पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ
बडोदा येथील गायकवाड घराणे-3
आनंदराव, सयाजीराव गायकवाड दुसरे
– प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर
औरंगजेबाच्या नंतर मुघल तख्तावर आलेले तत्कालीन दिल्लीपती बादशाह हे खरोखरच दुबळे होते. मराठेशाहीच्या धुरंधरांनी नर्मदेपार घोडी फेकून मुघल सत्तेला वारंवार हादरे दिले होते. शाहू छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे आणि शिंदे-होळकर-पवार-गायकवाड आदींसह अनेक घराणी शिवछत्रपतींचा भगवा थेट अटकेपर्यंत फडकवून आली होती आणि यांनीच अफगाण आक्रमक अहमदशाह अब्दालीला पानिपतावर देशरक्षणासाठी सव्वालाख प्राणांचे मोल अर्पून जबरदस्त दणकाही दिला होता.
1817-1818 नंतर दुसर्या बाजीराव पेशव्यांना इंग्रजांसोबत मात खाऊन अखेर
पराभव मान्य करावा लागला होता. शिवछत्रपतींच्या राजधानीचा गड,
दुर्गदुर्गोत्तम रायगडदेखील 10 मे, 1818 रोजी इंग्रज सेनानी कर्नल प्रॉथर
यास शरण गेला आणि रायगडावर असलेल्या पेशव्यांच्या सौभाग्यवती
वाराणसीबाईसाहेब तसेच अखेरचा किल्लेदार अबू शेख यांनी नाइलाजास्तव गड
इंग्रजांच्या ताब्यात दिला. शिवछत्रपतींच्या या तख्ताच्या गडावर अखेर
ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला. याच सुमारास ब्रिटिशांच्या देशव्यापी
सत्तेची लालसा एक एक करून सर्व संस्थानं गिळंकृत करीत होती.
बडोद्याच्या गायकवाड
राजांनीही 1817 – 1818 मध्ये इंग्रजांशी संरक्षणासाठी तैनाती फौजेचा तह
केल्याने एका अर्थाने त्यांचेही सार्वभौमत्व पणाला लागले होतेच. अंतर्गत
कारभारात इंग्रजांचा हस्तक्षेप वाढत होता. गोविंदराव महाराजांच्या इसवी सन
1800 मधील मृत्यूनंतर त्यांचा राज्यकारभार करण्यास तितकासा सक्षम नसणारा
पुत्र आनंदराव गादीवर आला होता. इंग्रजांच्या मदतीने त्यांचा तशाही
परिस्थितीत कारभार चालला होता. इकडे दुसर्या बाजीरावाने अहमदाबादचा मक्ता
गायकवाडांना 1800 मध्ये दिला होता. काहीशा कमकुवत असलेल्या आनंदराव यांनी
बंडखोर अरब तसेच कान्होजी तथा मल्हारराव या भाऊबंदांचा पुंडावा मोडण्यासाठी
70,000 रुपये महसुलाचा प्रदेश तसेच सौराष्ट्रातील खंडणी वसूल करण्याचे
आपले हक्कही इंग्रजांना एका तहकराराद्वारे दिले. साहजिकच बडोदा संस्थान आता
जवळपास ब्रिटिशांचे अंकित झाल्यागत झाले होते. याचवेळी सन 1815 मध्ये
पेशवे पंतप्रधान आणि गायकवाड सरकार यांच्यातील बेबनाव मिटवण्यासाठी गेलेले
बडोद्याचे मुत्सद्दी गंगाधरशास्त्री यांचा पंढरपूर येथे खून झाला.
आनंदरावांची महाराणी तख्त बाई, महाराणी उमेदबाई आणि महाराणी दर्याबाई
यांच्याशी लग्नं झाली होती. त्यांना बळवंतराव, पिलाजीराव, गोपाळराव आणि
लक्ष्मणराव अशी पुत्रसंपदा होती. एकूणच आढावा घेता आनंदराव महाराजांच्या
कारकिर्दीत विशेषत्वाने काही घडामोडी घडल्याचे दिसून येत नाही.
आनंदराव हे 2 ऑक्टोबर, 1819 मध्ये निधन पावले. आपल्या कारकिर्दीत
आनंदरावांनी तांब्याची तसेच चांदीची नाणी पाडलेली आढळून येतात. तांब्याच्या
नाण्यांवर देवनागरीत त्यांची ‘आ’ आणि ‘गा’ ही आद्याक्षरे तसेच उभी व आडवी
तलवार/ Vertical Horizontal
Sword आपल्याला बघता येते. यातील ‘आ’ शब्दात तीन उभ्या रेघा असतात. अर्धा
पैसा, एक पैसा व दोन पैसे या वजन आधारित मूल्याची ही नाणी आहेत. तसेच
त्यांनी एक सहा टोकदार पाकळ्यांचे फुल असलेला अर्धा पैसा आणि एक पैसादेखील
पाडला होता. त्यांचे चांदीचे रुपयेदेखील साधारणतः याच धर्तीवर पाडलेले
आहेत. मात्र रुपयांचे वैशिष्ट्य म्हणजे यावर छापलेल्या एकाच ‘आ’ला
पोपटासारखी चोच दिसून येते, तर दुसर्या ‘आ’ अक्षरात खाली वळलेल्या तीन
रेघा आढळतात (known as early variety), आणि तिसर्या प्रकारच्या ‘आ’
अक्षरातील ‘आ’ची गाठ वळलेली असते. असे हे एकाच राज्यकर्त्याच्या नावाच्या
आद्याक्षराच्या रुपयाचे तीन विविध प्रकार.
