ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे – भाग 9
रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’ घाट
ब्रिटिशांच्या अमदानीत एक एक करून मराठेशाहीतील तसेच अन्य संस्थाने खालसा होत चालली होती. शिवछत्रपतींनी पेटवलेली स्वातंत्र्याची ज्योत आता राजेशाहीतून लोकशाहीच्या स्वातंत्र्याकडे वळू पाहात होती. ब्रिटिश सत्तेविरोधात देशभरातील, प्रत्येक प्रांतातील स्वातंत्र्यसैनिकांचा प्रखर विरोध वाढतच होता. अशा परिस्थितीत ग्वाल्हेर संस्थानचे शेवटचे स्वतंत्र अधिपती जिवाजीराव शिंदे राजगादीवर बसले ते हिंदुस्थान स्वंतत्र होईपर्यंत ग्वाल्हेरचे अखेरचे अभिषिक्त महाराज या नात्यानेच.
वडील माधवराव शिंदे महाराज यांचे विदेश दौर्यावर असताना अल्पशा आजाराने अनपेक्षित निधन झाले. त्यामुळे आता इकडे त्यांच्या अल्पवयीन वारसाला म्हणजे जिवाजीराव शिंदे यांचा राजाभिषेक करण्यात आला. जिवाजीराव शिंदे हे तेव्हा अवघे नऊ वर्षांचे होते. ग्वाल्हेर संस्थानचे अखेरचे महाराजा असलेले जिवाजीराव यांचा जन्म 26 जून 1916 मध्ये झाला. त्यांनी वडील माधवराव शिंदे थोरले यांच्या परिस शहरात झालेल्या अनपेक्षित निधनानंतर 5 जून 1925 मध्ये ग्वाल्हेर संस्थानचा राज्यभार स्वीकारला आणि हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत व नंतर ही काही काळ म्हणजे 28 मे 1948 पर्यंत ते राज्यपदावर होते. महाराजा जिवाजीराव हे अल्पवयीन असल्यामुळे ग्वाल्हेरचा कारभार चालवण्यासाठी ब्रिटिशांच्या संमतीने ‘कौन्सिल ऑफ रिजन्सी’ची स्थापना करून कालांतराने 2 नोव्हेंबर 1936 ला महाराजा जिवाजीराव शिंदे यांना संपूर्ण अधिकार दिले गेले. ग्वाल्हेर संस्थानचा दबदबा तसाही संपूर्ण हिंदुस्थानात मानला जात होता. वडील माधवरावांप्रमाणेच जिवाजीरावदेखील लवकरच कुशल प्रशासक म्हणून नावाजले जाऊ लागले होते. अशातच महाराजांना त्रिपुरा संस्थानच्या राजकुमारी कमलप्रभा यांचे स्थळ सांगून आले. शिंदे राजघराणे तसेच खुद्द महाराजांनाही हे संमत असल्याने गोष्ट पक्की झाली. मात्र असे सांगितले जाते की, दरबारातील अनेक मान्यवर मराठा सरदारांना हे पसंत नव्हते. अखेर त्यांचा विरोध पत्करावा लागू नये म्हणून जिवाजीरावांनी त्यांचे म्हणणे ऐकले. आता कुटुंबाची आणि दरबारातील मराठा सरदारांची इच्छा होती की, त्यांचे लग्न स्वकुलीन मुलीशीच व्हावे. परंतु नियतीच्या अन् महाराजांच्याही मनात वेगळेच होते. जिवाजीरावांचे निकटवर्तीय असलेल्या राजपूत महाराजा चंदनसिंह यांची पुतणी लेखा दिव्येश्वरी हिच्याबाबत ते बरेचदा जिवाजीरावांशी चर्चा करीत असत. अखेरीस त्यांनी या उभयतांची भेट प्रसंगोत्पात मुंबईच्या सुप्रसिद्ध ताजमहाल हॉटेलमध्ये घडवली. लेखा दिव्येश्वरी या मराठी आणि शाही घराण्यातील नसल्या तरी कुटुंबीय आणि मराठा सरदारांची इच्छा डावलून जिवाजीराव महाराज आणि त्यांचे शुभमंगल झाले . परंतु विवाहानंतरही महाराजसाहेबांना अनेकदा नातेवाइकांचा, आप्तस्वकीयांचा विरोध सहन करावा लागला. मात्र लग्नानंतर ’महाराणी विजयाराजे शिंदे’ यांनी आपल्या वागणुकीने हळूहळू सर्वांचे मन जिंकले. त्यांना राजपूत संस्कारातून शिंदेशाहीच्या मराठी संस्कारात आपली छाप पाडायची होती. त्यांनी अतिशय विनम्रपूर्वक आणि धोरणीपणाने वागून महाराजसाहेब जिवाजीराव यांचे मुख्य सल्लागार आणि ग्वाल्हेर संस्थानचे प्रमुख आधारस्तंभ संभाजीराव आंग्रे यांना आपल्याकडे वळवले. त्यांनी पुढील काळात सिद्ध केले की जिवाजीरावांची निवड अचूक होती, सुयोग्य होती.
