छत्रपती शिवाजीमहाराज यांचे
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मुलगी ताराराणी यांचा विवाह शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी झाला. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वैधव्य आल्यावरही ही राणी डगमगली नाही.
त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं. मुघलांना, स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या. त्यांना आयुष्यात अनेकवेळा बंड-लढायांचा सामना करावा लागला. पतीनिधनानंतर 61 वर्षं त्यांनी मराठा साम्राज्यातल्या घडामोडी पाहिल्या...
ताराबाई, ताराराणी, महाराणी ताराराणी, मोंगलमर्दिनी ताराराणी अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या महाराणींशिवाय मराठा साम्राज्याचा इतिहास पूर्णच होणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी ताराराणी यांनी सतत प्रयत्न केले. अनेक लढायांना त्या सामोऱ्या गेल्या. त्यांच्या 86 वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.
वंशावळ...
सर्वात आधी आपण या माहितीमध्ये येणाऱ्या मुख्य नावांची उजळणी करू, त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना वाचणं सोपं जाईल.
छ. शिवाजी महाराज यांचे दोन पुत्र छ. संभाजी आणि छ. राजाराम.
छ. संभाजी महाराज यांचे पुत्र छ. शाहू. (हे शाहू महाराज आणि कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवावे.)
छ. राजाराम यांना पत्नी ताराबाई यांच्यापासून छ. शिवाजी (दुसरे) आणि राजसबाई यांच्यापासून छ. संभाजी (दुसरे) हे पुत्र होते.
राजाराम महाराज जिंजीकडे
1680 साली शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर छ. संभाजी महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले. 1689 साली संभाजी महाराजांना औरंगजेब बादशहाने अत्यंत अमानुषपणे मारले.
त्यानंतर औरंगजेबाने आपला मोर्चा रायगडाकडे वळवला. यावेळेस रायगडावर संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई, त्यांचे पुत्र शाहू आणि राजाराम महाराज होते. राजाराम महाराज यांनी एप्रिल 1689मध्ये रायगड सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते रायगडावरुन प्रतापगडाच्या दिशेने गेले.
इकडे औरंगजेबाच्या फौजांनी रायगडाचा ताबा घेतला आणि येसुबाई व शाहू यांना कैद केले.
राजाराम महाराजांनी प्रतापगड, पन्हाळा, विशाळगड, रांगणा अशा मार्गाने दक्षिणेस गेले ते थेट जिंजीस जाऊन पोहोचले. त्यांच्या पत्नी ताराबाई, राजसबाई तसेच विशाळगडावरच होते. राजाराम महाराज आणि ताराबाई यांच्या पोटी शिवाजी (दु) यांचा जन्म विशाळगडावर झाला.
जिंजी दरबार
जिंजी हे ठिकाण आज तामिळनाडू राज्यात आहे. जिंजीतल्या अजेय अशा किल्ल्यावर राजाराम महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना केली. अष्टप्रधानांची नेमणूक केली.
राजाराम महाराजांनी त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना बोलावून घेतले. त्यानुसार ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी विशाळगडातून बाहेर पडल्या त्या राजापूर ते होनावर अशा जलमार्गाने आणि नंतर जिंजीपर्यंत पालखीतून पोहोचल्या.
त्या काळाचा विचार करता हा प्रवास अत्यंत धोकादायक आणि तितकाच रोमहर्षक असणार यात शंका नाही. या प्रवासाचे वर्णन इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेल्या रंगुबाई जाधव लिखित 'मोंगलमर्दिनी ताराबाई' या पुस्तकात केले आहे.
जिंजीचा वेढा आणि सातारा
औरंगजेबाने झुल्फिकारखानाच्या मार्फत राजाराम महाराजांना पकडण्यासाठी अनेक वर्षे जिंजीच्या किल्ल्याला वेढा दिला. 1692 च्या सुरुवातीपासून दिलेल्या या वेढ्याला मराठा सैन्याच्या गनिमी काव्यामुळे आजिबात यश येत नव्हते.
1697 साली राजाराम महाराजांनी जिंजी सोडल्यानंतर पुढच्या वर्षी औरंगजेबाला जिंजीचा किल्ला हस्तगत करता आला.
राजाराम महाराज ताराबाई, शिवाजी (दु), राजसबाई त्यांना जिंजी मुक्कामात झालेले पुत्र संभाजी (दु), अंबिकाबाई हे सर्व स्वराज्यात आले. साताऱ्यामध्ये राजाराम महाराजांनी राजधानीची स्थापना केली.