आनंदरावांच्या मृत्यूनंतर बंधू सयाजीराव दुसरे हे बडोद्याच्या गादीवर आले.
सयाजीराव महाराज दुसरे यांचा जन्म इसवी सन 1800 मध्ये झाला होता. त्यांना
सहा पुत्र होते, असे इतिहासात नमूद आहे. गणपतराव, गयाजीराव, खंडेराव,
आनंदराव, मल्हारराव आणि यशवंतराव अशी त्यांची नावे. सयाजीराव दुसरे हे बंधू
आनंदराव यांच्यानंतर 1819 पासून बडोद्याचा राज्यकारभार पाहू लागले.
सयाजीराव महाराजांनी ब्रिटिशांचे अंकित असूनही सुमारे अठ्ठावीस वर्षे
बडोद्याचा कारभार बराचसा सुनियोजित पद्धतीने केला. आनंदरावांच्या काळात
बडोद्यात निर्माण केले गेलेले ब्रिटिश रेसिडेंटचे ऑफिस सयाजीरावांच्या
काळात इसवी सन 1830 मध्ये रद्द करण्यात येऊन तेथे गुजरातच्या
आयुक्तांची/Commissioner नेमणूक करण्यात आली. सयाजीरावांनी आपल्या
कर्तबगारीने आणि हुशारीने इंग्रजी अधिकार्यांच्या लाचलुचपतीस,
गैरव्यवहारास आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न केला. ब्रिटिशांच्या पकडीतून
बडोदा संस्थान मुक्त करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. प्रसंगी इंग्रजांसोबत
वितुष्ट ओढवून घेऊन, त्यांचा रोष पत्करून आपला भूभाग स्वतंत्र करण्याचा
स्वाभिमानी प्रयत्नही त्यांनी धडाडीने करून बघितला. पूर्वी सयाजीराव प्रथम
यांनी बंधू फत्तेसिंहराव यांच्या सूचनेनुसार ‘घडियाली पोल’ (घड्याळाचा
स्तंभ?) येथे टांकसाळ/Mint उभारली होती. या टांकसाळेच्या वास्तूत एक मोठी
चिमणी / धुरांडे, धातू वितळवण्यासाठी भट्ट्या, तप्त धातू एकदम थंड करून
कठीण करण्यासाठी (Hardening
process) पाण्याचे कुंड होते. महाराजा फत्तेसिंहराव यांना लोक आदराने
‘बाबासाहेब ‘ या नावाने ओळखत असल्याने या टांकसाळीत पाडलेल्या नाण्यांना
बाबाशाही नाणी, असेही संबोधले जाते. पुढे कालांतराने 1911 मध्ये या
टांकसाळीच्या इमारतीचे ‘श्री सयाजीराव हायस्कूल’ या वास्तूत रूपांतर
करण्यात आले.
गायकवाड यांच्या बडोदा, अमरेली, अहमदाबाद, संखेडा, जंबुसार आणि पेटलाद या
ठिकाणी टाकसाळ होत्या. हल्लीच बडोदा संस्थानिकांची म्हणून ‘कडी’ नामक
टांकसाळ उजेडात येऊ पाहाते आहे. नाणीक्षेत्रातील अनेक अभ्यासक आणि तज्ज्ञ
याबाबतीत सर्व शक्यता अभ्यासपूर्वक, चर्चा करून पडताळून बघत आहेत. सयाजीराव
दुसरे यांचीदेखील विविध प्रकारची तांब्याची तसेच चांदीची नाणी संपदा आहे.
यातील तांब्याच्या नाण्यांवर सार्वभौमत्वाचे, सामर्थ्याचे प्रतीक असणारा गज
/ हत्ती ‘स, गा’ या आद्याक्षरांसह जमिनीत रोवलेला ध्वज तसेच फडकणारा
जरीपटका, विविध प्रकारच्या उभ्या तसेच आडव्या तलवार / समशेर, कट्यार,
उमलणारी कळी, वेगवेगळ्या मुद्रा असलेले सूर्यचिन्ह, जरीपटका, श्री सा गा ही
आद्याक्षरे, झाडाची फांदी tree leaf, तोफगोळा /cannon ball image न
उमललेली कळी, काही भौमितिक पद्धतीची चिन्हे छापलेली आढळतात. यात पाव पैसा,
अर्धा पैसा, एक पैसा आदी मूल्यांची नाणी आहेत. सयाजीरावांच्या चांदीच्या
नाण्यांवर मात्र मुख्यत्वेकरून दोन रेघा असलेल्या ‘सा’ या आद्याक्षरासह
‘गा’ हे आद्याक्षर आणि डावीकडे तसेच उजवीकडे वळलेली समशेर बघावयास मिळते.
चांदीच्या नाण्यांत एकअष्टमांश रुपया (1/8 rupee), एकचतुर्थांश रुपया (1/4
rupee), अर्धा रुपया (1/2 rupee) आणि रुपया (rupee) या मूल्यांची नाणी
छापलेली आहेत. सयाजीराव महाराज दुसरे यांच्या तांब्याच्या नाण्यांएवढी
विविधता बडोदा संस्थानच्या अन्य कोणत्याही राज्यकर्त्यांच्या नाण्यांवर
दिसून येत नाही. अशा या सयाजीराव महाराज दुसरे यांचा मृत्यू 28 डिसेंबर,
1847 या दिवशी झाला.
No comments:
Post a Comment