यम ठरवले आहे, ते दिसून येईल. महाराष्ट्राच्या प्राचीन वसाहतीकरणाचा जो इतिहास त्यांनी मांडला, त्यातून हे चित्र स्पष्ट होते. हा इतिहास मांडताना त्यांनी महाराष्ट्रातील हजारो ग्रामनामांची जी व्युत्पत्तीशास्त्रीय छाननी केली, त्यावरून त्यांना पारंपरिक यास्क,पाणिनी, पतंजलींसारख्या नैरूक्तिकांच्या डोक्यावर बसवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरला नाही. ते इतिहाससंशोधक म्हणून अधिक गाजले असले, तरी ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांनी भाषाशास्त्रज्ञ आणि वैयाकरण या नात्याने त्यांची कामगिरी अधिक महत्त्वाची असल्याचे मानले होते. महाराष्ट्राच्या प्राचीन अथवा वासाहतिक इतिहासाची राजवाड्यांची मांडणी मुख्यत्वे भाषेच्या पायावरच आधारित आहे. पाणिनी, कात्यायन, पतंजली अशा व्याकरणकारांच्या लिखाणाचे ऐतिहासिक भाषाशास्त्राच्या अंगाने विश्लेषण, पुराणग्रंथातील उल्लेख आणि प्रचलित ग्रामनामांच्या व्युत्पत्त्या या साधनसामग्रीच्या जोरावर आणि अर्थातच आर्यवंशश्रेष्ठत्व आणि गौणत्वाने ब्राह्मणमराठा वर्चस्व; परंतु प्राधान्याने व अंतिमतः ब्राह्मणवर्चस्व या गृहितकांच्या आधारावर राजवाडे आपली इतिहासाची इमारत उभी करतात.
या इतिहासाच्या पहिल्या भागाची मांडणी आपण यापूर्वीच केली आहे. नर्मदेच्या पलीकडे, उत्तरेतील विशेषतः मगध नावाच्या महाराष्ट्रातील चातुर्वर्ण्याधिष्ठित सनातन वैदिक धर्मावर बौद्ध-जैन लोकायतादी अवैदिक पाखंडे आणि नंद व मौर्य घराण्यांतील शुद्ध क्षत्रियांचे द्वेष्टे असणारे सत्ताधीश यांच्या रूपाने कोसळलेल्या दुहेरी संकटातून सुटका करून घेण्यासाठी तेथील महाराजिक ऊर्फ महाराष्ट्रीक गणाच्या लोकांनी दक्षिणेत स्थलांतर करून तेथील दंडकारण्यात वसाहती केल्या. त्यांचाच मार्ग कुरुपांचालदेशातील राष्ट्रिकांनी आणि उत्तरकुरू व उत्तरमद्रातील वैराष्ट्रिकांनीही अवलंबला. पुढे या तिघांचाही उल्लेख महाराष्ट्रीक या सामान्य नावानेच होऊ लागला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...