पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे भाग – ३
पोस्तसांभार ::
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट
मल्हारराव होळकर यांचे पुत्र असलेले तुकोजीराव प्रथम यांचाही जन्म खंडेराव होळकर ज्या वर्षी जन्मले म्हणजे इसवी सन १७२३ मध्ये, त्याचवर्षी झाला. मल्हारबाबा पुत्र खंडेरावांच्या अकाली मृत्यूनंतर राजकीय हालचालींबाबत, होळकरशाहीच्या वृद्धीबाबत स्नुषा अहिल्याबाईंशी चर्चा करीत असत. मल्हाररावांच्या निधनानंतर होळकर राजवटीची धुरा त्यांचे नातू आणि अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव महाराज यांच्याकडे आली. मात्र असे आढळून येते की, ते राज्यशकट हाकण्यास तितकेसे सक्षम नव्हते. अखेरीस लवकरच ते अवघ्या ८ महिन्यांच्या कारभारानंतर ५ एप्रिल १७६७ ला मृत्यू पावले. यानंतर अहिल्याबाईंनी होळकरशाहीची सूत्रे हाती घेतली. त्यांना त्या वेळी जोरदार अंतर्गत विरोधही झाला. परंतु पंतप्रधान पेशवे थोरले माधवराव यांच्या त्यांच्यावरील असलेल्या विश्वासामुळे अहिल्याबाईंच्या विरोधकांना अखेर नमते घ्यावे लागले. या वेळी सर्वसाधारणपणे असे धोरण ठरले की राज्यकारभार आणि महसूल विनियोग हा अहिल्याबाई करतील आणि होळकरांच्या संपूर्ण सैन्याचे नेतृत्व तुकोजीराव पहिले हे करतील. तुकोजीरावांनी पुण्याला माधवराव पेशव्यांची भेट घेऊन त्यांना सुमारे साडेसोळा लक्ष रुपयांचा महसूल / नजराणा दिला आणि सुभेदारीची वस्त्रे तसेच होळकरशाहीचे अधिकृत नेतृत्व म्हणून ही मान्यता मिळवली. इकडे अहिल्याबाईंनी आपली राजधानी ‘महेश्वर’ येथे केली आणि त्या तिथून त्यांच्या मृत्यूपर्यंत संपूर्ण राज्याचा कारभार बघत होत्या. त्यांनीच होळकरशाहीच्या सर्व सैन्याचे अधिपती अर्थात लेाारपवशी ळप लहळशष म्हणून निवडलेले तुकोजीराव पहिले हे त्यासमयी इंदोर येथून सारी सूत्रे हलवीत असत. याप्रकारे होळकरशाहीच्या कारभाराचा हा दुहेरी वाटणी केलेला प्रयोग अहिल्याबाई असेपर्यंत तब्बल २९ वर्षे सुव्यवस्थितपणे सुरू होता, हे विशेष.
तुकोजीरावांनी या कालावधीत होळकरशाहीच्या सैन्याचे अतिशय सक्षमपणे आणि तडफदारपणे नेतृत्व केले होते. राघोबादादांच्या फौजा इंदोरवर चालून आल्या तेव्हा अहिल्याबाईंनी लगोलग आजूबाजूच्या राज्यकर्त्यांना मदतीसाठी बोलावले होते तसेच त्या वेळी उदयपूर येथे असलेल्या तुकोजीरावांना पण सांगावा धाडला होता. जलदीने हालचाल करून ते आपल्या सैन्यासह क्षिप्रा नदीच्या काठी तळ ठोकून बसले. राघोबादादांना आतापर्यंत सहकार्य करणारे महादजी शिंदे आणि जानोजी भोसले हे अहिल्याबाईंनी माधवराव पेशव्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराने आणि माधवरावांनी अहिल्याबाईंना दिलेल्या पाठिंब्यामुळे चलबिचल होऊन माघारीची हालचाल करू लागले होते. ते ससैन्य क्षिप्रेच्या काठी आले असता दुसर्या बाजूला असलेल्या तुकोजीरावांनी त्यांना खडसावले की, आपण नदी पार करून होळकरशाहीत प्रवेश करू पाहाल तर आमच्या सामर्थ्यवान सैन्याशी तुमची गाठ आहे. अर्थात शिंदे, भोसल्यांच्या संयुक्त फौजा आणि अखेर राघोबादादांच्या फौजा यांनी काळवेळ ओळखून यशस्वी माघार घेतली, हे सांगणे नकोच. तुकोजीरावांनी इ.