विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

पालखेडची लढाई आणि मुंगी शेवगाव तह🚩 आणि मराठ्यांचे परंपरागत गनिमी युद्धतंत्र

 

पालखेडची लढाई आणि मुंगी शेवगाव तह🚩
आणि मराठ्यांचे परंपरागत गनिमी युद्धतंत्र
पोस्तसांभार ::ज्योती बावणे 



पहिला बाजीराव आणि निजाम-उल-मुल्क यांच्यामध्ये १७२८ साली औरंगाबादच्या नैऋत्येस २८ मैलांवर (सु. ४५ किमी.) असलेल्या पालखेड (गोदावरी नदीच्या तीरावर महाराष्ट्रातील सध्याच्या पुणतांबे गावाजवळ) येथे झालेला संग्राम. जगाच्या इतिहासात एक महत्त्वाची रणनीती म्हणून या संग्रामाचा उल्लेख होतो. बाजीरावांच्या रणनीती आणि राजकारणचातुर्याने प्रभावित होऊन शाहू महाराजांनी बाजीरावांना वयाच्या १९व्या वर्षीच पेशवाईची वस्त्रे दिली होती आणि बाजीरावांनी तो विश्वास या लढाईत सार्थ करून दाखविला.
पार्श्वभूमी : बाजीरावांनी १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदाचा पदभार घेतल्यानंतर लागलीच ते आलमखानाबरोबर मोहिमेवर गेले. पालखेडमधील त्यांचा प्रतिस्पर्धी निजाम-उल-मुल्क याच्या बरोबर त्यांची पहिली भेट ४ जानेवारी १७२१ रोजी चिखलठाण्यात आणि दुसरी २३ फेब्रुवारी १७२३ रोजी झबुवाजवळ बलाशामध्ये झाली. या भेटींदरम्यान आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान असलेल्या बाजीरावांची कर्तबगारी चलाख निजामाने हेरली. दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशाहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारीझखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ रोजी शक्करखेडा लढाईत मुबारीझखानाचा पराभव झाला. निजामाने मराठ्यांना ‘चौथाई’ देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला.
२० जून १७२५ रोजी बादशाहाने निजामाला दख्खनचा सुभेदार नेमले. लागलीच आपमतलबी निजामाने मराठ्यांविरुद्ध कारस्थाने सुरू केली. १७२५ आणि १७२७ मध्ये बाजीरावांनी कर्नाटकामध्ये मोहिमा काढल्या. याच काळात १७२७ मध्ये निजामाने शाहू महाराजांचे चुलतबंधू कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्याशी संधान बांधले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की, छत्रपतिपदाचा हक्क उभयता दोन्ही बंधूंनी निश्चित करावा व मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. वास्तविक शाहू महाराजांनी कृष्णा आणि घटप्रभा नद्यांदरम्यानच्या प्रदेशाची मालकी संभाजीराजांना देऊ केली होती; परंतु त्यांना ते मान्य नव्हते. निजामाची ही विनाकारण लुडबुड शाहू महाराजांना आवडली नाही. शाहूंच्या छत्रपतिपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव होता. बाजीरावाने हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली होती. निजाम आणि संभाजी महाराज यांच्या सैन्याची हालचाल साताऱ्याच्या दिशेने होत असल्याची बातमी शाहू महाराजांना मिळाली. त्यांचा कट्टर शत्रू उदाजी चव्हाण साताऱ्याला शह देण्याच्या इराद्याने रहिमतपूरजवळ पोहोचला होता. निजामाच्या कारस्थानांची खात्री शाहू महाराजांना पटली. निजामाला धडा शिकविणे आवश्यक होते. १७२७चा पावसाळा संपताच बाजीराव फौजेनिशी निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बऱ्हाणपूर, सुरत इ. भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाच्या सैन्याला बेजार केले. चपळाईने विविध ठिकाणी हल्ले करून शत्रूला दमविण्याच्या रणनीतीमुळे निजामाचा तोफखानाही निरुपयोगी ठरला.