1697 पासून अमात्यपद रामचंद्रपंत बावडेकर यांच्याकडे होते. नीलकंठ मोरेश्वर पिंगळे यांची पेशवे, श्रीकराचार्य कालगांवकर यांच्याकडे पंडीतराव तर शंकराजी नारायण गाडेकर यांच्याकडे सचिवपद देण्यात आले. कान्होजी आंग्रे आरमारप्रमुख झाले.
राजाराम महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष सुरूच राहिला. याच गदारोळामध्ये 3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात औरंगजेबाने साताऱ्याचा आणि सज्जनगडाचा किल्ला जिंकून घेतला.
ताराबाई
ताराबाई यांचा जन्मच मुळी लढाऊ वडिलांच्या पोटी म्हणजे शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पोटी झाला होता. लष्करी शिक्षणाचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच आला असणार.
राजाराम महाराजांच्या मृत्यूच्यावेळेस त्यांचे वय 25 असावे. त्यांचा मुलगा शिवाजी (दु) यांचेही वय अत्यंत कमी होते. 1701 साली ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी यांना पन्हाळा येथे राज्याभिषेक करवून घेतला आणि त्या कारभार पाहू लागल्या.
औरंगजेब एकेक किल्ला हस्तगत करत असताना ताराबाई या रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, धनाजी जाधव सेनापती यांच्या मदतीने स्वराज्याचं रक्षण करत होत्या. त्यांनी सिंहगड, राजगड, पन्हाळा, पावनगड, वसंतगड, सातारा हे किल्ले पुन्हा जिंकून घेतले.
1707 साली औरंगजेब बादशहाचा मृत्यू झाल्यानंतर शाहू महाराजांची सुटका झाली. आता शाहू महाराज आणि ताराराणी यांच्यामध्ये राजगादीवरून वाद सुरू झाला.
शाहू महाराज सुटून आल्यानंतर ताराराणींच्या पक्षातले एकेक सरदार बाहेर पडून तिकडे जाऊन मिळू लागले.
यामुळे शाहू महाराजांचं पारडं अधिकाधिक जड होऊ लागलं. अखेर धनाजी जाधव शाहूंच्या पक्षात गेल्यानंतर सर्व परिस्थिती पालटली.
शाहू राजांनी ताराराणींच्या ताब्यातील पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. 12 जानेवारी 1708 रोजी शाहूराजे यांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला.
काही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली.
पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे.
पण हे सगळं काही आलबेल, सुरळीत चालणार नव्हतं. 1714 पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यावर राजाराम महाराजांची दुसरी पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी (दुसरे) यांनी अचानक ताराराणींना बाजूला करून राज्यकारभार हातात घेतला.
ताराराणी आणि शिवाजी (दुसरे) यांना पन्हाळ्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले. नजरकैदेतच शिवाजी यांचा 1727 साली मृत्यू झाला.
दोन भावांचे भांडण आणि समेट
सातारचे शाहू आणि कोल्हापूरचे संभाजी यांच्यामध्ये सत्तासंघर्ष अनेक वर्षे सुरूच राहिला. छ. शाहू मुघलांच्या ताब्यातून सुटून आल्यानंतर तेवीस वर्षांनी या दोघांमधील कारवाया थांबल्या. अनेकवेळा लहान-मोठ्या घटना, कोल्हापूर दरबारातील लोकांनी पक्ष सोडणे, एकमेकांच्या प्रदेशांवर हल्ले अशा घटना या काळात सुरू होत्या.
तत्पुर्वी आपणच मराठी राज्याचे नेते आहोत हे शाहू राजांनी 1728 मध्ये मुंगीशेवगावच्या तहात निजामाकडून कबूल करून घेतले होते. मराठी राज्याचा शाहू राजांशिवाय दुसरा वारस कबूल करणार नाही अशी कबुली निजामाने दिली.
अखेरीस 1730 साली शाहू राजांतर्फे श्रीनिवासराव प्रतिनिधी संभाजी राजांवर चालून गेले. या युद्धामध्ये संभाजी राजांचा पराभव झाला. त्यात ताराबाई, राजसबाई, संभाजी राजांच्या स्त्रिया, भगवंतराव अमात्य, इचलकरंजीकर व्यंकटराव घोरपडे सापडले.
त्यांच्यापैकी राजसबाई आणि संभाजी राजांच्या स्त्रिया यांना पन्हाळ्यावर पोहोचवून प्रतिनिधी इतरांना घेऊन साताऱ्याला आले.
