विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ५ राणी नागनिका


 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे
भाग

राणी नागनिका

सातकर्णीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वेदश्री हा गादीवर आला मात्र तो अल्पवयीन आल्याने त्याची आई नागनिका हीच राज्यकारभार बघत होती असे दिसते.
नाणेघाट येथील लेणे हे नागनिका हिनेच कोरलेले आहे. त्यात कोरलेल्या लेखात नागनिका ही सातकर्णी राजाची भर्या असून, स्कंदश्री याची माता होती, अंगिकुलवर्धन वंशातील महारथी त्रणकयिरा याची कन्या होती, असे नमूद केले आहे. तिला 'नागवरदायिनी ', ' मासोपवासिनी’, ‘गृहतापसी’, ‘चरितब्रह्मचर्या’, अशी विशेषणे लावलेली आहेत. यावरून तिचा दिनक्रम हा वैराग्यपूर्ण होता असे दिसते. पतीच्या निधनानंतर तिने राज्यशकट यशस्वीपणे चालवला. यावरून तत्कालीन स्त्रियांना राजकारणात तसेच समाजात श्रेष्ठ स्थान असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर नाणेघाटातील लेण्यांमध्ये तिच्या पतीच्या सातकर्णीच्या प्रतिमेच्या आधी नागनिकेची प्रतिमा कोरण्यात आलेली दिसते. सातवाहन घराण्यातील तिचे महत्त्वाचे स्थान स्पष्ट करण्यासाठी तिची प्रतिमा राजा सिमुक याच्या नंतर खोदलेली आहे. नागनिका ही अत्यंत जिद्दीची मानी स्त्री असल्याचे तिच्या नाणेघाटातील लेखावरून दिसते. याच लेण्यात तिच्या दोन पुत्रांच्या प्रतीमांनंतर तिच्या पित्याची प्रतिमा कोरलेली आहे. सातवाहन कुळात आपल्या पित्याची प्रतिमा कोरणारी ही इतिहासातील बहुदा पहिलीच राणी असावी. पित्याच्या प्रतीमेखाली अंगियकुलवर्धन सागरवलयांकित पृथ्वीवरील श्रेष्ठ वीरअसे बिरूद ही कोरलेले आहे. यावरून तिचा दराराही स्पष्ट होण्यास मदत होते.

तिच्या पती प्रमाणेच नागनिका सुद्धा धार्मिक वृत्तीची होती. ती स्वतःहा यज्ञदीक्षादिकात निष्णात असून तिने आपल्या पती सोबत अश्वमेध, राजसूय, गवामयन, गर्गत्रिरात्र, अंगिरसामन, अंगिरसातिरात्र, शततिरात्र अश्या अनेक यज्ञांमध्ये उत्साहाने सहभाग घेतलेला होता.
अश्वमेध यज्ञाची स्मृती म्हणून सातकर्णीचे नागनिकेचे जोड नाणे चलनात होते. त्याच्या एकाबाजूला ' रजो सिरी सतकनिस ' तर दुसऱ्या बाजूला नागनिकाअशी नावे स्पष्ट कोरलेली आहेत.

तिचा पुत्र वेदश्री राज्यकारभार करण्यालायक झाल्यावर तिने आपले आयुष्य व्रतवैकाल्यांना वाहून घेतल्याचे एका तपस्वीनी सारखे जीवन जगल्याचे दिसते. तिला पतीनिधनासमावेत पुत्र निधनाचे दुःख सुद्धा सहन करावे लागले. कारण तिचा जेष्ठपुत्र भायल कनिष्ठ पुत्र सातवाहन हे अल्पयीन असतानाच मरण पावले होते.

प्राचीन महाराष्ट्रातील राजेही मालिका जरी प्राचीन राजांची माहिती देणारी असली तरी राणी नागनिके शिवाय नक्कीच अपूर्ण राहिली असती. 

-
प्राजक्ता देगांवकर

संदर्भ
पुराभिलेख विद्या - शोभना गोखले
सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा.श्री. मोरवंचीकर
प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...