बाजीरावांची रणनीती : बाजीरावांची मदार सर्वथा घोडदळावर होती. निजामाच्या पाऊण ते एक लाख सैन्याविरुद्ध बाजीरावांच्या सेनेची संख्या फक्त पंचवीस ते तीस हजारांच्या घरात होती; परंतु शत्रूच्या संख्या वा शस्त्रबलाची पर्वा बाजीराव करत नसत. बुद्धिचातुर्यपूर्ण डावपेचांवर त्यांचा भर असे. शत्रूला वेढा घालणे, त्याची रसद तोडणे आणि त्याचा पाणीपुरवठा अडवणे यांसारख्या मार्गांचा परिणामकारक उपयोग करून शत्रूला गुडघे टेकविण्यास ते भाग पाडत. शक्यतो युद्ध न करता आणि आपल्या सेनेची वाताहत न होऊ देता प्रतिपक्षी सेनापतीचे मनोधैर्य खच्ची करून त्याच्यावर मनोवैज्ञानिक विजय मिळविण्याची अफलातून कला बाजीरावांना साध्य होती.
या वेळी आपल्या गती क्षमतेचा फायदा घेऊन मुघल सैन्याला लांब पल्ल्याचा पाठलाग करावयास भाग पाडायचे, ते थकून जेरीस आल्यावर त्यांना आपल्या निवडीच्या जागेच्या साठमारीत पकडायचे, रसद तोडून उपासमार करायची आणि शरण आणायचे, ही त्यांची योजना होती.
मराठा सैन्यापाशी तोफखाना नाममात्र होता; उलट, निजामाकडील तोफांचा संभार प्रबळ होता. हा असमतोल भरून काढण्याचा एकच उपाय होता, तो म्हणजे निजामाचा तोफखाना रणांगणाजवळ पोहोचण्याअगोदरच अडसर घालायचा. म्हणजेच शत्रूच्या सैन्याची त्याच्या तोफखान्यापासून ताटातूट करण्याची नीती! ही किमया बाजीरावांनी अद्भुत रीत्या साधली. पालखेडची लढाई हा या सर्जनशील रणनीतीचा बेजोड आविष्कार होता.
घोडदळाचा भर गतिमानतेवर असतो. ही वावटळ कोणत्या बाजूने आणि केव्हा धाड घालेल, याची बाजीरावांच्या शत्रूला सदैव धास्ती वाटे. कोणताही लवाजमा आणि अवजड सामान नसल्याने आपल्या योजना शत्रूच्या हालचालींनुसार किंवा लढाईच्या धावत्या परिस्थितीनुसार बदलण्याची लवचीकता त्यांना उपलब्ध होती. त्याचबरोबर शत्रूचा पराभव संरक्षणात्मक पवित्र्याने नव्हे, तर आक्रमक चालीनेच होऊ शकतो, यावर बाजीरावांचा दृढ विश्वास होता. अशा प्रकारे गतिमानता (Mobility), लवचीकता (Flexibility) आणि आक्रमकता (Offensive Spirit) हे त्रिसूत्र बाजीरावांच्या सामरिक नीतीचा आणि कारवाईचा आत्मा होता.
बाजीरावांनी आखलेल्या युद्धयोजनेचे दोन पैलू होते. निजामाच्या सैन्याला आपला पाठलाग करावयास लावून स्वराज्याबाहेर दूरच्या मुलखात न्यायचे, त्याचे सैन्य दमल्यावर आपल्या निवडीच्या जागी त्याला घेरायचे आणि लढाईत त्याला पराजित करायचे. या कारवाईची धुरा बाजीरावांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. दुसरीकडे, आधीपासूनच आपल्या अनुपस्थितीत नाशिकपासून दक्षिणेकडील स्वराज्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी बंधू चिमाजीआप्पांवर त्यांनी सोपविली होती. त्यासाठी शाहू महाराज आणि दरबार तात्पुरता पुरंदर किल्ल्यावर हलविण्यात आला होता. त्यांच्या संरक्षणासाठी पुणे परिसरात शिंद्यांच्या तुकडीला तैनात करण्यात आले होते. जुन्नर, पेडगाव, पाटस, खेड वगैरे मुलखांचे संरक्षण त्यांनी चिमाजीआप्पांवर सोडले होते. काही झाले तरी शत्रू पुरंदरवर कधीही हल्ला करू शकणार नाही, याची तजवीज करण्याचा दोन्ही बंधूंनी निर्धार केला होता.