जिवाजीरावांना एकूण चार अपत्य होती. मुलगा माधवराव (द्वितीय), कन्या उषाराजे, वसुंधराराजे, यशोधराराजे. स्वतंत्र भारतात पुढे विजयाराजेंसह या सर्वांनी विविध राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करून आपापली राजकीय वाटचाल कायम ठेवली. महाराज जिवाजीरावांना आधुनिकीकरणाची आवड असल्यामुळे त्यांनी आपल्या राजमहालात प्रचंड मोठ्या अशा जेवणाच्या मेजावर (Dining Table) चांदीची रेल्वेगाडी बनवून घेतली होती ज्यातून येणार्या शाही पाहुण्यांना आपल्याला हवे ते पदार्थ स्वतःच्या ताटासमोर ती गाडी थांबवून घेता येतील. शिंदेशाहीचा थाटच तसा भारी होता. शिंदेशाहीचे हे अखेरचे अभिषिक्त महाराज जिवाजीराव शिंदे यांनी आपल्या कारकीर्दीत मात्र पूर्वसुरींप्रमाणे एक ही सोन्याचे अथवा चांदीचे नाणे पाडले नाही, हे विशेष. याबाबतीत असे सांगितले जाते की, या वेळी आधीचा नाण्यांचा साठा हा मुबलक होता आणि येथपावेतो ब्रिटिशांनी पाडलेली नाणी ही आता समाजमानसात रुळलीदेखील होती. जिवाजीरावांना ब्रिटिशांनी इसवी सन 1929 मध्ये तांब्याची नाणी पाडण्याची अनुमती दिली. त्या वेळी त्यांनी स्वतःची प्रतिमा/चेहरा असलेला तांब्याचा पाव आणा/1 पैसा मूल्याचे नाणे छापले होते. या नाण्यावर देवनागरीत ’श्री जिवाजीराव शिंदे आलिजाबहादर, ग्वाल्हेर’ असे लिहिलेले आढळते. मागे ग्वाल्हेर संस्थानचे राजचिन्ह / Royal Emblem तसेच नाण्याचे मूल्य पाव आणा’, विक्रम संवत 1986 आणि उर्दूत एक पैसा असेही छापलेले होते. याचे वजन सुमारे 6. 5 ग्राम्स इतके होते. असाच अजून एक कमी वजनाचा, साधारणपणे 4 ग्राम्सचा पावआणा इसवी सन 1942/ विक्रम संवत 1999 , मध्ये पाडला गेला होता. यावर महाराज जिवाजीराव यांच्या चेहरेपट्टीतील बदलाप्रमाणेच ग्वाल्हेर संस्थानचे ब्रिटिश राजचिन्हदेखील अवतरले होते. मात्र या नाण्यावर उर्दूतील लिखावट काढून टाकण्यात आलेली होती. याच वर्षी इसवी सन 1942 मध्ये ‘पितळ’ धातूचे जिवाजीरावांची प्रतिमा असलेले अर्धाआणा म्हणजे दोन पैसे दर्शनी मूल्य असलेले 3.80 ग्राम्स वजनाचे नाणे छापण्यात आले होते. हेच या राणोजीराव शिंदे सरकारद्वारा मध्य भारतात स्थापन झालेल्या विशालकाय ग्वाल्हेर संस्थानचे शेवटचे नाणे होते. यानंतर हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्ता जाऊन 1947 मध्ये देश स्वतंत्र होईपर्यंत कोणतेही नाणे पाडले गेले नाही. नंतर 28 मे 1948 ला हे मराठेशाहीची शान असलेले शिंदेशाहीचे ग्वाल्हेर संस्थान स्वतंत्र भारताचा एक अविभाज्य भाग बनले. सुमारे 200 वर्षांचा इतिहास असलेले हे ग्वाल्हेर संस्थान एका अर्थाने इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये इतिहासजमा झाले, असे म्हणावे लागेल. ग्वाल्हेरचे हे अखेरचे अभिषिक्त अधिपती महाराज जिवाजीराव शिंदे सरकार यांचे दिनांक 16 जुलै 1961 रोजी वयाच्या अवघ्या 45 व्या वर्षी निधन झाले
No comments:
Post a Comment