विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

किल्ले साहेबगड: महादजींचे एक अधुरे स्वप्न

 

किल्ले साहेबगड: महादजींचे एक अधुरे स्वप्न
 संकलन व लेखन:प्रमोद करजगी


अलिजाबहादूर महादजी शिंदे यांचे बरेचसे आयुष्य हे उत्तर हिंदुस्थानात व्यतीत झाले. तेथे राज्य करणारे राजपूत, जाट, मोंगल व इतर संस्थानिक याना त्यांनी आपल्या लष्करी ताकदीने नामोहरण करून मराठी सत्तेच्या नियंत्रणात आणले होते. या संस्थानिकांचे वैभव, त्यांनी बांधलेल्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती व प्रचंड असे वाडे बघून ते निश्चितच प्रभावित झाले असतील. हिंदुस्थानातील आपल्या मांडलिक राजांच्या भव्य अशा इमारती व राजवाडे बघून त्याच धर्तीवर आपले स्वतःचे एक शहर आपल्या राजधानीच्या स्वरूपात वसवावे असे त्यांच्या मनात खचितच आले असेल. छत्रपती शाहू महाराजांच्याप्रमाणे व पेशव्यांच्याप्रमाणे आपले एक सत्ताकेंद्र असावे, उत्तर हिंदुस्थानातील लढाया व राजकारण यातून सवड मिळेल तेव्हा दक्षिणेत आल्यावर महाराष्ट्रात आपल्या विश्रांतीसाठी एक हक्काचे ठिकाण असावे असा त्यांनी विचार केला असावा. त्या दृष्टीतून त्यांनी महाराष्ट्रात एखादे सोयीस्कर ठिकाण शोधण्यास सुरवात केली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील जांबगाव हे त्यांचे एक आवडते ठिकाण होते. ज्या ज्या वेळी महादजी शिंदे दक्षिणेत येत असत, त्या त्या वेळी काही दिवस का होईना त्यांचा मुक्काम जांबगावला होत असे. तसे म्हंटले तर जांबगावहुन पुण्याला जाणेयेणे सोयीस्कर होते. ज्याप्रमाणे पेशव्यांचे वास्तव्याचे ठिकाण पुणे हे मराठीशाहीचे सत्ता केंद्र छत्रपतींचे अधिष्ठान साताऱ्यापासून काही अंतरावर होते, त्याच धर्तीवर आपले राहायचे ठिकाण पेशव्यांच्या सत्ताकेंद्रापासून म्हणजे पुण्यापासून काही अंतरावर असावे असा त्यांचा विचार होता. जांबगाव हे गांव जरी भौगोलिक दृष्ट्या सपाट भूभागावर वसले होते, तरी तेथे असलेल्या एकमेव डोंगराने महादजीचे लक्ष वेधून घेतले. या डोंगरावर एक किल्ला बांधावा व त्याच्या खालील सपाट भूभागावर शहर स्थापन करावे असे त्यांनी ठरवले.त्या दृष्टीने१७७९च्या मध्यापासून त्यांनी बांधकामाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिरोजी इंदुलकरसारखा वास्तुशल्पकार सापडला होता, त्याप्रमाणे महादजींना कोणी बांधकामतज्ञ मिळाला होता का हे ज्ञात नाही. पण त्यांच्या स्वानुभवातून आपल्या राजधानीची रूपरेखा त्यांच्या मनात साकारली होती. ती रूपरेखा प्रत्यक्षात आकारताना कामावर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना आपला विश्वासू सल्लागार बाळाजी जनार्दन याची नेमणूक केली होती.
