विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 April 2022

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज

 

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज
पोस्तसांभार :: © श्रीमंत राजेभोसले वावीकर

श्रीमंत राजेभोसले वावीकर घराण्यातून दत्तक घेण्यात आलेले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे चार विवाह झाले होते. त्यांचा चौथा विवाह भवानजी राजे शिर्के यांची कन्या आनंदीबाई यांच्या सोबत २५ मार्च १७८६ रोजी झाला. त्यांना तीन पुत्र झाले.
१. प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब महाराज
२. रामचंद्र उर्फ भाऊसाहेब महाराज
३. शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराज
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचा जन्म १८ जानेवारी १७९३ रोजी झाला. त्यांचं जन्मानंतर पेशवाईतून मुक्त होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज धाकटे यांनी १७९८ ला प्रयत्न केला. त्यात त्यांना अपयश आल्याने दुसरा बाजीराव पेशवे याने छत्रपती आणि राजपरिवार यांच्या भोवती फास आवळला. त्यानंतर प्रतापसिंह महाराज, रामचंद्र महाराज, शहाजी महाराज यांना शिक्षण घेण्यास अडचणी येऊ लागल्या. तेच त्यांच्या मातोश्री आनंदीबाई साहेब यांनी रात्री अडीच वाजता आपल्या मुलांना उठवून शिकवून पहाटे पाच वाजता परत झोपवले आणि त्यांना सर्व शास्त्रात पारंगत केले.
छत्रपती शाहू महाराज धाकटे यांचे ४ मे १८०८ ला दुःखद निधन झाले. छत्रपती शाहू महाराज धाकटे यांच्या मातोश्री सगुणाबाई साहेब यांनी प्रतापसिंह महाराज याना तेरावे दिवशी १६ मे १८०८ ला वयाच्या पंधराव्या वर्षी सिंहासनावर बसवून राज्यारोहण करण्यात आले. त्यांचे वय कमी असल्याने सुरुवातीला स्वराज्याचा कारभार त्यांच्या मातोश्री आनंदीबाई साहेब यांनी पहिला. सन १८१२ नंतर छत्रपती राजघराणे आणि पेशवे यांच्यात तेढ वाढू लागला होता. यातच ९ नोव्हेंबर १८१७ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज याना वासोट्याच्या किल्ल्यावर बंदोबस्तात ठेवले होते. १४ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी पेशवाईच्या विरोधात चालून आले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी इंग्रजांशी संधान साधू नये म्हणून बाजीरावाने त्यांना कुटुंब कबिल्यासह सिद्धटेक येथे लष्करी छावणीत बोलावून घेतले आणि त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची प्रचंड फरपट केली. काही दिवसातच बाजीराव छत्रपतींना सोडून पळून गेला. ४ मार्च १८१८ ला
बेलसर येथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची इंग्रज अधिकारी यांची भेट झाली. १० मार्च १८१८ ला महाराजांचे साताऱ्यात आगमन झाले. महाराजांचे आगमनाने सातारकर जनता खुश झाली होतो, त्यांनी जागोजागी गुढी उभारून त्यांचेच स्वागत केले. ११ मार्च १८१८ ला श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे पुन्हा राज्यारोहण करण्यात आले.
एल्फिन्स्टनने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्याशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरी साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना बरीच मदत केली. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या. एप्रिल १८२२ ला स्वराज्याचा संपूर्ण कारभार श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या हाती आला. महाराज हे अतिशय सुसंस्कृत, निर्व्यसनी, उदार, स्पष्ठवक्ते, आणि अतिशय मानी होते. आपण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचा त्यांना प्रचंड अभिमान होता.
राज्याची उत्तम व्यवस्था -
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सातारा शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा सुरू केली आणि त्या शाळेमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाईही होती. महाराजांना वाचनाची आवड असल्याने त्यांनी स्वतःचे ग्रंथालय देखील सुरु केले होते.
व्यापाऱ्यांनी सातारा राजधानीत येऊन व्यापार करावा म्हणू राजपथ बांधून त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने थाटण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्यासाठी १९ विहिरी, पाण्याचे हौद बांधून नव्या पेठा वसवल्या. १८२२ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराजांनी स्वतःच्या आर्थिक खर्चात कपात करून तात्काळ १ लाख रुपये उपलब्ध करून दिले. वेठबिगारी बंद करून गोहत्या बंदी कायदा स्वराज्यात लागू केला.
