मराठाशाहीतील कुरघोडीचा एक डाव म्हणजे 'पुरंदर कोळी दंगा'.
पोस्तसांभार ::शुभम सरनाईक
रणशिंग फुंकले :
रावसाहेब
ख्रिस्ताब्द १७६४ मध्ये कर्नाटकात हिंदू राज्यांच्या मानगुटीवर काळसर्प
बनून बसलेल्या हैदरअलीचा बिमोड करायला गेले होते, सोबत अनुभवी कारभारी
म्हणून बापूही होते. यावेळी दादासाहेब नाशकात जाऊन बसले होते. आबा मात्र
स्वस्थळी असून कार्यनिर्वहन करीत होते पण चैत्रात त्यांचे दादासाहेबांच्या
भेटीस नाशकास जाणे झाले.
त्यावेळी
पुरंदरावर निरुद्योगामुळे असंतोषदग्ध जुने राखणदार कुरापती काढत होते.
तेव्हा आबांचे कारभारी राघो गंगाधर अत्र्यांनी जाऊन त्यांची समजूत काढली
आणि कोळ्या, बेरडांचेही समाधान झाल्यासारखे वाटत होते परंतु हे समाधान
अळवावरचे पाणी सिद्ध झाले. ८ दिवसांनी वैशाख शुक्ल पंचमीस ४०० कोळी-बेरड
जमले आणि त्यांनी गडावरील घरं शाकारायला जाण्याचे कारण पुढे करून
पुरंदराच्या बालेकिल्ल्यात निर्विरोध प्रवेश केला. तिथून पुढे त्यांनी
वाघाच्या शिकारीची हुल उठवली आणि तोडफोड करत ते थेट सदरेवर चालून गेले.
अल्पावधीतच सहजगत्या गडावर त्यांनी पुनराधिकार मिळवला.
या
चकमकीत गडाचे हवालदार कुसाजी कामठे, रामचंद्रपंत आणि त्यांचा पुतण्या
इत्यादि १०-१२ असामींना या मंडळींनी कंठस्नान घातले आणि महिपतराव पोतनीस
तथा गडावर उपस्थित राघो गंगाधर अत्र्यांची पत्नी यांना पकडले. यावेळी राघो
गंगाधर अत्रे गडाखाली नारायणाच्या देवालयाजवळ होते. एवढी उलथापालथ
झाल्यावर गडाखालून शंकराजी गणेश उपाख्य बाबा सरनाईक सकुटुंब गडावर गेले
आणि पाठोपाठ २-३ वर्षांपूर्वीपर्यंत धोंडदेव मल्हार उपाख्य अप्पा पुरंदरे
यांचे कारभारी असणारे विसाजी केशव साने यांचेही किल्ल्यावर आगमन झाले.
क्षुल्लक
चिटपाखरूही आत जाऊ देणार नाही असे कडेकोट निर्बंध गडावरील गमनागमनावर
बसवण्यात आले. आता गडाची सूत्र विसाजी आणि बाबा यांच्या कथनाप्रमाणे हलू
लागली. या मंडळींनी पाचव्या दिवशी बापूंच्या अखत्यारीत असलेला वज्रगडही
बळकावला आणि त्यांच्याही तोंडाला पाने पुसली. १५ दिवसात गडावरील बापूजी आणि
रामाजी सरनाईक यांच्या वाड्यास मोडून तेथील सरनाईक तथा इतरही लोकांचे
सगळे द्रव्य, रुप्याची भांडीकुंडी, वस्त्रादिक वस्तू जप्त केल्या. या
संपत्तीपैकी १२,००० दैनंदिन कार्यास खर्च केले, ६४,००० सदरेस तसेच २५,०००
बाबा सरनाईकांनी घेतले आणि १२,००० ची वाटणी केली गेली. एवढेच नाही तर
भोवतालच्या परिसरातील चांबळी, सासवड भागही लुटून फस्त करण्यात आला, घरांवर
यथेच्छ छापे घालून चीजवस्तू गडावर नेण्यात आल्या ज्यात अगदी नारायणाच्या
देवळातील पेशव्यांच्या अनुष्ठानाची सामुग्री असो की सासवडच्या बळवंतरावांचे
बैल असो, जे जे म्हणून दृग्गोचर होते ते लुटीच्या भक्ष्यस्थानी पडले. असा
हा उद्योग सुरू असेपर्यंत पुरंदरावर १७०० लोक जमले आणि गडावरील
राजयंत्रणेचा पुरता कायापालट झाला.
No comments:
Post a Comment