विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 12 August 2022

आग्रावीर हिरोजी फर्जंद (भोसले)

 

⚔️🧡 आग्रावीर हिरोजी फर्जंद (भोसले)🧡⚔️

पोस्तसांभार ::


हिरोजी फर्जंद यांचा जन्म १६२३ साली कर्नाटक राज्यातील बंगळूर प्रांतात शहाजीराजे यांच्या पोटी झाला. अनेकांना आश्चर्य वाटले असेल की फर्जंद म्हणजे काय..? आणि हिरोजी यांनी भोसले आडनाव का लावले नाही. सगळ्याचा उलगडा होईल..

शहाजीराजे यांना ३ पत्नी होत्या. आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ व त्यांचा २ रा विवाह हा तळबीडचे संभाजी मोहिते यांच्या भगिनी व हंबीरराव मोहिते यांच्या आत्या तुकाबाई मोहिते यांच्याशी झाला. तर ३ रा विवाह नरसाबाई यांच्याशी झाला. या ३ पत्नीकडून त्यांना ५ पुत्र होते.. तर या व्यतिरिक्त अनौरस स्त्री कडून झालेले ३ पुत्र शहाजीराजे यांना होते. असे मिळून ८ पुत्र होते. तर हिरोजी फर्जंद हे अनौरस स्त्री कडून झालेले शहाजीराजांचे अनौरस पुत्र होते. म्हणून त्यांना भोसले आडनाव लावता आले नाही. प्रतापराजे व भिंवजीराजे हे दुसरे २ अनौरस पुत्र देखील शहाजीराजांना होते. शहाजीराजे बंगळूर प्रांती असताना हिरोजी यांचा जन्म झाला.

१६४३ पर्यंत त्यांना शहाजीराजांनी बंगळूर प्रांतात ठेवले होते. पुढे १६४३ साली शहाजीराजे यांना मायभूमी सोडून बंगळूर प्रांतात जावे लागले. पुढची २ वर्षे हिरोजी शहाजीराजांसोबत राहिले. मात्र १६४५ साली शहाजीराजांनी छत्रपती शिवरायांची पाठराखण करण्यासाठी हिरोजी यांना महाराष्ट्रात पाठवले. हिरोजी छत्रपती शिवरायांच्या सेवेत रुजू झाले. त्यांना १६४५ साली छत्रपती शिवरायांचा राजाश्रय मिळाला होता. म्हणून तेव्हापासून त्यांना "फर्जंद" या नावाने ओळखले जाऊ लागले. कारण त्या काळात राजाश्रय मिळालेल्या व्यक्तीला "फर्जंद" असे संबोधले जायचे. हिरोजी "फर्जंद" झाले. हिरोजी फर्जंद हे शिवरायांचे सावत्र भाऊ होते.

१६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेताना हिरोजी फर्जंद शिवरायांसोबत होते. पुढे ते कायम छत्रपती शिवरायांसोबत राहिले.

१६५९ साली प्रतापगडच्या युद्धात देखील त्यांचा उल्लेख आढळतो.👇

"भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले."

महाराजांनी अफजखानाचा कोथळा बाहेर काढला. व आपले मावळे त्याच्या फौजेवर तुटून पडले. त्यावेळेस हिरोजी फर्जंद यांनी शत्रुची मोठी दाणादाण उडवून दिली होती.

१६६२ साली प्रतापराव गुजर यांनी चाकणवर विजय मिळवला. म्हणून महाराजांनी संग्रामदुर्गच्या किल्लेदार पदी प्रतापराव गुजर यांची निवड केली. व त्यांच्या जागी हिरोजी फर्जंद हे राजगडाचे नवे "तटसरनौबत" बनले.

१६६३ साली लाल महालात छापा टाकायला महाराज व मावळे गेले होते. तेव्हा तटसरनौबत हिरोजी फर्जंद यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी राजगड शाबूत ठेवली होती.

