ग्वाल्हेरकर सरदार मांढरे घराण्याची कुलस्वामिनी (ग्वाल्हेर,मध्यप्रदेश)
----------------------------------------------------------------
ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांसोबत सातारा जिल्ह्यातील अनेक घराणी उत्तरहिंदुस्थानात गेली.त्यापैकी एक सरदार मांढरे घराणे हे मराठा साम्राज्याच्या सेवेसाठी शिंदे सरकारांच्या नेतृत्वाखाली उत्तरेत दाखल झाले. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या आई काळुबाईच्या मांढरगडच्या पायथ्याला राहणारे हे पराक्रमी मांढरे घराणे.ग्वाल्हेर येथील सरदार मांढरेंच्या गावांची माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु याच मांढरगडाच्या परिसरात मांढरदेव,अभेपुरी,धावडी या गावात मांढरे मंडळी राहतात याच परिसरातून मांढरे घराणे ग्वाल्हेर येथे स्थयिक झाले असावे.
ग्वाल्हेरच्या सरदार मांढरे घराण्याने ग्वाल्हेरमध्ये देवीचे मंदिर बांधले.या मंदिरामागील इतिहास असा सांगितला जातो की,श्रीमंत महाराजा जयाजीराव शिंदे यांच्या कार्यकाळात मांढरे घराण्यातील सरदार आनंदराव शिंदे यांना आई जगदंबेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. आनंदराव मांढरे यांनी याकडे दुर्लक्ष केले.आनंदरावांना पुन्हा स्वप्नात देवीचे दर्शन घडले.यानंतर सरदार मांढरेंनी महाराजांना हि गोष्ट सांगितली.महाराजांनी त्वरित मंदिर बांधकामाचे आदेश देऊन देवीच्या मंदिर बांधकामाची जबाबदारी सरदार आनंदराव मांढरे यांच्यावर सोपवली. ग्वाल्हेर मधील लष्कर म्हणून भाग आहे या ठिकाणी एका टेकडीवर देवीचे मंदिर बांधण्यात आले.२९ एप्रिल १८७३ साली महाराजांच्या हस्ते देवीची पूजा-अर्चना,अन्नदान करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.
निलेश करकरे लिखित तवारीख-ए-शिंदेशाही या पुस्तकामध्ये देवीच्या दृष्टांतासंबंधी सांगितले आहे हे खरे असेलच परंतु शिंदे राजघराण्याची कुलदेवता आई तुळजाभवानीचेच रूप असणारी मांढरगडनिवासी आई काळुबाई हि सरदार मांढरे घराण्याची कुलस्वामिनी. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपल्या मातीला व आपल्या आईला कधीही विसरत नाही.याच भावनेतुन सरदार मांढरेंनी आपली कुलस्वामिनी जिच्या कृपाशीर्वादाने आपल्याला वैभव प्राप्त झाले तिची सेवा आपण व आपल्या पिढी-दरपिढीने नित्य करावी म्हणुन ग्वाल्हेर याठिकाणी आपल्या कुलस्वामिनीचे मंदिर बांधले असावे.
आज हि या मंदिराची देखरेख आणि पुजा सरदार मांढरे घराण्याकडून केली जाते.सिंधिया देवस्थान ट्रस्ट कडून मंदिराची देखभाल व नैवेद्य वैगेरे दिला जातो. दरवर्षी दसऱ्याच्या सणाला महाराज ज्योतिरादित्य शिंदे सरकार देवीच्या दर्शनाला येतात.याठिकाणी महाराज आपट्याच्या पानांचे पूजन करून दसरा साजरा करतात.
नवरात्र व इतर सण या ठिकाणी भक्तिभावाने साजरे करून सरदार मांढरे घराणे आपल्या कुलस्वामिनीची मोठ्या श्रद्धेने सेवा करतात.
-----------------------------------------------------------
©प्रसाद शिंदे
No comments:
Post a Comment