विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्यातील मराठा संस्थानिक घराणे पटवर्धन

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्यातील मराठा संस्थानिक घराणे पटवर्धन

 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक घराण्यांनी हिंदवी स्वराज्य विस्ताराचा वसा स्वीकारला. शाहू छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे यांच्यासमवेत अनेक घराण्यांनी या कार्यात झोकून देऊन मराठेशाहीचा दबदबा हिंदुस्थानच नव्हे तर थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचवला होता. समर्थ रामदास स्वामींचे बोल – ‘मराठा तितुका मेळवावा, अवघा महाराष्ट्रधर्म वाढवावा’ सार्थ करण्यात मिरज, सांगली, जमखिंडी, कुरुंदवाड, तासगाव येथील हे पटवर्धन घराणे देखील सहभागी होते.)

पेशवाई कालखंडात जी अनेक कर्तबगार घराणी हिंदवी स्वराज्याच्या पटलावर उदयास आली त्यातील एक म्हणजे हे पटवर्धन घराणे होय. यांचे मूळ रत्नागिरी येथील कोतवड गावचे. या घराण्याचे मूळ पुरुष मानले जातात त्या हरिभट पटवर्धन यांच्या सात अपत्यांपैकी त्रिंबक, गोविंद आणि रामचंद्र हे प्रसिद्धीस आले. कारणपरत्वे हरिभट बहिरेवाडी येथे आले असताना तेथे त्यांचा इचलकरंजीकर घराण्याचे संस्थापक नारो महादेव जोशी (घोरपडे) यांच्याशी कुलोपाध्यायांच्या नात्याने संबंध आला. इचलकरंजीकर आणि पेशवे पंतप्रधान यांच्यात नातेसंबंध असल्याने यांचा पुढे बाळाजी विश्वनाथांशी संपर्क झाला. गोविंदराव पटवर्धन यांना पेशव्यांनी पुढे त्यांच्या निष्ठा पाहून महत्त्वाची पदे दिली. भाऊ रामचंद्रराव यांनी देखील वसईच्या सुप्रसिद्ध रणसंग्रामात मराठ्यांच्या वतीने पराक्रम गाजवला होता. आता गोविंदरावांच्या पराक्रमावर आणि स्वामीनिष्ठेवर पेशव्यांचा विश्वास बसला असल्यामुळे बाळाजी बाजीरावांनी गोविंदराव यांना पाच हजार सैन्याच्या पथकाचे


अधिपती केले आणि त्यांच्यावर जबाबदार्‍या सोपवल्या. आता त्यांचे दोन भाऊ त्रिंबक आणि भास्कर हे ही पेशव्यांकडे रुजू झाले तसेच पटवर्धनांचा बराचसा आप्तपरिवार ही स्वराज्याच्या कार्यात, चाकरीत दाखल झाला. पटवर्धन कुटुंबातील अनेक पुरुषांनी सावनूरचे नबाब, हैदर अली, टिपू सुलतान यांच्याशी लढताना युद्धात शौर्य गाजवले असल्याकारणाने पेशव्यांनी गोविंदरावांस इ.स. 1755 मध्ये नगार्‍याचा मान दिला होता. मात्र सदाशिवरावभाऊ आणि पटवर्धन यांचे फारसे सख्य नव्हते असे इतिहास सांगतो. तसेच पटवर्धन घराण्यातील अनेक कर्तबगार पुरुषांनी मराठेशाहीच्या, हिंदवी स्वराज्यविस्ताराच्या या लढ्यात प्राणार्पण करूनही आपले योगदान दिलेले आहे असेही इतिहासात नमूद आहे. मात्र पानिपतच्या रणसंग्रामात पटवर्धनांपैकी विशेषत्वाने कोणीही उपस्थित नव्हते कारण खुद्द गोविंदराव हे दक्षिणेत गुंतलेले होते. पुढे रघुनाथराव उर्फ राघोबादादा आणि थोरले माधवराव यांच्यातील अंतर्गत संघर्षात पटवर्धन हे माधवरावांच्या बाजूने असल्यामुळे राघोबादादांनी थेट त्यांच्या मुख्य जहागिरीवर म्हणजे मिरजेवरच हल्ला केला. याकारणाने गोविंदराव यांचे सुपुत्र गोपाळराव पटवर्धन हे तात्पुरते निजामास जाऊन मिळाले होते. मात्र माधवराव पेशव्यांनी त्यांना पुन्हा आपल्याकडे आणवले व राक्षसभुवन येथील लढाईत निजामाचा पराभव ही केला. माधवरावांनी त्यांना 8000 तैनाती घोडदळ, 25 लाखांचा सरंजाम तसेच कृष्णा व तुंगभद्रा यामधला प्रांत इनाम दिला. गोविंदरावांचे सुपुत्र गोपाळराव आणि रामचंद्ररावांचे सुपुत्र परशुरामभाऊ हे दोघेही आपापल्या वडिलांंसारखेच पराक्रमी आणि कर्तबगार होते.