सन १८२६ मध्ये एल्फिन्स्टनने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची भेट घेतली आणि लिहून ठेवले" मराठ्यांचे कुळात प्रतापसिंहाइतका सुसंस्कृत पुरुष दुसरा मला आढळला नाही. त्याने राज्यात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली असून रस्ते, पूल, पाण्याची टाकी अशा सोयी जागोजागी निर्माण करून लोकसुखासाठी तो सारखा झटत आहे." ६ ऑक्टोबर १८३३ ला गव्हर्नर लॉर्ड क्लेअर याने महाराजांची भेट घेतली अन लिहून ठेविलें "लोकांस विद्यादान देण्याची प्रतापसिंहास मोठी हौस असून त्याने साताऱ्यास पाठशाळा घातली आहे. त्यात इंग्लिश , पारशी, मराठी या भासग शिकवल्या जातात." जॉन ब्रिग्ज म्हणतो "महाराजांचे पोलीस दल कोणत्याही बाबतीत आमच्यापेक्षा कमी नाही." महाराजांनी साताऱ्यात दोन तुरुंगही बांधले होते. न्यायालयांची स्थापना करून अनेकदा महाराज स्वतः न्यायदानास बसत असत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण महाराजांनीच विकसित केले होते. महाराजांनी सातारा ते महाबळेश्वर पुढे प्रतापगड आणि नंतर महाड पर्यंत रस्ता तयार केला. मुंबईचा गव्हर्नर सर जॉन मॅल्कम हे महाबळेश्वर येथे आल्यावर महराजनी तिथे पेठ वसवली. खरं तर या सर जॉन मॅल्कम यांची इच्छा होती की त्या पेठेला छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे नाव द्यायचे पण महाराजांनी याला आदरपूर्वक नकार दिला. पुणे सातारा हा देखील मार्ग महाराजांनी तयार करवून घेतला.
सन १८२८-२९ मध्ये छत्रपतींना क्षत्रियकुलावंतस म्हणण्यास नकार देणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी महाराजांनी २४ मुद्दे निश्चित करून त्यावर चर्चा करण्यासाठी धर्म परिषद बोलावली. परिषदेच्या निर्णयाच्या दिवशी अनुचित प्रकट टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. स्वतः महाराज परिषदेच्या बाहेर तलवार घेऊन उभे होते. धर्म परिषदने क्षत्रियांचे अस्तित्व मान्य करून त्यांचे अधिकार मान्य केले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांना आपले मराठा राज्याचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची इच्छा होती. परंतु त्यांच्याविरुद्ध सारखीच कटकारस्थाने चालू होती. विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. ब्रिटिशांचा हस्तक बाळाजीपंत नातू याने बाजीरावांचा बीमोड करून मराठा राज्य इंग्रजांच्या घशात घालण्यासाठी केवळ स्वार्थापोटी अनेक कारस्थाने करून इंग्रजांना मदत केली होती. छत्रपतींनी राजद्रोहाचा आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला.शेवटी इंग्रजांविरुद्ध कट केल्याचा खोटा आरोप लादून ४ सप्टेंबर १८३९ रोजी त्यांना पदच्युत करून त्यांचा धाकटा भाऊ श्रीमंत आप्पासाहेब महाराज (शहाजी) यास छत्रपती म्हणून सातारच्या गादीवर बसविले व काशीला (बनारस) छत्रपती प्रतापसिंहांना स्थानबद्धतेत राजकुटुंबासह ठेवण्यात आले. छत्रपती प्रतापसिंहानी ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर व ब्रिटिश पार्लमेंट यांपुढे रंगो बापूजी गुप्ते यांस इंग्लंडमध्ये पाठवून व इंग्लंडमधील काही प्रतिष्ठित इंग्रजांमार्फत आपली सत्य बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला; पण यश आले नाही. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते.
काशी मुक्कामी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सेनापती बळवंतराव राजेभोसले वावीकर यांचे चिरंजीव त्रिंबकजी याना दत्तक घेतले. त्यांचे नाव बदलून त्यांना शहाजी उर्फ शाहू हे नवीन नाव देण्यात आले. त्यांनाच जंगली महाराज या नावाने ओळखले जाते. अखेर रंगों बापूजी परत येण्यापूर्वीच काशी येथे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे स्थानबद्धतेत दुःखद निधन झाले.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्यकाळात त्यांना सेनापती बळवंतराव राजेभोसले वावीकर यांनी प्रचंड साथ दिली. गोविंदराव दिवाण, यशवंतराव शिर्के, रंगो बापूजी, शेडगावकर आणि हिंगणीकर राजेभोसले तसेच दिनकरराव मोहिते हंबीरराव, बळवंतराव चिटणीस, रघुनाथराव गुजर, तारळेकर राजे महाडिक आणि इतरही जुन्या नामवंत छत्रपतींचा इमान राखणाऱ्या सरदार मंडळींनी एकमेकांना स्वराज्याच्या कामी पूर्ण साहाय्य केले.
अशा सुसंस्कृत, लोकाभिमुख कार्य करणाऱ्या, लोकहितवादी श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना आज जयंती दिनी त्रिवार मनाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...