विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 15 August 2022

महाराष्ट्रीय 'वाकाटक' राजवंश भाग १

 

महाराष्ट्रीय 'वाकाटक' राजवंश
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे


भाग १
प्राचीन काळात भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध साम्राज्ये अस्तित्वात आली, त्यामध्ये 'वाकाटक' साम्राज्याचा अंतर्भाव करावा लागेल. वाकाटक राज्य 'विंध्यशक्ती' याने स्थापन केले आणि त्याचा मुलगा 'प्रवरसेन' याने ते राज्य सांभाळले आणि वाढवले सुद्धा!
या राजघराण्याचा मूळ पुरुष 'वाकाटक' हा इ.स. २०० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा एक त्रुटित लेख पूर्वीच्या आंध्रप्रदेशातील अमरावती स्तूपाजवळ एका अष्टकोनी स्तंभावर कोरला आहे. त्यात त्याने तेथे केलेल्या दानाचा उल्लेख आहे.
अजिंठ्याच्या सोळा क्रमांकाच्या लेण्यात देखील या घराण्यातील पहिला राजपुरुष 'विंध्यशक्ती' याला ‘द्विज’ म्हटले आहे. त्यावरून हे घराणे ब्राह्मण होते, असे दिसते.
मूलस्थान-
वाकाटक घराणे मूळचे उत्तर भारतातील होते, असे काही पंडितांचे मत आहे. झाशी जिल्ह्यात 'बागाट' नावाचे एक गाव आहे. त्याचे मूळ नाव 'वाकाट' असावे आणि तेच वाकाटकांचे मूलस्थान असावे, असे अनुमान डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांनी केले आहे. पण ते सिद्ध करण्याजोगा कोणताही पुरावा अजून उपलब्ध झालेला नाही. शिवाय वाकाटकांचा एकही शिलालेख विंध्य पर्वताच्या उत्तरेला सापडलेला नाही.
कंकाली देवी मंदिर, तिगावा (जि. जबलपूर) 👇
वऱ्हांड्यातील छतावरील दंपती शिल्प, गुहा क्र. १६, अजिंठा
वाकाटककांचे बहुतेक सर्व ताम्रपट विदर्भात सापडले आहेत. डॉ. वा. वि. मिराशी यांच्या मते वाकाटक घराणे मूळचे दक्षिण भारतातील होते. वाकाटक हे नाव असलेला सर्वात प्राचीन शिलालेख अमरावती जवळ असलेल्या एका स्तंभावर कोरलेला आहे. या लेखातील वाकाटक हे 'वंशनाम' नसून 'व्यक्तीनाम' आहे. त्यावरून आणि आणखी काही प्रमाणे देऊन हे घराणे दाक्षिणात्य होते, असे डॉ. मिराशी यांनी म्हटले आहे.
तथापि वाकाटकांचे मूळ स्थान कोणते हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे. पण डॉ. पु. ग. सहस्त्रबुध्दे यांच्या मते, वाकाटक राजांची कर्मभूमी कोणती होती व ते कोणत्या प्रदेशांना साम्राज्याचे भाग मानीत, या गोष्टींना अधिक महत्व आहे आणि तेच खरे निकष आहेत.
शिलालेख आणि ताम्रपटांच्या आधारे हे सिद्ध झाले आहे की, वाकाटकांच्या राज्याची स्थापना सर्वप्रथम विदर्भात झाली.
रामटेक जवळची 'नंदीवर्धन' ही त्यांची पहिली राजधानी होती तर 'वत्सगुल्म' व 'प्रवरपूर' (पवनार) ह्या नंतरच्या राजधान्या होत्या.
वाकाटकांचे मूळ राज्य नागपूर, विदर्भ, कुंतल, अश्मक व मूलक या महाराष्ट्रातील प्रदेशांवर होते आणि त्यांचे साम्राज्य माळवा, कोसल, लाट, कलिंग व आंध्र ह्या प्रदेशांवर होते.
वाकाटकांचे बहुतेक कोरीव लेख, त्यांनी बांधलेली मंदिरे व त्यांच्या राजवटीतील लेण्या महाराष्ट्रातच आहेत. त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला आश्रय देऊन त्या भाषेत स्वतः काव्यरचनाही केली. महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी होती. यावरून हे घराणे महाराष्ट्रीय होते, हे दिसून येते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...