पटवर्धनांना पंतप्रधान पेशव्यांकडून मोठा सरंजाम मिळाल्याने त्यांचे राजकीय महत्व वाढले होते. हैदरअली आणि टिपू यांच्याशी झुंज देऊन कर्नाटक त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवला होता. मात्र अनपेक्षितपणे 1771 मध्ये गोपाळराव हे हैदरअली विरुद्धच्या लढ्यात मृत्यूमुखी पडले व काही काळाने गोविंदराव हे देखील निधन पावले.

पेशवे नारायणराव यांच्या खुनानंतर पटवर्धनांनी सवाई माधवराव पेशवे यांचा पक्ष घेतला होता. गुजरातवरील स्वारीत सेनानी हरिपंत फडके यांच्यासमवेत गोविंदराव यांचा दुसरा पुत्र वामनराव हा देखील 1775 मध्ये मरण पावला. पुढे इ.स. 1777 मध्ये हैदर शी लढताना तिसरा मुलगा लढाईत जखमी झाला तर कुरुंदवाड संस्थानचे कोन्हेरराव पटवर्धन हे मृत्यू पावले तसेच पांडुरंगराव, श्रीपतराव आणि वासुदेवराव पटवर्धन यांना कैद ही झाली. मराठेशाहीच्या विस्ताराकरीता चाललेल्या युद्धप्रसंगात 1740 ते 1800 या साठ वर्षांंच्या काळात पटवर्धनांच्या घराण्यातील तब्बल तीस कर्ते पुरुष कामी आले अशी स्पष्ट नोंद आहे. मराठा साम्राज्यासाठी लढत असताना दस्तुरखुद्द दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी मात्र पटवर्धनांवर खप्पा मर्जी राखली होती हे आश्चर्यकारक आहे. दुसर्‍या बाजीरावानी तर परशुरामभाऊंनाही अटकेत टाकले होते असे इतिहास सांगतो.

पांडुरंगरावांचा मुलगा चिंतामणराव यांना 1783 मध्ये सरंजाम दिला गेला. 1795च्या खर्ड्याच्या लढाईत परशुरामभाऊ, चिंतामणराव आदींनी समशेर गाजवली होती. पटवर्धन घराण्याने इंग्रजांविरुद्धच्या खडकी, कोरेगाव, आष्टी च्या लढायांत ही कोणतीही कसूर ठेवता पराक्रमाची शर्थ केली होती. पुढे अंतर्गत कौटुंबिक कलहामुळे जहागिरीचं विभाजन तसेच नवनिर्माण होऊ लागले. कुरुंदवाड थोरली आणि धाकली पाती (डशपळेी रपव र्क्षीपळेी लीरपलह), मिरज थोरली आणि धाकली पाती, सांगली, तासगाव, जमखिंडी अशा पटवर्धन संस्थानिकांच्या जहागिरी होत्या. सालबाईच्या मराठा इंग्रज तहानंतर पटवर्धनांनी टिपूविरुद्धच्या लढायांत इंग्रजांना दमदार मदत केली होती. याचमुळे इंग्रज त्यांना आपले जवळचे स्नेही मानत असत. 1818 मधील पेशवाईच्या अस्तानंतर पटवर्धनांची संस्थाने देखील नाईलाजास्तव ब्रिटिशांची मांडलिक झाली होती.