स. १७६९ मध्ये गोवर्धन येथे तसेच पुनःश्च १७७३ मध्ये भरतपूर येथे जाटांच्या सैन्याला जोरदार मात दिली. या विजयामुळे अर्थातच त्यांना भरपूर साधन-संपत्ती मिळाली, जी त्यांनी मराठेशाहीच्या चारही प्रतिनिधींत वाटली. तुकोजीरावांनी सुरुवातीला काही काळ राघोबादादांचा पक्ष घेतला होता परंतु नंतर बारभाईंच्या घडामोडींमुळे राघोबादादांना पेशवेपदावरून हटवण्याच्या मोहिमेअंतर्गत तुकोजीरावांनी मराठा सैन्यासह माही नदीच्या काठी राघोबादादांचा पराभवही केला. माधवरावांच्या निधनानंतर सुरू झालेली पेशवेपदाची अंतर्गत लढाई ही पुरंदरच्या तहापर्यंत दहा एक वर्षे सुरूच होती. या दीर्घ कालावधीत आपल्या सैन्याच्या कराव्या लागलेल्या हालचालींमुळे तुकोजीरावांना आर्थिक झळदेखील मोठ्या प्रमाणात सोसावी लागली.
इ.स. १७७७ मध्ये तुकोजीरावांनी सहा हजारांच्या सैन्यासह ब्रिटिशांचा
बोरघाटात पराभव केला. या कारणाने पेशव्यांनी त्यांना ५ लाखांचा नवा सरंजाम
तसेच बुंदेलखंड आणि खानदेशची सुभेदारी दिली.
असे अनेक जय-पराजय स्वीकारत असताना महादजी शिंद्यांचा सरदार गोपाळरावांनी
अनपेक्षितपणे तुकोजीरावांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचे मोठे नुकसान
केले. या वेळी महादजी शिंदे देवदर्शनासाठी दक्षिणेकडे रवाना झालेले होते.
हे वृत्त कळताच अहिल्याबाईंनी तातडीने मदत म्हणून ५ लक्ष रुपये
तुकोजीरावांकडे पाठवले होते. यानंतरच्या लेखारी या ठिकाणी ही शिंदे आणि
होळकरांच्या सैन्यात झडप झाली. यानंतर तुकोजीराव मोठ्या आर्थिक नुकसानीसह
इंदोरला स्वगृही परतले. त्यांचे पुत्र काशिराव यांच्या सांगण्यावरून
अहिल्याबाईंनी पुन्हा तुकोजीरावांकरिता ५ लक्ष रुपयांची तरतूद केली. यानंतर
अहिल्याबाई १३ ऑगस्ट, १७९५ रोजी मृत्यू पावल्या. अहिल्याबाईंच्या
मृत्यूसमयी तुकोजीराव आणि पुत्र काशिराव हे पुणे दरबारी रुजू होते. आता
पंतप्रधान पेशव्यांच्या पाठिंब्याने तुकोजीराव हे संपूर्ण होळकरशाहीचे
अधिपती झाले. तुकोजीरावांनी तातडीने पुत्र काशिरावांना महेश्वर ला पाठवले
आणि प्रशासकीय बाबी सांभाळण्याची तसेच खजिन्याची मोजदाद करण्याची आज्ञा
केली. या अत्यंत थोडया कालावधीत म्हणजे जेमतेम दीडएक वर्ष तुकोजीराव पहिले
हे इंदोरचे अधिपती राहिले आणि लवकरच म्हणजे १५ ऑगस्ट, १७९७ ला त्यांचे पुणे
येथे निधन झाले. त्यांच्या अतिशय अल्पस्वल्प राजवटीत महेश्वर आणि
मल्हारनगर येथे चांदीची नाणी पाडली गेलेली आढळतात. या नाण्यांवर शिवलिंग,
बिल्वपत्र तसेच सूर्य / मार्तंड छापलेले आढळते. तुकोजीरावांनी सोन्याची
अथवा तांब्याची नाणी पाडल्याचे अजून तरी आढळून आलेले नाही. महेश्वर मिंटचा
हिजरी सन १२११ आणि मल्हारनगर मिंटचे हिजरी सन १२१० आणि १२११ या वर्षांचा
उल्लेख असलेले रुपये आढळून येतात.
No comments:
Post a Comment