१६६४ साली सुरत लुटीवेळी शिवराय व मावळे परप्रांतात गेले होते तेव्हा देखील तटसरनौबत हिरोजी फर्जंद यांच्यावर राजधानी राजगडाची म्हणजेच अवघ्या हिंदवी स्वराज्याची जबाबदारी महाराजांनी दिली होती. व त्यांनी ती चोख पार पाडली. राष्ट्रमाता जिजाऊ यांची सुद्धा काळजी घेतली.

१६६५ साली महाराज मिर्झाभेटी गेले तेव्हा देखील तटसरनौबत हिरोजी फर्जंद यांनी राजगड सांभाळला होता.

पुढे १६६६ साली छत्रपती शिवरायांनी हिरोजी फर्जंद यांचे तटसरनौबत पद काढून घेतले. व त्यांची अंगरक्षक पदी निवड केली. व आग्रा भेटीला जाताना महाराजांनी अंगरक्षक हिरोजी फर्जंद यांना सोबत घेतले.

१९ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवरायांनी शंभुराजे यांच्यासहित पेटाऱ्यातून आग्र्यातून पलायन केले.औरंग्याच्या हातावर तुर्या दिल्या. मात्र जाण्याआधी त्यांच्या कैदखान्यात हिरोजी फर्जंद यांना मागे ठेवले होते. शिवरायांच्या आदेशानुसार हिरोजी यांनी महाराजांचे वेशांतर केले होते. व ते महाराजांच्या पलंगावर झोपले. आणि राजांचा सेवक मदारी मेहतर हा हिरोजी फर्जंद यांचे पाय चेपत होता. महाराजांचे सावत्र भाऊ असल्यामुळे हिरोजी हुबेहूब महाराजांसारखे दिसत होते. जाताना महाराजांनी हिरोजी यांना त्यांची अंगठी दिली होती. व अंगठी घातलेला हात हिरोजी फर्जंद यांनी अंथरूणाबाहेर काढून ठेवला होता. जेणेकरून पोलादखान येताच त्याला ती अंगठी बघून छत्रपती शिवरायच झोपलेत असे वाटत होते. जवळ जवळ ३ प्रहर म्हणजे ९ तास हिरोजी फर्जंद हे महाराजांच्या आदेशानुसार त्यांच्या मृत्यूच्या पलंगावर झोपले होते. काही काळानंतर पुन्हा पोलादखान आत आला. त्याने मदारी मेहतर याला विचारले.. "राजाजी क्यू उठते नहीं." यावर मदारी म्हणाला.. ते आजारी असल्यामुळे इतका वेळ झोपले आहेत.. त्यांना कृपया उठवू नये.. असे म्हणताच पोलादखान तिथून निघून गेला. आणि ३ प्रहारानंतर हिरोजी फर्जंद हे पलंगावरून उठले.. राजांचा वेश उतरवला. त्यांचा जिरेटोप, रुद्राक्षाच्या माळा या पलंगावर ठेवल्या व उश्या पलंगावर ठेवल्या आणि वरून अंथरूण पांघरले. "औषध आणायला जातो..राजांना उठवू नये ते गाढ झोपेत आहेत." असे बाहेरील शिपायांना सांगून हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर यांनी देखील आग्ऱ्यातून पलायन केले. अक्षरशः हिरोजी फर्जंद यांना पुनर्जन्म मिळाल्याचा भास झाला.. कारण मृत्यूच्या पलंगावर "प्रतिशिवराय" बनून हिरोजी निजले होते. ही फार मोठी कामगिरी हिरोजी फर्जंद यांनी आग्ऱ्यात पार पाडली. शिवरायांसाठी स्वतः चा जीव टांगणीला लावला होता. म्हणून राजगडी आल्यावर महाराजांनी हिरोजी फर्जंद यांना "आग्रावीर" हा किताब देऊन गौरव केला.

