एक ग्वाल्हेरची महाराणी. हिचा जन्म इ.स.१७८४ मध्ये झाला. हिच्या वडिलांचे नाव सखाराम घाटगे सर्जेराव. ही लहानपणी फार बाळसेदार व देखणी होती व घोडयावर बसण्यांत पटाईत अशी निपजली होती. बायजाबाई शिंदे हीस कित्येक इतिहासकारांनी 'दक्षिणची सौंदर्यलतिका' अशी संज्ञा दिली आहे. राजस्तानांतील कृष्णकुमारी इत्यादि लोकप्रसिध्द लावण्यवतींच्या लग्नाचे प्रसंग ज्याप्रमाणे मोठमोठी राजकारस्थाने घडविण्यास कारणीभूत झाले, त्याप्रमाणे बायजाबाई हिचे लग्न हे देखील महाराष्ट्रांतील एक राजकारस्थान घडवून आणण्यास कारणीभूत झाले.
बाजीरावाने सर्जेरावाचे मन वळवून बायजाबाईचे लग्न दौलतराव शिंद्याशी लावून दिले. हे लग्न पुणे मुक्कामी इ.स. १७९८ च्या मार्च महिन्यांत मोठया थाटाने झाले. लग्न झाल्यानंतर, बायजाबाई नेहमी लष्कराबरोबर असे, व तिचा सर्व राजकारणामध्ये प्रवेश असे.
पुढे दौलतराव १८२७ साली मरण पावला. तेव्हा बायजाबाईने दत्तक न घेता सर्व कारभार आपल्या हातांत घेतला. परंतु तिने संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती, व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यानेंहि व्यक्त केली होती. नागरिकांच्या इच्छेवरून तिने शिंदे घराण्यापैकी पाटलोजी म्हणून जे पुरूष होते त्याचा पुत्र मुकुटराव हा बारा वर्षांचा असता दत्तक घेतला. बायजाबाईची एकंदर राजकीय कारकीर्द इ.स. १८२७ पासून इ.स.१८३३ पर्यंत सरासरी सहा वर्षेच चालली, परंतु तेवढया अवधीमध्ये तिने मोठया दक्षतेने व शहाणपणाने राज्यकारभार चालविला, पुढे राज्यांत जनकोजी शिंदे व बायजाबाई यांचा बेबनाव होऊन राज्यांत थोडे बंडहि झाले. बंडाची परिसमाप्ति होऊन सर्वत्र शांतता झाल्यावर बायजाबाई ग्वाल्हेर मुकामी जयाजीराव शिंदे याच्याजवळ राहिली. ता. २७ जून इ.स. १८६३ रोजी, ही राजकारस्थानी व शहाणी स्त्री कैलासवासी झाली.
विद्वानांनी हिच्याबद्दल जे धन्योद्गार काढिले आहेत, ते तिची खरी योग्यता व्यक्त करतात. तत्कालीन 'मुंबई ग्याझेट' पत्रांत बायजाबाईसंबंधाचे जे मृत्युवृत्त आले त्यांत असे म्हटले होते की, ''बेगम सुमरू, नागपुरची राणी, झांशीची राणी, लाहोरची चंदाराणी आणि भोपाळची बेगम या सुप्रसिध्द स्त्रियांमध्ये ही राजस्त्रीहि आपल्या परीने प्रख्यात असून हिने अनेक वेळा आपल्या देशाच्या शत्रूशी घोडयावर बसून टक्कर दिली होती.'' (पारसनीस - महाराणी बायजा-बाईसाहेब शिंदे याचें चरित्र)
No comments:
Post a Comment