विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 11 September 2022

प्राचीन महाराष्ट्रातील राजे भाग १२ क्षत्रपराजा रुद्रदामन

 

प्राचीन महाराष्ट्रातील राजे

भाग १२

 


क्षत्रपराजा
रुद्रदामन

 

चष्टन हा कार्दमक घराण्यातील भुमक आणि नहपान यांचा समकालीन क्षत्रप होता. कुशाण सम्राट कनिष्काने कच्छ परिसराचा ताबा घेऊन त्यावर चष्टन याला क्षत्रप म्हणून पाठविले. चष्टनचा पिता सौमितिक याला कोणतीही पदवी नसल्याने चष्टन हा स्वबळावर क्षत्रप या पदापर्यंत पोहचल्याचे दिसते. आधी फक्त क्षत्रप असणाऱ्या चष्टनाने नंतर मात्र महाक्षत्रप हे संपूर्ण स्वातंत्र्यनिर्देशक बिरूद धारण केलेले दिसते. चष्टनाची चांदीची आणि तांब्याची नाणी सापडलेली असून ती त्याच्या क्षत्रप महाक्षत्रप काळात पडल्याचे दिसते. त्याचा पुत्र असणारा जयदामन हा फक्त क्षत्रप पदापर्यंत पोहचलेला दिसतो, त्याचे मुख्य कारण म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णीचे त्या काळातील असलेले वर्चस्व.

जयदामनानंतर त्याचा पुत्र रुद्रदामन हा क्षत्रप झाला. त्याची राजधानी होती उज्जैन. हा एक मोठा दिग्विजयी क्षत्रप होता. तो शकांचे वर्चस्व वाढवून महक्षत्रप झाला. सुरुवातीच्या काळात सातवाहनांन विरोधात रुद्रदामनाने अनुनयाचे धोरण स्वीकारलेले दिसते. आपली मुलगी त्याने गौतमीपूत्र सातकर्णीचा द्वितीय पुत्र असणाऱ्या पुळूमाविस लग्नात दिली. मात्र गौतमीपुत्राच्या मृत्यू नंतर मात्र त्याने सातवाहननांविरुध्दचा संघर्ष सुरू केला. संपूर्ण आनर्त, सौराष्ट्र, मारवाड, सिंधू, सौविर, अनुप आणि आकरवांती हे भूप्रदेश त्याने जिंकून घेतले. या युद्धात त्याने दक्षिणापथपती असणाऱ्या पुळूमाविचा सलग दोनदा पराभव केला. सोबतच त्याने यौधेयांना पराभूत केल्याचे आंध्रावर विजय मिळवल्याचे त्याच्या गिरनार शिलालेखावरून समजते. त्याचे राज्य अपरान्त, नाशिक - सोपाऱ्यापासून उत्तरेकडे मुलतान पर्यंत पसरलेले होते.

 

रुद्रदामन हा दानशूर, विद्याव्यासंगी कलाभिज्ञ राजा होता. तो वैदिकधर्मअनूयायी संस्कृत भाषा आणि साहित्य यांचा आश्रयदाता होता. शुंग राजांनंतर याचेच लेख हे संस्कृत भाषेत सापडतात. त्या काळात संस्कृत अलंकार, न्याय आदी शास्त्रांचा बराच विकास झाल्याचे दिसते. रुद्रदामनाने कलाकारांना विद्वानांना मोठ्या प्रमाणात आश्रय दिला होता. त्याची कारकीर्दही मोठी असल्याने सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती झाली. त्याचा नाण्यांवरून तो ६० वर्षापर्यंत म्हणजे .. १६५ पर्यंत राज्य करीत असल्याचे दिसते.

रुद्रदामनानंतर उजैनीच्या शकांची शक्ती क्षीण होत गेली. जसे क्षत्रप सातवाहनांच्या नाशास कारणीभूत झाले तसेच सौराष्ट्राचे अभिर हे या शकांच्या नाशाचे कारण झाले. अभिर राजा ईश्वदत्त याने शकांना मोठा धक्का दिला, मात्र त्यातून सावरून शकांची सत्ता .. ३८० पर्यंत अवंतीच्या मर्यादित प्रदेशावर असल्याचे दिसते. मात्र नंतर गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा याने मध्य पश्चिम भारतावर विजय मिळवला आणि त्याच्या सामर्थ्यापूढे उजैनीच्या शकांचा निभाव लागला नाही.

 

 

- प्राजक्ता देगांवकर

 

 

संदर्भ

) सातवाहनकालीन महाराष्ट्र - डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

) प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती - डॉ. गो. बं. देगलूरकर

) मुसलमानपूर्व महाराष्ट्र महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास - वा. कृ. भावे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...