पुढे १६७४ रोजी राज्याभिषेक सोहळ्यामध्ये १ ल्या पालखीचा मान मिळाला. व छत्रपती शिवरायांनी स्वतंत्र सरदारकी बहाल केली.

पुढे १६७६ साली दक्षिण दिग्विजय मोहिमेला जातानाही छत्रपती शिवरायांनी आग्रावीर सरदार हिरोजी फर्जंद यांना सोबत घेतले होते.

१६७८ साली महाराज व मावळे दक्षिण दिग्विजय करून महाराष्ट्रात आले तेव्हा सरदार हिरोजी फर्जंद सुद्धा महाराष्ट्रात आले.

१६८० साली छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर सोयराबाई यांनी हिरोजी फर्जंद यांना "राजारामराजे हे गादीवर बसावे अशी महाराजांची शेवटची इच्छा होती." ही खोटी गोष्ट सांगितली.. व हिरोजी फर्जंद यांना आपल्या बाजूने वळवून घेतले. इथूनच स्वराज्याचे एकनिष्ठ सरदार हिरोजी फर्जंद यांचं पहिलं पाऊल चुकीच्या मार्गावर पडले..!

शंभुराजे पन्हाळी असताना आग्रावीर हिरोजी फर्जंद हे पन्हाळ्याची देखरेख करत होते.शंभूराजे यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न तसेच महाराजांच्या निधनाची वार्ता कळू न देण्याची जबाबदारी हिरोजी फर्जंद यांनी पार पाडली.

सगळे फितुर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी पन्हाळगडी कैद केल्यावर हिरोजी फर्जंद हे खजिना घेऊन तिथून पळून गेले. ज्योत्याजी केसरकर यांनी हिरोजी फर्जंद यांना जेरबंद करून पन्हाळ्यावर आणले. व तिथून सर्वांना. रायगडी हलवले.

एकेकाळची पुण्याई म्हणून हिरोजी फर्जंद यांना छत्रपती शंभूराजे यांनी सोडून दिले. मात्र त्यांची सरदारकी कायमची काढून घेतली.

त्यांच्या या कृत्यामुळे १६८१ साली राज्याभिषेक सोहळ्यामध्ये हिरोजी फर्जंद यांचा अजिबात मान सन्मान केला नाही.. ना त्यांना त्यांची सरदारकी परत दिली.

पुढे १६८१ सालीच शहजादा अकबर हा औरंग्याविरुद्ध बंड करून महाराष्ट्रात आला.. तेव्हा शंभूराजे यांनी त्याला सुधागड येथे आश्रय दिला. व हिरोजी फर्जंद यांना वकील म्हणून त्याच्या छावणीत पाठवले.

मात्र गेलते वकील म्हणून आणि वास्तवात केली फितुरी..!

हिरोजी यांनी अण्णाजी दत्तो व बाकी मंत्र्यांचे शहजादा अकबर याच्याशी संधान बांधून दिले.शंभूराजे यांचा घात करण्यासाठी अर्धे स्वराज्य द्यायचे या लोकांनी कबूल केले. तसं पत्र यांनी लिहिलेे. व सोयराबाई यांचा शिक्का उमटवून ते पत्र हिरोजी फर्जंद यांनी अकबराला दिले.

मात्र शहजादा अकबर याने ते पत्र पन्हाळ्यावर शंभूराजे यांच्याकडे पाठवले. व सगळं पितळ उघडं पडलं.

हे कळताच गद्दारांनी सुधागड येथून पळ काढला. व एका क्षणात पसार झाले. रायाप्पा याने कोकणात आग्रावीर हिरोजी फर्जंद यांना कैद केले व शंभूराजे यांच्यासमोर रायगडी उभा केले.

तेव्हा राजांनी अजिबात गय केली नाही.१६८१ साली वयाच्या ,५८ व्या वर्षी सुधागड येथील औंढ्याच्या माळावर हिरोजी फर्जंद यांना हत्तीच्या पायी दिले..!🙏

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...