पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील नांदोशी या गावी बापूजी मुदगल देशपांडे यांच्या घराण्याचा वाडा आहे. नांदोशी हे गाव पुण्यातून सिंहगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील किरकीटवाडी या गावापासून ४ कि.मी अंतरावर आहे. गावात प्रवेश केल्यावर एक चौसपी वाडा नजरेस पडतो. वाडा तसा शिवकालीन आहे पण इ.स.१६३६, १६३७, १६६५, १९४८ असा चार वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नवीन धाटणीचा आहे. दुमजली असलेला हा वाडा. प्रवेश केल्यावर समोर भव्य चौक आहे. समोरच दुमजली वाडा आहे. सध्या वाडा वापरात नाही. वाड्यासमोर पुरातन बारव आहे. पण वापरात नसल्यामुळे कचरा झाला आहे त्यात.
सिंहगड किल्ल्याच्या सभोवतालच्या प्रदेशाला शिवकाळात खेडेबारे म्हणत. ३६ खेड्यांचा हा भाग होता. देशपांडे घराण्यातील एक कर्तबगार पुरुष बापूजी मुदगल हे शहाजीराजांच्या पदरी होते. ते अत्यंत मुत्सद्दी होते आणि अतिशय तोलामोलाचा शिलेदारही होते. इ.स. १६४७ मध्ये कोंढाणा ऊर्फ सिंहगड किल्ल्यावर विजापूरकरांचा सुभेदार म्हणून शिरवळचा ठाणेदार मियाँ रहीम अहमद यास नेमले होते. कोंढाण्यावर हवालदार म्हणून सिद्धी अंबर वहाब हा निजामशाहीपासून शहाजीराजांच्या विश्वासातील अधिकारी होता. इ.स १६४७ च्या उत्तरार्धात विजापूरमध्ये अस्थिर परिस्थिती होती. सर्व मातब्बर सरदार कर्नाटकात मोहिमेवर होते. या संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी घेण्याचे ठरविले व पुणे परगण्याचे हवालदार बापूजी मुद्रल देशपांडे यांना ते शहाजीराजांचे विश्वासाचे सेवक असल्याने कोंढाण्याच्या कामगिरीवर पाठविले. 'शके १५६९ राजेश्री बापुजी पंतांनी किले सिंहगड घेऊन दिल्हे.' बापूजींनी १६३७ ते १६४६ दरम्यान शिवापूर गाव व पेठ वसविली होती. तेथेच त्यांनी श्री. शिवाजीराजे यांच्यासाठी वाडा बांधला होता. तसाच त्यांनी आपल्यासाठीही वाडा बांधला होता. त्यांचे पुत्र नारो बापूजी, बाळाजी बापूजी व चिमणाजी बापूजी हे त्यांच्याबरोबर महाराजांच्या लष्करी सेवेमध्ये निष्ठेने काम करीत राहिले. बापूजी हे स्वराज्याचे पहिले सरहवालदार होते. अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी प्रतापगडच्या संग्रामात नारो बापूजींकडे महाराजांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी सोपविली होती. तो ५००० सेनेचे अधिकारी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ ते१६ जानेवारी पहिली सुरतेची स्वारी केली तेव्हा त्यात नारो बापूजी होते.
सुरतेची लूट घेऊन महाराज लोहगडापर्यंत आले. लोहगडावर तळ असताना त्यांच्या लष्करात नेताजी पालकर, नारो बापूजी, चिमणाजी बापूजी, परसोजी महाडिक, संताजी बोबडे व सखो भिकाजी हे होते. लुटीचा माल घेऊन लष्करासह राजगडाकडे निघाले असता वाटेत वडगाव ता. मावळ या ठिकाणी येताच एका वडाखाली मुघल सरदार मुकुंदसिंग राजपूत याने त्यांना गाठले. मुकुंदसिंगाला बापूजींनी अडवून ठेवले. चिमणाजी, परसोजी, संताजी, नेताजी हे लूट घेऊन राजगडावर सुखरूप पोहोचले. मुकुंदसिंगाशी मागे नारोपंत लढत होते. तेथेच त्यांना जिव्हारी बाण लागून ते धारातीर्थी पडले.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment