विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 April 2022

अपिरिचित महापराक्रमी श्रीमंत खेळोजी राजे भोसले

 

श्रीमंत खेळोजी राजे

भोसले 
श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांना वेरूळ, वावी, बनसेन्द्रे, बेरडी, हिंगणी, जिंती , मुंगी पैठण अशा आठ दहा गावांचे वतन होते. श्रीमंत बाबाजी राजे यांचे दोन्ही पुत्र मोठे कर्तृत्ववान होते . थोरले श्रीमंत मालोजी राजे आणि धाकटे श्रीमंत विठोजी राजे हे मोठे मनसबदार होते. श्रीमंत मालोजी राजे यांना इंदापूरच्या लढाईत वीरमरण आले. तेव्हा श्रीमंत शहाजी राजेंचे वय होते अवघे पाच वर्षे. श्रीमंत मालोजी राजे यांच्यानंतर श्रीमंत विठोजी राजे यांनी श्रीमंत शहाजी राजे आणि श्रीमंत शरीफजी राजे यांचा सांभाळ केला. श्रीमंत मालोजी राजे यांची मनसब त्यांनी श्रीमंत शहाजी राजे याना मिळवून दिली. श्रीमंत बाबाजी राजे यांच्या मूळ वतनाच्या गावावर श्रीमंत विठोजी राजे आणि त्यांचे आठ पुत्र आपला पराक्रम करत होते. श्रीमंत विठोजी राजे यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीमंत संभाजी राजे यांना वावी गावाचे वतन होते. श्रीमंत संभाजी राजे हे देवगिरीच्या किल्ल्यावर झालेल्या खंडांगळे हत्ती प्रकरणात वीरगतीला प्राप्त झाले. त्यांच्यानंतर हे वावी गावाचे वतन श्रीमंत विठोजी राजे यांचे द्वितीय पुत्र श्रीमंत खेळोजी राजे यांना देण्यात आले. वावीच्या वतनावर असताना इसवी सन १६३३ च्या सुमारास त्यांनी निर्गुडी गावाचे वतन विकत घेतले होते. हे इतिहासातील अपिरिचित महापराक्रमी श्रीमंत खेळोजी राजे म्हणजे नेमके कोण ?
श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांचे नातू आणि श्रीमंत विठोजी राजे भोसले यांसह द्वितीय चिरंजीव . श्रीमंत खेळोजी राजेंनी दौलताबादच्या निजामशाही कडून मनसबदारी मिळविली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर श्रीमंत शहाजी राजे यांच्या कालखंडात श्रीमंत खेळोजी राजे हे नामवंत पराक्रमी सरदार होते. इसवी सन १६२९ च्या सुमारास श्रीमंत शहाजी राजे यांनी निजामशाही सोडली त्यावेळी श्रीमंत खेळोजी राजे यांनी परसोजी आणि मालोजी या आपल्या दोन भावांसह निजामशाही सोडली आणि शहाजहान बादशहाच्या मुघलशाहीत जाऊन मिळाले. मुघल बादशाह शहाजहानला श्रीमंत खेळोजी राजेंच्या पराक्रमाची आणि कर्तृत्वाची जाणीव असल्याने त्याने श्रीमंत खेळोजी राजेंना पंचहजारी मनसबदारी बहाल करून मोठा सन्मान केला.
स्वराज्य स्थापनेच्या आधी पंचहजारी मनसबदार म्हणजे पाच हजार पायदळ आणि पाच हजार घोडदळ बाळगण्याचे सामर्थ्य असणे हि मराठ्यांसाठी फार मोठी बाब होती. त्याप्रमाणे त्यांनी मुघलांकडून बऱ्याच ठिकाणी आपले शौर्य दाखवले. परंतु दक्षिणेत वाढता मुघलांचा हस्तक्षेप त्यांना मान्य नव्हता. इसवी सन १६३३ ला मुघलांनी दौलताबादच्या किल्ल्याला वेढा घालून तो हस्तगत करण्याचा प्रयन्त केला, तेव्हा श्रीमंत खेळोजी राजे यांनी मुघलांची साथ सोडून विजापूरच्या आदिलशाहीला साथ दिली. कारण होते श्रीमंत शहाजी राजे. श्रीमंत शहाजी राजे हे श्रीमंत खेळोजी राजेंचे सख्खे चुलत भाऊ. आदिलशाही कडून त्यांनी मुघलांचा कडवा प्रतिकार केला. श्रीमंत खेळोजी राजेंनी इसवी सन १६३३ आणि १६३६ च्या लढाईत श्रीमंत शहाजी राजे यांना मोलाची साथ दिली. श्रीमंत खेळोजी राजेंच्या शौर्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा रणझुंझार महाप्रतापी वीर अशी निर्माण झाली. श्रीमंत खेळोजी राजेंना एकच पुत्र होता. त्यांचे नाव श्रीमंत जिवाजी राजे.