युद्धपूर्व हालचाली : सुरुवातीचे डावपेच : जुलै-ऑगस्ट १७२७ मध्ये ऐवजखानाने सिन्नरवर हल्ला केल्यानंतर हालचालींना आरंभ झाला. जून ते सप्टेंबर १७२७ मध्ये निजामाच्या सैन्याचा तळ धरुर भीरमध्ये होता. ऑक्टोबरमध्ये निजामाने भीरपासून साताऱ्याच्या दिशेने आगेकूच केली. बाजीरावांनी लागलीच गाजावाजाने औरंगाबादच्या दिशेने प्रयाण केले. नंतर पारनेर आणि अहमदनगर उजवीकडे सोडून ते पुणतांब्याला पोहोचले. त्यांनी गोदावरी नदी ओलांडली आणि पूर्वेकडून वळून निजामाच्या हद्दीतील जालन्यावर हल्ला चढविला. त्यानंतर बऱ्हाणपूरवर चाल करण्याची त्यांनी खोटी बतावणी केली. बऱ्हाणपूर त्या काळचे महत्त्वाचे व्यापार आणि दळणवळणाचे केंद्र होते; परंतु बऱ्हाणपूरला न जाता बाजीराव डिसेंबर १७२७ मध्ये वाशिममध्ये दाखल झाले आणि ‘चौथ’ गोळा केला. बऱ्हाणपूरच्या दिशेने बाजीराव जात आहेत, हे ऐकून निजामाचे धाबे दणाणले आणि त्याने आपले सैन्य बऱ्हाणपूरकडे वळविले. बाजीरावांना हेच अपेक्षित होते. त्यांनी वाशिम सोडले आणि मंगळूर-माहूर मार्गे वायव्येच्या दिशेने चोपडाला पोहोचून तापी नदी ओलांडली. १८ डिसेंबर १७२७ रोजी ते काकरमुडाला पोहोचले. नंतर बावापीर गंदोडला नर्मदा पार करून त्यांनी भडोचकडे आपला मोर्चा वळवला. हे कळल्यावर निजामाने दिशा बदलून भडोचच्या दिशेने आगेकूच केली. संथ चालीने मार्गक्रमण करणाऱ्या त्याच्या सैन्याने काही अंतरच कापले होते, तेव्हा बाजीराव गुजरातमधील छोटा उदयपूरजवळ पोहोचल्याची बातमी त्याला कळाली. एव्हाना १७२८चा जानेवारी उजाडला होता. गेले तीन महिने कूर्म गतीने चालणारे निजामाचे अगडबंब सैन्य पार थकून गेले होते. बाजीरावांचा पाठलाग करण्याची आपली चूक निजामाला कळून चुकली होती. आता बाजीरावांना परतण्यास भाग पाडण्याचा निजामासमोर एकच उपाय होता, तो म्हणजे पुण्यावर हल्ला करण्याचा.