बाळाजी जनार्दन जांबगावकर यांचा अस्सल पत्रव्यवहार 'शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग ५वा 'मध्ये दिला आहे. बाळाजी जनार्दन यांचे आडनाव माहित नाही परंतु त्यांच्या आयुष्यातील उत्तर काळात ते बरीच वर्षे शिंद्यांच्या राजधानीच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी जांबगावला राहिले म्हणून त्यांना ‘जांबगावकार’ हे आडनाव प्राप्त झाले. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरकाळात त्यांनी जांबगावी मुक्काम करून अलिजाबहादूर महादजी शिंदे यांच्या राजधानीच्या उभारण्याचे काम पहिले. महादजी शिंदे यांचे यांचे जवळचे कारभारी मंडळ होते, त्यामध्ये बाळाराव गलगलेकर, आबाजी चिटणीस, सदाशिव बापूजी फडणीस, भवानीशंकर पोतनीस व बाळाजी जनार्दन जांबगावकर हे मुख्य होते.१७७३ते१७७९च्या काळात बाळाजी जनार्दन सतत महादजी शिंदे यांच्या बरोबर मोहिमेवर होते. १७७९च्या मे महिन्यात बाळाजी जनार्दन जांबगावी आले. जांबगावसारख्या छोट्या गावाची भरभराट करण्यात त्याकाळात त्यांनी मोलाचे योगदान दिले. या जागी नवीन बांधकामे करून या गावाला राजधानीचे स्वरूप आणण्यात त्यांनी अहं भूमिका बजावली. राणोजी शिंदेपासून महादजी शिंदे यांच्यापर्यंत शिंद्यांचे दक्षिणेतील प्रमुख स्थान सुरुवातीला औंध, नंतर श्रीगोंदे व शेवटी जांबगाव असे काळानुसार बदलत गेले. बाळाजी जनार्दन यांनी २० एप्रिल १७७९ रोजी पाठवलेल्या एका पत्रात महादजी शिंदे सडे (एकट्याने) जांबगावहून पुण्यास आले असा उल्लेख आहे. पेशव्यांचा व्रतबंध समारंभ आटोपल्यावर जून १७७९ पर्यंत त्यांचा मुक्काम जांबगावी होता.
माधवविलास व किल्ले साहेबगड: जांबगावला लागून एक लहान टेकडी आहे. तिथे एक किल्ला बांधायची त्यांनी तजवीज केली. त्याच्या आसपास देवळे व लोकांची वस्ती करावी असा विचार केला गेला. किल्ल्याभोवती खंदक खणून त्यात गावाजवळून वाहणारा जो ओढा आहे त्यातील पाणी सोडायची योजना त्यांनी केली. त्यायोगे किल्ल्याच्या दृष्टीने एक सरंक्षक खंदक तयार केला गेला. किल्ल्याचे बांधकाम करायला पाण्यासाठी किल्ल्यावर विहीर खणण्यास बाळाजी जनार्दन यांनी सुरुवात केली. चाळीस हात खणल्यावर विहिरीला पाणी लागेल असे जाणकारांनी सांगितले होते. त्यापैकी जवळपास तीस हात विहीर त्याकाळात खणूनपण झाली. यासाठी खर्च पांच सात लक्ष रुपये होईल अशी अपेक्षा होती.
महादजी शिंदे यांनी जांबगावचे नाव बदलून 'माधवविलास ' असे ठेवले असे काही पत्रामधून दिसून येते. तसेच जो किल्ला बांधायचा होता,त्या किल्ल्याचे नाव 'किल्ले साहेबगड' असे ठेवले होते. काही कारणामुळे किल्ल्याचे बांधकाम होऊ शकले नाही. महादजी शिंदे यांचा जो वास्तव्य करायचा राजवाडा बांधायचा होता, त्यावर बाळाजी जनार्दन यांनी सुरुवातीला लक्ष केंद्रित केले होते. जुलै १७७९ अखेरीस महादजींचा राजवाडा तात्पुरत्या स्वरूपात तयार झाला होता. राजवाड्याचे काम करायला लागणाऱ्या लाकडाचा पुरेसा पुरवठा वेळेवर होत नव्हता असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात एके ठिकाणी म्हंटलेले आहे. त्यामुळे महादजी यांच्या राजवाड्याचे काम पूर्णत्वाला जाऊ शकले नाही.
शिंद्यांच्या राजवाड्याच्या बांधकामाला लागणाऱ्या लाकडाचा तुटवडा होता असे कारण संयुक्तिक वाटत नाही. महादजी शिंदे यांच्याकडे एव्हढी संपत्ती व सत्ता होती की स्वतःच्या राजवाड्याचे बांधकाम करण्यासाठी हिंदुस्थातात लाकूड मिळाले नसेल हे खरे वाटत नाही.