ज्या ताराबाईंशी आजवर संघर्ष केला त्यांना पुन्हा कोल्हापूरला पाठवायचा विचार शाहू राजांचा होता. मात्र 'मला कोठे झाले तरी कैदेतच रहावयाचें, त्या अर्थी तुम्हांजवळच राहूं' असे ताराबाईंनी म्हटल्यामुळे त्यांना साताऱ्यातच ठेवून घेतले. सातारच्या किल्ल्यावरचा राजवाडा दुरुस्त करून त्या तेथे राहिल्या. (संदर्भ-मराठी रियासत खंड-3, गोविंद सखाराम सरदेसाई)
ताराबाई यांचा हा निर्णयही मराठा सत्तेसाठी एक महत्त्वाचा निर्णय होता. त्या कोल्हापूरला गेल्या असत्या तर सध्याच्या इतिहासात थोडा बदल झाला असता.
ज्या पन्हाळा-कोल्हापूर गादीसाठी इतकी वर्षे त्यांनी एकटीने प्रयत्न केले होते ते गाव सोडावं लागलं होतं. सातारच्या ज्या शाहू राजांशी आजवर सत्तेसाठी दावा सांगितला त्यांच्याच आश्रयाला जाऊन राहाण्याची वेळ आली होती.
वारणेचा तह
27 फेब्रुवारी 1731 साली शाहू आणि संभाजी या दोन्ही राजांची कर्हाड आणि जखीणवाडी येथे भेट झाली.
संभाजी राजांना घेऊन शाहू महाराज साताऱ्यात आले. संभाजींचा मुक्काम दोन महिने साताऱ्यातल्या अदालत वाड्यात होता. तेव्हा या दोघांनी 13 एप्रिल 1731 रोजी जो तह केला त्यालाच 'वारणेचा तह' असं म्हणतात.
या तहानुसार एकमेकांच्या प्रदेशांची आखणी करण्यात आली. दोन्ही राजांनी एकमेकांचे चाकर ठेवू नयेत असे ठरले.
पुन्हा वंशज आपलाच
सातारच्या शाहू महाराजांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ताराबाई यांनी आपला अज्ञातवासात असलेला नातू रामराजे यांना शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार रामराजे हेच साताऱ्याचे वंशज ठरले. म्हणजे ताराबाई यांना कोल्हापूरमधून जरी बाहेर पडावे लागले असले तरी त्या आपला वंश साताऱ्यात कायम करण्यात यशस्वी झाल्या.
25 डिसेंबर 1749 रोजी शाहू राजांचा मृत्यू झाला. त्यानंतर रामराजे साताऱच्या गादीवर आले.
रामराजे काही काळानंतर पेशव्यांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याचं लक्षात आल्यावर ताराराणी यांनी रामराजाला 1750 साली तो खरा वारसदार नसल्याचं सांगत कारभार हाती घेतला. पण पेशव्यांनी सैन्यबळाचा वापर केल्यावर पुन्हा कारभार सोडून दिला. नानासाहेब पेशवे आणि ताराराणी य़ांच्यात मोठा संघर्ष झाल्याचं दिसून येतं.
पानिपतचं युद्ध आणि मृत्यू
14 जानेवारी 1761 साली मराठी सैन्याचा पानिपतमध्ये मोठा पराभव झाला. या पराभवाच्या धक्क्यातच 23 जून 1761 नानासाहेबांचं निधन झालं.
तर 4 डिसेंबर रोजी 1761 रोजी ताराबाई यांचं निधन झालं.
इतिहासकारांनी घेतलेली दखल
राजाराम महाराजांच्या मृत्युमुळे झालेल्या परिस्थितीत ताराबाईंनी जे अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन घडवले होते. त्याबद्दल मुसलमान इतिहासकारांनाही त्यांचे कौतुक करावे लागले.
इतिहासकार खाफीखान लिहितात, "ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांच्या हालचालींना मोठा वेग प्राप्त झाला. तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन तिने राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली.
तिने दक्षिणेतील सहा सुभ्यांवर स्वाऱ्या करण्याकरिता, नव्हे माळव्यातील सिरोंज आणि मंदसोर या प्रदेशापर्यंत हल्ले चढविण्यातरिता सैन्य पाठविण्याची तिने अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांची अंतःकरणे तिने त्याकरिता अशी काही आपलीशी करुन घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपावेतो जे जे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी ठरले." (संदर्भ- जदुनाथ सरकार, इंडिया अंडर औरंगजेब)
1699 पासून 1701 पर्यंत औरंगजेबाला जे एकामागून एक विजय मिऴत गेलेले होते, या सगळ्यांचा परिणाम म्हणून मराठा राज्यात जे असाधारण संकट निर्माण झाले होते त्यातून सर्व राष्ट्राला वाचविण्याचे सर्व श्रेय आपल्याला ताराबाईच्या चारित्र्याला आणि राज्यकारभारातील तिच्या कुशल निपुणतेला द्यावे लागते.
रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांचे वंशज नील पंडीत बावडेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "ताराराणी एक आक्रमक राजकारणी होत्या. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते. म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेचप्रसंगातून मार्ग काढू शकल्या."
