विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग ११ क्षत्रपराजा नहपान


 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग ११

 

क्षत्रपराजा नहपान

 

महाराष्ट्रातील क्षहरात घराण्यातील पहिला माहीत असलेला क्षत्रप म्हणजे भुमक होय. याच्या विषयी जास्त माहिती उपलब्ध नसली तरी त्याची नाणी मात्र मुबलक प्रमाणात मिळालेली आहेत. गुजरात, काठेवाड, माळवा या ठिकाणी मिळालेली नाणी आणि इतर पुराव्यांवरून भुमकाचा अंमल माळवा, गुजरात, सौराष्ट्र, बेहडाघाट या परिसरावर असावा असे दिसते. भुमकाच्या नाण्यांवर दर्शनी बाजूस खरोष्टी मध्ये छत्रपस भुमकसआणि मागील बाजूस ब्राह्मी मध्ये 'क्षहरातस क्षत्रपस भुमकस ' असा लेख आढळतो.

 

भुमकानंतर नहपान हा क्षत्रप झाला. त्याचे आणि भुमकाचे नाते काय असावे याचा काही अंदाज आज बांधता येत नाही. नहपानाने राजा ही पदवी धारण केली होती. नहपान हे इराणी नाव असून नह म्हणजे जनता आणि पन म्हणजे रक्षणकर्ता, म्हणजेच जनतेचे रक्षण करणारा असा अर्थ होय. यावरून हे एक उपपद असावे असे वाटते.

 

नहपानाने ..९८ ते १२४ अशी सव्वीस वर्षे राज्यकारभार केला. त्याचे कोणतेही कोरीव लेख उपलब्ध नाहीत. असे असले तरी त्याचा जावई उषवदत्त आणि मंत्री असणाऱ्या आयम यांच्या लेखातून नहपानाच्या कारकीर्दीचा तपशील आपल्याला मिळतो.

नहपान कालीन नाशिक, कार्ले, जुन्नर या लेखांवरून त्याचे राज्य उत्तरेस अजमेर, दक्षिणेस नाशिक - पुण्यापर्यंत तर पश्चिमेस गुजरात काठेवाड, उत्तर कोकणापासून ते पूर्वेस माळव्या पर्यंत पसरलेले होते. त्याची चांदीची तांब्याची नाणी मुबलक प्रमाणात मिळालेली आहे. नहपानाने स्वतःच्या नाण्यांवर मागील बाजूस क्षहरात वंशाची वज्र, वर्तुळ, बाण ही चिन्हे कोरलेली दिसतात तर दर्शनी बाजूस स्वतःचा मुखवटा कोरलेला आहे. तसेच त्याच्या नाण्यांवर ग्रीक, ब्राह्मी आणि खरोष्टी अश्या तीन लिप्यात भाषेत त्याचे ' रात्रौ क्षहरात नहपानस ' हे नाव कोरण्यात आले आहे. इतक्या भाषेत नाणी प्रचारात आणणारा तोच एकमेव नृपती असावा.

नहपानाच्या काळात क्षत्रपांचे पाश्चिमात्य देशाशी व्यापारी संबंध मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसते. त्यांनी पश्चिमेकडील किनारपट्टी आणि अरबी समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सातवाहनांशी संघर्ष केल्याचे पेरीपलस या ग्रंथात म्हणले आहे.

 

सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीचे वडील असणाऱ्या शिवस्वातीच्या काळात नहपानाने सातवाहानांकडून गुजरात, काठेवाड, माळवा, कोकण आणि महाराष्ट्राचा काही भाग जिंकून घेतला. सातवाहनांची राजधानी असणारे पैठणसुद्धा त्याने जिंकून घेतले होते. यावरून त्याचा पराक्रम सिद्ध होतो.

नहपानाच्या अखेरच्या कारकीर्दीत सातवाहनांचा पराक्रमी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने अठरा वर्षे नहपानाशी यूध्दे केली, अखेर नाशिक जवळील गोवर्धन परिसरात गौतमीपुत्राने नहपानाचा संपूर्ण पराभव केला महाराष्ट्रातून क्षत्रपांचे समूळ उच्चाटन केले.

 

सातवाहन क्षत्रप घराण्यातील संघर्षात सातवाहन राजे यावेळेस जरी विजयी झाले असले तरी क्षत्रपांच्या नंतरच्या आक्रमणामुळे त्यांना आंध्रामध्ये स्थलांतरित व्हावे लागले.

 

 

 

- प्राजक्ता देगांवकर

 

 

संदर्भ

) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...