निजामाने ‘पिछेमुड’ करून पुण्याचा रस्ता धरला. शिवाय निजामाला गुजरातचे वावडे होते; कारण तिथला मोगलांचा सुभेदार सरबुलंदखान हा निजामाचा कट्टर प्रतिस्पर्धी. निजाम त्याच्या मुलखात जाणे टाळेल, हे चाणाक्ष बाजीराव जाणून होते. निजामाचे सैन्य जुन्नर, उदापूर, नारायणगड, औसेरी, खेड जिंकून पुण्याला पोहोचले. ८ जानेवारी १७२८ रोजी निजामाच्या पुढाकाराने संभाजी महाराजांच्या लग्नाचा समारंभ पुण्याला झाला. निजामाची अपेक्षा होती की, बाजीराव घाबरून पुण्यास परततील; परंतु बाजीरावांचा चिमाजीआप्पांवर पूर्ण भरवसा होता. निजामाला पुन:श्च चालता करण्यासाठी बाजीरावांनी आपला मोर्चा निजामाची पूर्व राजधानी औरंगाबादकडे वळविला. ते तातडीने खानदेशात पोचले आणि १४ फेब्रुवारी १७२८ रोजी मराठा सैन्य धुळ्याजवळील बेलवाडला धडकले.
बाजीरावांच्या औरंगाबादवर हल्ला करण्याच्या मनसुब्यामुळे निजाम हबकला आणि त्याने पुणे सोडून उत्तरेकडे प्रयाण केले. १२ फेब्रुवारीला तो अहमदनगरला पोहोचला. बाजीरावांना हेच पाहिजे होते. निजाम गोदावरी ओलांडण्याच्या दिशेने येत आहे, हे पाहून पालखेडमध्ये सापळा लावण्याचे बाजीरावांनी ठरविले. गेल्या चार महिन्यांच्या बाजीरावांच्या अथक परिश्रमापश्चात दिशाहीन भटकंतीनंतर दमले-भागलेले निजामाचे सैन्य मराठ्यांनी लावलेल्या जाळ्याकडे वाटचाल करीत होते. पालखेडची रणदुंदुभी गर्जू लागली.
मराठा सैन्य :
मराठा सैन्य स्वराज्याच्या प्रेरणेने पेटलेल्या शिलेदारांचे होते. पंचवीस ते तीस हजार संख्येच्या बाजीरावांच्या सैन्यात बहुसंख्य घोडदळ होते. वाटेत मिळेल ते खाऊन ते आपला गुजारा करत. त्यामुळे शिधा आणि राहुट्यांचे ओझे त्यांच्याजवळ नसे. घोडेस्वाराच्या वैयक्तिक गरजा घोड्याच्या पाठीवरच असत. त्यायोगे गतिमानता आणि चपळता त्यांच्या अंगी बाणली जात असे. परंतु मराठा सैन्याची प्रमुख उणीव म्हणजे तोफखाना. तोफखान्याच्या उणिवेमुळे त्यांच्या गतिक्षमतेत जरी भर पडत असली, तरी मोगलांच्या जंगी तोफांपुढे मराठा सैन्याला कच खावी लागण्याची शक्यता होती.
नेतृत्व :
बाजीरावांचे नेतृत्व कणखर, चतुर आणि सैन्याचे मनोबल उंचाविणारे होते. आपल्या सैनिकांत मिळूनमिसळून राहण्याने सैनिकांमध्ये निष्ठा आणि भरोसा निर्माण होत असे. सैन्याच्या तुकड्यांचे सेनापती सामान्य शिलेदारांमधून त्यांच्या गुणांची पारख करून निवडलेले होते. सैन्यात विलक्षण एकसूत्रता होती.
निजामाचे सैन्य :
निजामाच्या सैन्याची संख्या लाखाच्या घरात होती. संख्याबलात आणि शस्त्रबलात श्रेष्ठ असूनही इच्छाबलात मात्र मराठ्यांच्या तुलनेत ते कमी होते. पैशाच्या मुबलकतेमुळे सुखलोलुपता अंगी भिनली होती. तसेच धनधान्य आणि इतर गरजा जनावरांवर लादून नेण्याच्या प्रथेमुळे त्यांच्या सवयी ऐषारामी होत्या आणि गतिमानता कमजोर होती. लढाऊ दलाच्या मानाने त्यांच्या साहाय्यदलाचा आकार अवजड असायचा (‘Teeth to Tail Ratio’). मोगलांचा तोफखाना मात्र बलाढ्य होता आणि योग्य लक्ष्य लाभल्यास केवळ तोफांकरवीच शत्रूचा विध्वंस साधून विजय प्राप्त करण्याची त्यांच्यात क्षमता होती. परंतु बोजडपणामुळे आणि अवाढव्यपणामुळे मोगल सैन्यात एकसूत्रता, गतिमानता आणि लवचीकता यांचा पूर्ण अभाव होता.
