भारतीय इतिहासाला ज्याप्रमाणे योद्ध्यांनी झळाळी चढवली, त्याचप्रमाणे त्या इतिहासाला पराक्रमाच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले कित्येक वीरांगणांनी. त्यापैकीच एक म्हणजे महाराणी ताराबाई भोसले होत!
ताराबाई, ताराराणी, महाराणी ताराराणी, मोंगलमर्दिनी ताराराणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणीं शिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराराणी वयाच्या ८ व्या वर्षी यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी झाला. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही राणी डगमगली नाही.
1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छ. संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले. 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत अमानुषपणे यातना देऊन त्यांची हत्या केली आणि अखंड स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं.
राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या पोटी शिवाजी (दु) यांचा जन्म विशाळगडावर झाला.
१७०० साली राजाराम महाराजांचेही निधन झाले. वैधव्याचे दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोवला, मराठा राज्याची राजसूत्रे आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. २५ वर्षीय महाराणी ताराबाईंनी 1701 साली आपला पुत्र शिवाजी (दु) यांना पन्हाळा येथे राज्याभिषेक करवून घेतला. र ाज्यकारभार आपल्या हातात घेतला आणि मराठा साम्राज्याची पताका पुन्हा उंचावली.
पतीनिधनानंतर 61 वर्षं त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या.
इतिहासकार खाफीखान लिहितात, "ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला. तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन त्यानी राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली.सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले.
दक्षिणेतील सहा सुभ्यांवर स्वाऱ्या करण्याकरिता, नव्हे माळव्यातील सिरोंज आणि मंदसोर या प्रदेशापर्यंत हल्ले चढविण्यातरिता सैन्य पाठविण्याची तिने अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांची अंतःकरणे त्यानी त्याकरिता अशी काही आपलीशी करुन घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपावेतो जे जे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी ठरले." (संदर्भ- जदुनाथ सरकार, इंडिया अंडर औरंगजेब)
1699 पासून 1701 पर्यंत औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिऴत गेलेले होते, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचविण्याचे सर्व श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते.
1707 साली औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. आता शाहू महाराज(छ. संभाजी महाराज यांचे पुत्र छ. शाहू) आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला.
शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराराणींच्या पक्षातले एकेक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले.
शाहू राजांनी ताराराणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला.
काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे.
1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांनी अचानक ताराराणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला. ताराराणी आणि शिवाजी (दुसरे) यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेतच शिवाजी (दुसरे) यांचा 1727 साली मृत्यू झाला.
अखेरीस 1730 साली शाहू राजांतर्फे श्रीनिवासराव प्रतिनिधी संभाजी राजांवर चालून गेले. या युद्धामध्ये संभाजी(दुसरे) राजांचा पराभव झाला.
ताराबाईंना शाहू महाराजांनी साताऱ्यातच ठेवून घेतले. सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तेथे राहिल्या. (संदर्भ-मराठी रियासत खंड-3, गोविंद सखाराम सरदेसाई)
ताराबाई यांचा हा निर्णयही मराठा सत्तेसाठी एक महत्त्वाचा निर्णय होता. त्या कोल्हापूरला गेल्या असत्या तर सध्याच्या इतिहासात थोडा बदल झाला असता.
सातारच्या शाहू महाराजांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपला अज्ञातवासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार रामराजे हेच साताऱ्याचे वंशज ठरले. म्हणजे ताराबाई यांना कोल्हापूरमधून जरी बाहेर पडावे लागले असले तरी त्या आपला वंश साताऱ्यात कायम करण्यात यशस्वी झाल्या.
25 डिसेंबर 1749 रोजी शाहू राजांचा मृत्यू झाला. त्यानंतर रामराजे साताऱच्या गादीवर आले.
4 डिसेंबर रोजी 1761 रोजी ताराबाई यांचं निधन झालं.
ताराराणी एक आक्रमक राजकारणी होत्या. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते. म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेचप्रसंगातून मार्ग काढू शकल्या.
महाराणी ताराराणी हे मराठ्यांच्या इतिहासातले एक विलक्षण पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला.
आशा मोंगलमर्दिनी ताराराणी ला मनाचा मुजरा
आमचे असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमच्या फेसबुक page .................. ला follow करायला विसरू नका.
जय भवानी जय शिवाजी
No comments:
Post a Comment