इतिहास अभ्यासक यशोधन जोशी यांनीही असेच मत बीबीसी मराठीशी बोलताना मांडले. ते म्हणाले, "महाराणी ताराराणी हे मराठ्यांच्या इतिहासातले एक विलक्षण पर्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज ते पानिपत हा फार मोठा कालखंड त्यांनी बघितला. रणांगणावर कधीही हार न मानणाऱ्या ताराराणींना कौटुंबिक कलहात मात्र हार पत्करावी लागली. ताराराणी ही मराठ्यांच्या इतिहासातली एक मोठी शोकांतिकाही म्हणता येईल की आलमगिराविरुद्ध रणांगण गाजवणाऱ्या ताराराणींना आयुष्यातला फार मोठा कालखंड नजरकैदेत गेला. "
ते सांगतात, "शाहू महाराजांच्या मृत्यनंतर रामराजे दत्तक प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. तरीही मराठ्यांच्या पडत्या काळात मराठा सरदारांना चेतना देऊन स्वराज्य राखण्याच्या त्यांच्या कार्याला कधीही उणेपणा येणार नाही."
ताराराणी या असामान्य धैर्य बाळगणाऱ्या प्रशासक होत्या असं मत इतिहासाचे अभ्यासक आणि प्राध्यापक सुरेश शिखरे व्यक्त करतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "पंचवीस वर्षांची एक विधवा राणी मुघल बादशहा औरंगजेबाशी लष्करी संघर्ष करावयास उभी ठाकते, सलग सात वर्षे संघर्ष करून त्यास चारीमुंड्या चित करते, ही बाब मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य घटना आहे, त्याचप्रमाणे अखंड हिंदुस्थानातील लोकांना अभिमानास्पद व स्फूर्तिप्रद वाटणारी आहे. मराठयांच्या स्वातंत्र्य-युद्धातील एक रणरागिणी म्हणून त्यांचे कार्य-कर्तृत्व दैदिप्यमान असे आहे. महाराणी ताराबाई तेजस्वी आणि तडफदार होत्या."
राजाराम महाराजांनंतर औरंगजेबाविरोधात त्यांनी कसा लढा दिला हे सांगताना शिखरे सांगतात, "वैधव्याचे दुःख गिळून मराठा राज्याची ढासळलेली बाजू सावरून धरण्यासाठी त्यांनी पदर खोवला, मराठा राज्याची राजसूत्रे आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. असामान्य धैर्य दाखवत मराठी राज्याच्या कारभाराची सर्व जबाबदारी उचलली, मुघल फौजांना हटवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला वऱ्हाड, खानदेश, गुजरात, माळवा इत्यादी मुघली प्रदेशात आपले लष्कर घुसवले आणि मुघल अधिकाऱ्यांना 'दे माय धरणी ठाय' म्हणावयास लावले."
"काबूलपासून बंगालपर्यंत व काश्मीरपासून कावेरीपर्यंत पसरलेल्या अफाट साम्राज्याच्या बादशहाशी सतत पंचवीस वर्षे लढा देवून मराठा राज्य जिवंत ठेवले हे मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या शेवटच्या पर्वाचे वैशिष्ट्य आहे. औरंगजेबाशी एकची निर्णायक लढाई न करता, त्यांनी त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्याशी गनिमीकाव्याचे युद्ध केले आणि शेवटी त्यास अगतिक करून टाकले. महाराष्ट्रास अखंड गुलाम करण्यास अधीर झालेल्या औरंगजेब बादशहास त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकले."
ताराराणींचा पन्हाळ्याचा वाडा
ताराराणी यांचा पन्हाळ्याचा वाडा आजही सुस्थितीत आहे. वाड्याला साजेसा भव्य दरवाजा आजही 300 वर्ष झाली उत्तम राखला गेला आहे. दरवाज्यावर शंभू महादेवाची पिंड कोरली असून त्यावर आजही जरीपटका फडकत आहे.
मोठ्या दगडी भिंती मधून जाणाऱ्या पायऱ्या आजही भव्यतेची साक्ष देतात. वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर लाकडी नक्षीकाम आजही उत्तम स्थितीमध्ये आहे.
वाड्याच्या चौकाला लागून असणाऱ्या त्या काळातील तुरुंगाच्या खोल्या, दरवाजे आहेत. त्याला असणारे दगडी खांब भक्कमतेची साक्ष देतात. चौकटीवरती गणपतीची कोरीव मूर्ती आहे. वाड्याच्या परिसरात छ्त्रपती शिवाजी महाराज मंदिर, शंभू महादेव मंदिर असून उत्तम स्थितीत आहे.
(बीबीसी न्यूज मराठी
No comments:
Post a Comment