विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

रयतेस आपल्या लष्कराचा त्रास झाल्यामुळे फौजेची खरमरीत शब्दात कानउघडणी करणारा महाराजा- श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार

 

रयतेस आपल्या लष्कराचा त्रास झाल्यामुळे फौजेची खरमरीत शब्दात कानउघडणी करणारा महाराजा-
श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार -----------------------------------------------------------
पोस्तसांभार :प्रसाद शिंदे 



श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार यांच्याकडे अफाट सेनासागर होता,त्याचप्रमाणे अनेक मराठा सरदारांकडे आपले बलाढ्य लष्कर होते.त्यामुळे लष्कराचा कुठल्या गावापाशी तळ पडल्यावर संबंधित गावाला थोड्याफार नुकसानाचा सामना करावा लागत असे.परंतु लष्कराच्या या धामधुमीला त्वरित पायबंद घालुन त्यांना मराठा सरदार चांगलेच फैलावर घेत.अशीच एक प्रकारची चूक आपल्या लष्कराकडून घडली असता महाराजा दौलतराव शिंदे सरकार यांनी आपल्या शिलेदार,सरदारांची खरमरीत शब्दात केलेली कानउघडणी या लेखातून पाहणार आहोत.
छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कार्यकाळात स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर झाले.मराठ्यांचे घोडे यमुना,हुगली नदीचे पाणी पिऊन दौड मारू लागले.परंतु मराठा मावळे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची शिकवण विसरले नाहीत.रयतेच्या भाजीच्या देठाला व लाकूडफाट्याला चुकूनही कोणी हात लावू नये.याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असा अपराध कोणी केला तर त्यास कडक शासन केले जाईल.छत्रपतींनी रयतेप्रती प्रेमभाव दाखवून दिलेल्या शिकवणची बीजे आपल्या मावळ्यांच्या मनात,हृदयात रुजवली.याचाच प्रत्येय पुढे अनेक घटनांमधून आला.महाराजा दौलतराव शिंदे सरकार यांचे या संबंधीचे पत्र पुढीलप्रमाणे,
||श्री||
श्री ज्योतिस्वरूप चरणी तत्पर
महादजी सुत दौलतराव शिंदे निरंतर
(श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार यांची मुद्रा)
रो स्वार सिलेदार व पागा व तोफखाना व उंटखाना व कंपुवाले यांचे खमासमान तिसैन मया व अलफै मौजे डुबेरे पो अकोले येथे तुम्ही कधीचा वैगेरे उपद्रव देउन घासदाना वस्ती ऐवज घेता म्हणोन विदित जाले त्याजवरून हे पत्र सादर केले असे तरी तुम्ही मौजे मारास कोणे विसी उपद्रव न देता खर्च वेच घेतला असेल तो माघारा देउन तेथुन उठोन दुसरे जागा जाणे फिरोन बोभाटा आलियास कार्यास येणार नाही जाणिजे छ.२४ जिल्हेज.
मोर्तब सुद
सोप्या भाषेत या पत्राचा अर्थ पुढीलप्रमाणे,
या पत्रात सिन्नरच्या परिसरात तंबू ठोकून असलेल्या आपल्या लष्करातील उंटखाना,पागा,इत्यादीचे शिलेदार,अधिकारी मंडळी डुबेरे गावी लोकांना नाहक त्रास देत होते याची हकीकत किंवा तक्रार दौलतराव शिंदेंकडे आली असता त्यांनी या गोष्टीची त्वरित दखल घेत यासंबंधी लष्कराला जाब विचारला असून गावातील जो काही घासदाना घेतला असेल तो त्या लोकांना ताबडतोब देऊन तिथून आपला मुक्काम लवकरात लवकर दुसरीकडे हलविण्यात यावा असा आदेश दिला आहे.रयतेकडून पुन्हा अशी तक्रार आल्यास किंवा आपल्याकडून पुन्हा-पुन्हा असा अपराध घडल्यास संबंधित शिलेदार,सरदारास कठोर शासन करण्यात येईल व फौजेतून त्याची हकालपट्टी करण्यात येईल त्यामुळे अशी गोष्ट पुन्हा आमच्या कानावर येणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
यातून आपणास हे लक्षात येते की छत्रपती शिवरायांनी दिलेल्या शिकवणीची मुळे किती खोलवर पसरली होती.श्रीमंत दौलतराव शिंदे सरकार यांच्या कार्यपद्धतीवर या शिकवणीची पडलेली छाप या पत्राच्या माध्यमातून नक्कीच दिसून येते.
-----------------------------------------------------------
©प्रसाद शिंदे पानिपतकर
संदर्भ-इंटरनेट वरून मिळालेले एक मोडी लिपीतील पत्र

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...