विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 15 August 2022

सेनापती संताजी घोरपडे यांची 'बुऱ्हाणपूर' मोहिम-

 सेनापती संताजी घोरपडे यांची 'बुऱ्हाणपूर' मोहिम-

पोस्तसांभार ::सतीश राजगुरे

 

मराठ्यांचे सरसेनापती संताजी घोरपडे हे अतिशय पराक्रमी आणि गनिमी काव्याच्या युद्धनितीमध्ये माहीर होते. मराठेशाहीत संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत घेतले जाते. या दोघांनी मिळून दीर्घकाळ औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये त्यांची प्रचंड दहशत होती.

संताजी घोरपडे यांनी खानदेशवर स्वारी केली, त्याचवेळी बुऱ्हाणपूर मोहीमही फत्ते केली होती. याचा उल्लेख डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'सेनापती संताजी घोरपडे' या पुस्तकात आलेला आहे.

सेनापती संताजी घोरपडे यांची 'बुऱ्हाणपूर' मोहिम-

उत्तर कर्नाटकातून संताजींनी आपल्या वीस हजार फौजेसह औरंगाबादच्या दिशेने कूच केले. या प्रदेशात त्यांनी धुमाकूळ माजवून ठिकठिकाणी लूट केली आणि मोगल फौजा तिथे पोहोचण्यापूर्वीच जानेवारी १६९५ मध्ये खानदेशातील धरणगाव गाठले. धरणगाव औरंगाबादच्या उत्तरेस ८० मैलांवर आहे.

तेथून त्यांनी औरंगजेबाचे संपन्न असे 'बुऱ्हाणपूर' शहर गाठले. हे शहर तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गावरील मोगलांचे बुऱ्हाणपूर जसे महत्वाचे लष्करी ठिकाण होते तसेच ते धनाढ्य लोकांचेही शहर होते.

औरंगाबादहून मराठे इतक्या वाऱ्याच्या वेगाने मराठे इतक्या दूरवर भरारी मारतील, असे बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराला वाटत नव्हते. पण आलेल्या संकटाला सामोरे जाण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

बुऱ्हाणपूर शहराच्या वेशीवर संताजी यांनी सुभेदाराकडे चौथाईची मागणी केली. मराठ्यांच्या मागण्या मान्य करणे, म्हणजे आपला अपमान असे समजून सुभेदाराने चौथाईची मागणी धुडकावली.

सुभेदाराने खंडणी देण्यापेक्षा मराठ्यांविरुद्ध लढण्याची तयारी केली व तो आपले सैनिक घेऊन संताजींना रोखण्यासाठी शहराबाहेर आला. पण संताजी आणि मराठा सैन्यासमोर त्याचा निभाव लागला नाही. झालेल्या लढाईत सुभेदाराच्या सैन्याचा तात्काळ धुव्वा उडाला. मोगल सैन्याचा पराभव होऊन बुऱ्हाणपूर शहर मराठ्यांच्या ताब्यात आले. मराठ्यांनी शहरातील संपत्ती ताब्यात घेतली. अमाप पैसा, जडजवाहीर हातात लागले.

(स्त्रोत: इन मराठी)

बुऱ्हाणपूर लुटले गेल्याची बातमी कानावर पडताच औरंगजेबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बुऱ्हाणपूरचा पराभव हा सुभेदाराचा नादानपणा आहे, असे त्याला वाटले. त्यामुळे अशा नादान सुभेदाराची जाहीर बेइज्जती करण्याच्या उद्देशाने आलमगीर औरंगजेबाने त्याच्याकडे 'बांगड्यांचा आहेर' पाठविल्याचे सुरतकर इंग्रज लिहितात.

"He (the Emperor) had sent him (the Governer of Burhanpur) some of those rings women wear on their arms for he had more men in the field than Santoo (Santaji)."

"बादशहाने बुऱ्हाणपूरच्या सुभेदाराकडे बायका आपल्या हातात घालतात, तशा बांगड्या पाठवून दिल्या आहेत. कारण संताजीच्या सैन्यापेक्षा जास्त सैन्य त्याच्याजवळ होते." (असे असूनही त्याचा मानहानीकारक पराभव झाला होता.)

याचवेळी आलमगीर औरंगजेबाने गाझीउद्दिनखान बहादूर या सरदारास खानदेशात तातडीने जाण्याचा आणि संताजीस शिक्षा करण्याचा हुकुम फर्माविला..! पण गाझीउद्दिनखान तिथे जाईपर्यंत मराठे पसार झाले होते..!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...