नेतृत्व :
निजाम-उल-मुल्क हा मोगल सेनापती एक कर्तबगार तुराणी होता. हा कावेबाज, कुटिल, शूर आणि कसलेला सेनानी होता. परंतु लढाईच्या मैदानावर आघाडीच्या सैन्यापासून निजाम खूप मागे असे आणि डावपेच त्याच्या सेनादलांतील नेते वापरीत असत. त्यामुळे लढाईच्या आघाडीवर निर्णयामधे विलंब होत असे. बहुसंख्य सैन्य मराठा सरदारांचे असल्यामुळे सैनिक निजामाशी निष्ठावान नव्हते.
रणभूमी : भौगोलिक विश्लेषण :
समुद्रसपाटीपासून १६०० फूट उंचीवर असलेल्या पालखेडचे क्षेत्र मैदानी होते. गोदावरी नदी नैऋत्येला १५ मैलांवर असून तिथून जवळच प्रवरा नदी तिला मिळते. प्रवरेत मुठेचे पाणी येते. त्यामुळे गोदावरीचे पात्र रुंद, मुबलक पाण्याने भरलेले. ती ओलांडण्याची एकच जागा म्हणजे पुणतांबे. पालखेडच्या आग्नेयेस आणि पूर्वेच्या दिशेने शिवनाला ती वाहत असे. पालखेडच्या सान्निध्यातील पिण्याच्या पाण्याचा तो एकमेव स्रोत होता. उत्तरेला प्रदेश चढत जात होता आणि २५ मैल दूर २२०० फूट उंचीवर घनदाट अरण्य होते. ते पार करणे कठीण होते. उत्तरेस अरण्य, पूर्वेस शिवनाला आणि दक्षिणेस गोदावरी अशा सर्व बाजूंनी अडथळ्यांनी वेढलेले पालखेडचे रणांगण बाजीरावांच्या डावपेचांना पूरक होते.
लढाईचा आराखडा :
बाजीरावांच्या रणनीतीचे तीन प्रमुख घटक होते. त्यांच्या अनुमानानुसार निजामाच्या अगडबंब सैन्याला गोदावरी पार करण्यास तीन दिवस लागणार होते. पहिल्या दिवशी पाहणी आणि योजनेसाठी आघाडीच्या तुकड्या गोदावरी पार करून येणे अपेक्षित होते, दुसऱ्या दिवशी प्रमुख सेना, काही रसद आणि बाजारबुणगे आणि तिसऱ्या दिवशी तोफखाना आणि अवजड रसद. तोफखान्याला निजामाच्या इतर सेनेपासून वेगळे करण्याचा बाजीरावांचा मुख्य डाव होता. तोफखाना हे मोगलांचे प्रमुख अस्त्र होते. त्याला गोदावरी ओलांडण्यासच मज्जाव केला, तर त्यांचे हे युद्धविजयी अंगच निकामी होणार होते. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सेना गोदावरी ओलांडून सापळ्यात आल्यावर पुणतांब्याची ओलांडण्याची जागाच आपल्या तुकडीद्वारे गोठवून टाकली की, १५ मैल दूर असलेला तोफखाना कुचकामी होईल, हा रणनीतीचा पहिला घटक होता.
दुसरा घटक निजामाची रसद तोडणे, हा होता. निजामी सैन्याचा शिधा आणि सामान गाढवांवर लादलेले असे. हा घोडे-गाढव चमू पालखेड रणक्षेत्रात आला की, रात्री गनिमी हल्ला करून त्यांना चारी दिशांना पळवून लावायचे आणि रसद व त्याबरोबर जनावरांच्या वैरणीची धूळधाण करायची, हा डावपेच.