महादजी यांचे जांबगावी वास्तव्य:महादजी यांचे जांबगावी वास्तव्य व जाणे येणे या संबंधात इतिहासात काही संदर्भ सापडतात.ऑगस्ट १७७९मध्ये महादजी शिंदे राहुरीहून जांबगावंस आले, तेव्हा त्यांचा मुक्काम या वाड्यात ऑक्टोबर १७७९पर्यंत होता. त्यानंतर ते मन्सूर अली शहा यांचे दर्शनास बीड येथे जाणार होते व तदनंतर देवी तुळजाभवानीच्या दर्शनार्थ तुळजापूरास कूच करणार होते. त्या सुमारास त्यांच्या बरोबरच्या अनेक सरदारांनी व अमीरउमरावांनी शिंद्यांच्या होऊ घातलेल्या नूतन राजधानीमध्ये आपापली घरे व वाडे बांधायला सुरुवात केली होती. बाळाजी जनार्दन याने सुद्धा आपल्याला राहायला असा एक वाडा बांधायला घेतला होता. डोंगरावरील किल्ल्याचे काम मात्र त्यासुमारास सुरु झाले नाही. त्यापूर्वी फेब्रुवारी-मार्च १७७७ च्या सुमारास त्यांनी जांबगावी मुक्काम केला होता असा उल्लेख ऐतिहासिक पत्रव्यवहारात आढळतो.१६ जुलै १७९२ च्या सुमारास महादजी आपल्या गावी जांबगावला आले होते आणि त्यांनी तेथे पंधरा वीस दिवस मुक्काम केला. त्यानंतर ते पेशव्यांना भेटायला पुण्यास गेले. नंतर ते तुळजापूरास देवीच्या दर्शनास गेले. तेथे त्यांनी मंदिरातील भोप्याच्या कन्येशी विवाह केला. नंतर ते जांबगावास परतले.
जांबगावचे भौगोलिक स्थान: महादजी शिंदे यांचा जांबगावचा राजवाडा अहमदनगरपासून एकतीस किलोमीटर तर पुण्यापासून साधारण एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे. हा राजवाडा अहमदनगर ते कल्याण रस्त्यावर असून तो ८५ एकर परिसरात विस्तारित आहे. किल्ल्यात शिरताना एका भव्य महादरवाज्यातून शिरावे लागते, त्याच्या दोन्ही बाजूस मजबूत बुरुज असून आत शिरल्यावर पहारेकऱ्याच्या राहायच्या खोल्या आहेत. राजवाड्याच्या पाठीमागे एक टेकडी आहे ज्यावर किल्ला बांधायचा महादजी शिंदे यांचा मानस होता. मागील बाजूस टेकडीच्या स्वरूपात नैसर्गिक तटबंदी आहे, तर उरलेल्या तीन ही बाजूस तटबंधी बांधलेली आहे. मुख्य राजवाडा आतल्या भागात बांधला आहे.मुख्य राजवाडा हा ६८ मीटर लांब व ४० मीटर रुंद आहे त्याला ही आपली वेगळी तटबंदी आहे. आतल्या तटाला सहा बुरुज आहेत. आतल्या वाड्यात एकशे पन्नास फूट खोल विहीर आहे. सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असून तेथे विद्यादानाचे पवित्र कार्य सुरु आहे.
एखाद्या राज्याची राजधानी वसवायची व ते शहर विकसित करायचे म्हणजे त्याला दीर्घ कालावधी लागतो. तसेच त्यासाठी मानसिक स्वास्थ्य लागते जे महादजींना धकाधकीच्या आयुष्यामुळे कधीच लाभले नाही. त्यात दुर्दैवाने त्यांचे निधन अकस्मात झाल्याने या कार्याकरिता आवश्यक कालावधी देता आला नाही. साहेबगडचे बांधकाम व्यवस्थित पार पडले असते तर अहमदनगर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून या राजवाड्याची ख्याती झाली असती. तरी सुद्धा मराठ्यांचा इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या इतिहासप्रेमींनी, विशेष करून महादजी शिंदे यांच्याबद्दल पूज्यभाव व आत्मीयता बाळगणाऱ्या जाणकारांनी या वास्तूस जरूर भेट द्यावी असे वाटते.
संदर्भ: शिंदेशाहीच्या इतिहासाची साधने भाग ५ वा, छायाचित्रे इंटरनेट साईटवरून

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...