विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 August 2022

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……भाग ७

 

इचलकरंजीत मराठेशाहीच्या पाऊलखुणा ……
लेखक ::संजय खूळ


भाग ७
आणि १७३९ ला असे झाले इचलकरंजी गावकूसाचे बांधकाम
यंकटराव आणि अनुबाई हे मोठे झाल्याने ते पुण्यात रहावयास यावेत अशी पेशव्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी १७२२ मध्ये इचलकरंजीचे संस्थानिक व्यंकटराव यांना पुण्यात वाडा बांधून दिला आणि त्यांच्या सोयीसाठी मौजे वडगाव तर्फ चाकण संपूर्ण गाव आणि पर्वती नजिकचा भाग व हडपसर येथील बाग इनाम म्हणून दिले होते.त्यामुळे व्यंकटराव हे वर्षातून काही दिवस पुण्यात राहत होते. सातारच्या शाहू महाराजांनी व्यंकटराव यांना आपल्याजवळ येण्या जाण्याची आज्ञा केली. त्यामुळे व्यंकटरावांचे साताऱ्यास नेहमी येणे-जाणे राहू लागले. पूर्वी व्यंकटराव यांचे पथक 500 स्वारांचे होते, ते 700 स्वारांचे झाले. पथकास महाराजांनी जो सरंजाम लावून दिला होता, त्यात आणखी काही गावांची वाढ केली आणि कडलास, पापडी व बेडक ही गावे वतन म्हणून दिली. व्यंकटराव यांचे साताऱ्यात नियमित येणे-जाणे असल्यामुळे त्यांना तेथे वाडा बांधण्यासाठी जागा दिली. पाडळी येथे एक चाडून जमीन व मौजे शिरगाव ( सातारा) प्रांत वाई या गावाचा मोकासा इनाम दिला. शाहू महाराजांनी नेमून दिलेल्या साताऱ्याजवळील जागेत व्यंकटराव यांनी वाडा बांधला व पेठ बसवली. त्याला व्यंकटपुरा या नावाने नावाने संबोधले जात होते.
व्यंकटरावांना 1724 मध्ये पुत्र झाला. त्याचे नाव नारायणरावतात्या ठेवण्यात आले. 1731च्या सुमारास सहा-सात वर्षांचा असताना त्याची मुंज व लग्न केले. पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. त्या काळी पुस्तकी विद्या शिकून अथवा परीक्षा देऊन तयार झालेल्यांचा मुलकी अगर लष्करी कामात काहीच उपयोग होत नव्हता.अशा विद्या शिकण्यासाठी शाळा नव्हत्या.ज्याला कारकून,मुत्सद्दी अथवा सरदार व्हायचे असेल त्यांनी त्या पदाच्या खालच्या पायरीपासून शिकले पाहीजे अशी त्याकाळी पद्धत होती. नारायण वयात येताच त्यांच्या हवाली देशमुखी कारभार दिला आणि त्रंबकहरी पटवर्धन यांना त्याचे दिवाण म्हणून नेमले. पूर्वी मिरज व पन्हाळा प्रांताची सनद शाहू महाराजांनी पिराजी घोरपडे यांना दिली होती. पिराजी घोरपडे यांच्या निधनानंतर ही सनद व्यंकटरावांना यांना देण्यात येणार होते. मात्र त्यांनी ती सनद नाकारून पिराजी यांचा मुलगा राणोजी यांना दिली. त्यामुळे शाहू महाराजांनी 1734 मध्ये सनद राणोजी यांच्या नावे केली. व्यंकटरावांच्या या कृतज्ञतेचा मोठा आनंद राणोजी यांना झाला व त्यांनी 1735 मध्ये मौजे रांगोळी( सध्याचे ता. हातकणंगले) आपले इनाम गाव व्यंकटरावांना इनाम करून दिले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...