तिसरा घटक म्हणजे शत्रूला पाण्याविना मारायचे. शिवनाल्याला तसे फेब्रुवारीमध्ये पाणी कमीच. विहिरीही कोरड्या. गोदावरी आणि शिवनाल्यावर शत्रुसैन्याला पाण्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाही, हा तिसरा कावा. निजामाच्या सैन्याचा शिधा आणि पाणी अडवले तर निजाम शरण येईल, याची बाजीरावांना खात्री होती. उत्तरेकडे अरण्य आणि दक्षिणेकडे गोदावरी याची पूर्णत: नाकेबंदी केली, तर त्यांचे मार्गच खुंटतील, हे निश्चित होते.
पालखेडची लढाई आणि तह :
फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्याअखेरीस पालखेडमध्ये बाजीरावांच्या सैन्याची मोर्चाबंदी पूर्ण झाली होती. पूर्वेस बाजीराव, उत्तरेस पिलाजी जाधव, पश्चिमेस मल्हारराव होळकर आणि दक्षिणेस दवाजी सोमवंशी असे मांडणीचे स्वरूप होते. १७ फेब्रुवारी १७२८ या दिवशी निजामी सैन्याचा अग्रभाग धापा टाकत पुणतांब्याला पोहोचला. १८ फेब्रुवारीला निजामाने स्वतः गोदावरी पार केली. १९ आणि २० फेब्रुवारीला उरलेले सैन्य, जनावरे आणि जनाना पार झाले. आता फक्त गोदावरीच्या उतारापासून चार-पाच मैलांवर असलेला तोफखानाच पार होणे बाकी होते.
पुणतांबे ओलांडण्याची जागा २१ फेब्रुवारीला बाजीरावांच्या सैन्याकडून गोठविली गेली. तोफखान्याला तिथे पोहोचणे दुरापास्त झाले. शिवनाल्यावर पाणी आणण्यास गेलेल्या लोकांवर गोळ्यांचा वर्षाव झाला. संध्याकाळी रसदीच्या घोडे-गाढवांवर अचानक वावटळीसारखा हल्ला झाला आणि जीव वाचविण्यासाठी निजामाचे सैन्य चारी दिशांत सैरावैरा धावले. रात्री-अपरात्री सैन्याच्या तुकड्यांवर गनिमी हल्ले चालू झाले. २५ फेब्रुवारीपर्यंत मराठ्यांचा वेढा घट्ट झाला. निजामाच्या सैन्याची उपासमार होऊ लागली. पाण्याविना माणसे आणि जनावरे तडफडू लागली. निजामाला बाजीरावांसमोर गुडघे टेकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. त्याने ऐवजखान आणि चंद्रसेन जाधव यांना बाजीरावांबरोबर सामोपचाराची बोलणी करण्यास धाडले. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे तहावर सह्या झाल्या. त्यातील १७ कलमे शतप्रतिशत शाहू महाराजांना अनुकूल होती. दक्षिणेतील सहा सुभ्यांचा चौथ व सरदेशमुखी, निजामाने काबीज केलेल्या गावांची मालकी आणि संभाजी महाराजांची कृष्णा, घटप्रभा प्रदेशाला संमती यांचा त्यात समावेश होता.
रक्ताचा थेंब न सांडता निजामाच्या प्रचंड सैन्याला शरण आणणे हा बुद्धी, मुत्सद्देगिरी आणि शक्तीचा अद्वितीय संगम होता. म्हणूनच फील्ड मार्शल माँटगोमेरी यांनी जगात झालेल्या सर्वोत्कृष्ट लढायांवर लिहिलेल्या सुप्रसिद्ध ग्रंथात (A History of Warfare : Field-Marshal Viscount Montgomery of Alamein) पालखेडचा अग्रभागी समावेश केला आहे. या संग्रामामुळे मराठ्यांचे परंपरागत गनिमी युद्धतंत्र श्रेष्ठ आहे, हे पुन्हा सिद्ध झाले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...