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ म. गो. रानडे यांच्या पुष्टीनुसार मिरज, सांगली येथे पटवर्धनांनी आपली नाणी पाडली होती. त्यांच्या रुपयांवर देवनागरीत ‘ग’ हे अक्षरे छापलेले होते, जे पटवर्धन घराण्याचे आराध्यदैवत गणपतीच्या नावाने सुरू होणारे आहे. अभ्यासक क्लून्स् पटवर्धनांच्या या रुपयांना ‘मिरजी हुकेरी’ रुपये संबोधतो. सांगली येथे तसेच जमखिंडी येथेही पटवर्धन संस्थानिकांनी आपली नाणी पाडली होती. मिरजच्या रुपयावर देवनागरीतील ‘ग’ हे अक्षर येतं तसंच त्या ‘ग’ अक्षराखाली चार टिंबांची वेगवेगळी नक्षी पण येते. याव्यतिरिक्त मिरजेचे ‘ग’ या अक्षराशिवायचे रुपये पण छापलेले आढळतात. मिरजेच्या रुपयावर 7 पाकळ्यांचे बिंदूमय वर्तुळाकार फुल/नक्षी ही दिसून येते. यातील बिंदूंच्या आकारात असलेला लहान-मोठेपणा ही दिसून येतो. मात्र संग्राहकांसाठी बहुमोल असा, एका बाजूस पर्शियन लिखावटीसह देवनागरीत ‘श्री गणपती’ आणि दुसर्‍या बाजूला देखील ’श्री पंतप्रधान’ असे देवनागरीत छापलेला नजराणा रुपया देखील आहे. अत्यंत देखणा, सुबक अन् बघताक्षणीच मनात ठसणारा असा हा गणपती पंतप्रधान रुपया आहे यात शंका नाही. यामध्ये अर्धा तसेच पाव रुपया ही पाडलेला आढळून येतो. पटवर्धन घराण्यातील कर्तबगार अशा गोपाळराव यांनी ‘श्री गोपाळराव पुनःप्रतापी’ असा देवनागरीत मजकूर असलेला तांब्याचा पैसादेखील पाडला आहे. हा बराचसा र्लीीवश पद्धतीचा आहे. हे नाणे रहिमतपूर या ठिकाणी/टांकसाळीत पाडले होते. याव्यतिरिक्त पटवर्धनांच्या टांकसाळीत पाडला गेलेला ‘अर्काट’ रुपयाच्या धर्तीवर (िीर्शीवे -ीलेीं ाळपीं) असलेला आणि अतिशय रेखीव असे ‘त्रिशूळ’ चिन्ह छापलेला रुपया पण आहे, मात्र नाणकशास्त्रातील तज्ञांमध्ये या त्रिशूळी रुपयाबाबत अजूनही एकवाक्यता आढळून येत नाहीये असे नक्कीच म्हणता येईल. या त्रिशूळी रुपयास दक्षिणी मराठा रुपया (ऊशललरप चरीरींहर र्ठीशिश) असे ही ओळखले जाते. नाणकतज्ञ प्रिन्सेप आणि क्लून्स् यांच्या म्हणण्यानुसार सांगली आणि मिरज या रुपयात फारच थोडा तपशीलातील फरक आढळतो. जमखिंडीचा रुपया हा देखील सहसा पटकन आढळून येत नाही. पाच संस्थानांचे अधिपती असणार्‍या या पटवर्धन घराण्याचे नाव मराठेशाहीच्या नाणी पाडणार्‍या संस्थानिकांसोबत आदराने नक्कीच घेतले जाईल.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...