कमी कालावधीत आपल्यावर शिरजोर झाल्यामुळे मुघलांनी कट कारस्थाने रचून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत खेळोजी राजेंच्या पत्नी पर्वणीनिम्मित गोदावरी नदीवर स्नानासाठी गेलेल्या असताना मुघल सरदार महाबतखान याने त्यांना पकडून कैद केले. त्यांची अब्रू वाचविण्यासाठी श्रीमंत खेळोजी राजे विनम्र होऊन आपले मांडलिक होतील अशी त्याची धारणा होती. महाबतखानाने श्रीमंत खेळोजी राजेंकडे चार लक्ष एवढी खंडणी मागितली. आपल्या पत्नीच्या अब्रूसाठी आणि घराण्याच्या इभ्रतीसाठी श्रीमंत खेळोजी राजेंनी निरुपायाने चार लक्ष रुपये महाबतखानाला देऊन आपल्या पत्नीची सुटका केली. हि घटना भोसले घराण्यासाठी खूपच वाईट होती. श्रीमंत शाहजी राजेंच्या पत्नी , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ माँसाहेब यांना हि गोष्ट अजिबात रुचली नाही. जिथे भोसले घराण्याची सून सुरक्षित नाही तिथे इतरांचे काय? म्हणून त्यांना श्रीमंत शहाजी राजेंनी पाहिलेल्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाची सत्यात उतरविण्याची घाई झाली होती. त्यातूनच त्यांनी आपल्या पुत्राकडून हे स्वप्न सत्यात उतरवलं मराठा साम्राज्यच.
काही कालावधीनंतर मुघल बादशाह आणि विजापूरकर आदिलशाह यांचा तह झाल्याने श्रीमंत खेळोजी राजेंनी आदिलशाही सोडली. अर्थात श्रीमंत खेळोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ अनेक प्रसंगी करून दाखविली. पण त्यांच्या पाणीदार स्वभावाप्रमाणे त्यांचा यथायोग्य गौरव कोठेच झाला नाही. वेळोवेळी त्यांचा अपमान होऊ लागल्याने ते आपल्या मूळ वतनावर म्हणजे वेरूळ या गावी जाऊन राहू लागले. तेथे त्यांनी आपल्या शौर्याच्या बळावर पुन्हा स्वतःचे सैन्य जमवले आणि मुघल-आदिलशाह यांचा प्रतिकार करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. हे औरंगजेबास कळल्यानंतर त्याने आपला विश्वासू सरदार मलिक हुसेनला सैन्य देऊन श्रीमंत खेळोजी राजेंवर हल्ला करण्यासाठी पाठवले. एकाएकी झालेल्या हल्ल्यामध्ये श्रीमंत खेळोजी राजे यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली. तरी देखील इसवी सन १६३९ च्या नोव्हेंबर महिन्यातील १५ तारखेला ते धारातीर्थी पडले. श्रीमंत खेळोजी राजेंच्या अचानक जाण्याने श्रीमंत राजे भोसले घराण्याची अपिरिमित हानी झाली . त्यांच्या नंतर श्रीमंत जिवाजी राजे यांचा श्रीमंत मालोजी राजे यांनी पुत्रवत सांभाळ केला. आजही श्रीमंत खेळोजी राजेंचे वंशज वावी, कळस, मंजूर, बनसेन्द्रे ,निर्गुडी येथे राहतात. श्रीमंत खेळोजी राजे यांचा आज ३८२ वा स्मृतीदिन. अशा महापराक्रमी रणझुंझार योद्धयाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ...
फोटो वावी येथील श्रीमंत खेळोजी राजेंच्या वंशजांच्या वाड्याचा ... कदाचित या भूमीला श्रीमंत खेळोजी राजेंचा चरणस्पर्श झाला असेल.
© श्रीमंत राजेभोसले वावीक

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...