'वाकाटक' वंशातला हा पहिला राजा सातवाहनांचा मोठा अधिकारी असावा आणि सातवाहनांची सत्ता क्षीण झाल्यानंतर त्याने विदर्भात स्वतंत्र राज्य स्थापन केले असावे, असे म. म. मिराशींचे अनुमान आहे. पुराणातील वर्णनावरून तो विदिशेचा असावा, असेही अनुमान निघते. पण मिराशींच्या मते ते बरोबर नाही.
अजिंठा येथील लेखात विंध्यशक्तीच्या पराक्रमाचे खूप वर्णन केलेले असून त्याला 'वाकाटकवंशकेतू' म्हटले आहे.
काही विद्वानांच्या मते, त्याचे खरे नाव वेगळेच असून विंध्यपर्वतापर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केल्यानंतर त्याचे द्योतक म्हणून त्याने 'विंध्यशक्ती' हे बिरूद धारण केले होते. पण पुराणातील वर्णनावरून हा विस्तार त्याच्या पुत्राच्या वेळी झाला, असे दिसते. वाकाटकांच्या दानपत्रात विंध्यशक्तीचे नाव नाही. त्यातील वंशावळ प्रथम प्रवरसेनापासून सुरू होते, कारण तोच साम्राज्य संस्थापक होता.
प्रवरसेन पहिला (इ स २७० ते ३३०)-
विंध्यशक्तीच्या नंतर त्याचा पुत्र प्रवरसेन गादीवर बसला. पुराणात त्याला 'प्रवीर' म्हटले आहे. तो या वंशातील सर्वश्रेष्ठ नृपती होता. त्याने नर्मदेपर्यंत स्वारी करून 'पुरिका' ही नगरी जिंकली. ही नगरी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी होती, असे हरिवंशात म्हटले आहे. पूर्वेकडील दक्षिण कोसल, कलिंग, आंध्र आणि दक्षिणेकडील उत्तर कुंतल या प्रदेशांतील लहान-लहान राज्यांनी प्रवरसेनाचे वर्चस्व मान्य केले असावे. 'पुरिका' ही त्याची राजधानी होती.
प्रवरसेन हा वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता. त्याच्या वंशजांच्या बहुतेक सर्व ताम्रपटात त्याने केलेल्या चार अश्वमेधांचा व सात सोम यागांचा उल्लेख आढळतो. त्याने 'धर्म महाराज' व 'सम्राट' या पदव्या धारण केल्या होत्या.
आपल्या साम्राज्याला बळकटी आणण्यासाठी प्रवरसेनाने नागवंशी भारशिवांशी वैवाहिक संबंध जोडला. भारशिव नृपती भगनाग याने आपली कन्या प्रवरसेनाचा ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र याला दिली.
प्रवरसेनाला चार पुत्र होते. ते सर्व राजे झाले. वाशीम येथील ताम्रपटात सर्वसेन याचा उल्लेख आलेला आहे. गौतमीपुत्र अगोदरच निधन पावला होता. त्याचा पुत्र रूद्रसेन हा प्रवरसेनानंतर गादीवर बसला. तो कदाचित 'पुरिका' येथून राज्य करीत असावा किंवा त्याने आपली राजधानी नंदीवर्धन (नगरधन) येथे नेली असावी. त्याची सत्ता उत्तर विदर्भावर होती. दुसरा पुत्र सर्वसेन याचे राज्य दक्षिण विदर्भावर होते. त्याची राजधानी वत्सगुल्म (वाशीम) होती. इतर दोन पुत्रांची माहिती उपलब्ध नाही.
No comments:
Post a Comment