विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ४ राजा सातकर्णी


 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग
राजा सातकर्णी

कृष्णा नंतर सिमुकपुत्र सातकर्णी हा सातवाहन सम्राट झाला. महाराष्ट्रातील महारथी त्रणकयिराच्या कन्ये सोबत सातकर्णीचा विवाह झाल्याने त्याचा प्रभाव खूपच वाढला होता. नाणेघाटातील लेखावरून सातकर्णी हा बलाढ्य पराक्रमी राजा असल्याचे दिसते.
त्याचे राज्य कोकण, नाशिक, खानदेश, वऱ्हाड, नागपूर, भंडारा येथ पर्यंत पसरले होते. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशातील सांची येथे सापडलेला शिलालेख हा सातकर्णीचा मुकादम असलेल्या वासिष्ठीपुत्र आनंद याने कोरलेला असून त्यात तो स्वतःचा उल्लेख 'राजा श्री सातकर्णीचा आवेशनिक' असा करतो. यावरून सातकर्णीचा अंमल हा मध्यप्रदेशापर्यंत पसरला होता असे दिसते.

आपल्या कारकीर्दीत सातकर्णीस खारवेल राजा भिक्षुराज याच्या आक्रमणास तोंड द्यावे लागले. खारवेलाने वैनगंगा नदीपर्यंत मुसंडी मारून सातकर्णीस जोरदार आव्हान दिले. तेव्हा पौनी परिसरात मोठे युद्ध होऊन सातकर्णीने खारवेलचा पराभव केला. दुसऱ्या स्वारीच्या वेळी खारवेलाने सातकर्णीशी युद्ध टाळून त्याच्या रठीक भोजिक या मांडलिकांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला. मात्र दोन्ही आक्रमणात त्याला सातकर्णीचा पराभव करता आला नाही.

सातकर्णी जसा पराक्रमी होता तसाच धार्मिक ही होता. त्याने राज्यावर आल्यावर दक्षिणापथाचे बरेच भाग जिंकून घेतले आणि या दिग्विजयार्थ नंतर दोन अश्वमेध यज्ञ देखील केले. या सोबतच एक राजसूय यज्ञ आणि अनेक श्रौतयाग करून हजारो गाई, अनेक अश्व, गज, वस्त्रे, कार्षपण ( नाणी) आणि धान्याच्या राशी यज्ञातील ब्राह्मणांना यज्ञ सेवकांना दान दिल्याचे नाणेघाट येथील शिलालेखात म्हटले आहे.
अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून त्याने आपले त्याची पत्नी असलेल्या नागनिकेचे चांदीचे जोड नाणे चलनात आणले होते. त्यावर अश्वमेधाच्या आश्र्वाची प्रतिमा आहे. या सोबतच त्याची इतरही अनेक नाणी चलनात होती. त्यात चांदी, तांबे, शिसे, पोटिन या धातूंचा वापर केला गेलेला होता. या नाण्यांवर अश्व, गज, वृषभ आणि शार्दुल आदींच्या आकृत्या होत्या.
यासोबतच राजा सातकर्णी पासून सातवाहन हे वंशनाम नाहीसे होऊन सातकर्णी हेच वंशनाम रूढ झाले. नंतर आलेल्या राजांनी आपल्या नावापुढे सातकर्णी हे वंशनाम लावल्याचे दिसते. उदा. कौशिकीपुत्र सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाशिष्ठीपुत्र सातकर्णी, कुंभ सातकर्णी, विजय सातकर्णी, वगैरे. एकंदरीतच सातकर्णी हा सातवाहन कुळातील एक महत्तम पराक्रमी राजा होता हे नक्की.

पुराणांनुसार सातकर्णी नंतर राजा पूर्णोत्संग गादीवर आला. तर काहींच्या मते सातकर्णीचा पुत्र वेदश्री हा राजा झाला, मात्र अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनीका ही राज्यकारभार चालवत होती. 

-
प्राजक्ता देगांवकर

संदर्भ
) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचिकर
) महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास मुसलमानपूर्व महाराष्ट्र - वा. कृ. भावे
) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...