ग्वाल्हेर येथील शिंदे घराणे
प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक,लेखक, व्याख्याते
शाहू कालखंडात उदयास आलेले एक नामवंत मराठा घराणे म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे घराणे. थोरल्या बाजीराव पंतप्रधान पेशव्यांनी उत्तर हिंदुस्थानात रोवलेला दख्खनदौलतीचा हा मजबूत खांब म्हणजे दिल्ली दरबारावर रोखलेली जणू शिवशंभू छत्रपतींची तळपती समशेरच…
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याला छत्रपती शाहू कालखंडात थोरल्या बाजीराव पंतप्रधान पेशव्यांनी साम्राज्यात परावर्तित करण्यासाठी अखंडपणे दमदार प्रयत्न केले व बर्याच अंशी ते यात यशस्वी झाले, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. चौथाईच्या करारानुसार दिल्लीपती मुघल पातशहाशी व मुघलांच्या सुभेदारांशी शक्यतो स्नेहाने वागायचे तर कधी बळाचा वापर करून जास्तीत जास्त मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी तत्पर राहायचे. या अनुषंगाने आपल्या स्वकीयांची एक भक्कम फळी स्वराज्य संरक्षणार्थ उभारायची, हा बाजीराव राऊंचा राजकीय मनोदय असावा, असे मानणे गैर ठरणार नाही.
मराठेशाहीचा राज्यविस्तार यथायोग्य व्हावा, यासाठी राऊस्वामींनी आखलेले हे धोरण अधिक फलदायीच ठरणार होते. 13 एप्रिल 1731ला शाहू महाराज व करवीरकर शंभाजी महाराज यांच्यात झालेल्या वारणेच्या सुप्रसिद्ध तहामुळे तसेच गुजरातेतील दाभाडे सरकार यांचा पराभव, डभोईतील दणक्यामुळे गांगरलेला निजाम, कुलाबकर सरखेल आंग्रे सरकारांमुळे बराचसा निर्धोक झालेला सागरीकिनारा व त्यामुळे दहशत बसलेले जलचर सत्ताधीश, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने बाजीरावांना उत्तरेकडे समशेर वळवण्यास संधी मिळाली.
उत्तर दिग्विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यास बाजीरावांना साथ मिळाली ती नव्या, निष्ठावंत, पराक्रमी, रणशूर अशा राणोजीराव शिंदे, मल्हारराव होळकर, उदाजीराव पवार, पिलाजीराव जाधव, आनंदराव व सुपुत्र यशवंतराव पवार, बाजी भिवराव रेठरेकर, सावलीसारखे पाठराखण करणारे धाकटे बंधूराज चिमाजीआप्पा व अशाच असंख्य ज्ञात-अज्ञात सहकार्यांची. सोबतीला अंबाजीपंत आणि महादोबा पुरंदरे हेदेखील होते. बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल यांचे दोन पुत्रही या घोडदौडीत राऊस्वामींना पर्यायाने दख्खनदौलतीला बुलंद करण्यास साथ द्यायला सज्ज होते. युरोपातील नेपोलियन बोनापार्ट याने जसे नवनवीन रणझुंजार निर्माण करून अनेकानेक विजय मिळवले होते तसेच बाजीरावांनी हे रणव्याघ्र निर्माण करून, हेरून त्यांच्या साहाय्याने एकामागोमाग एक असे अनेक विजय मिळवून अवघा उत्तर हिंदुस्थान शेषनागाप्रमाणे दोलायमान करून सोडला.
तसं बघितलं तर थोरल्या बाजीरावांपेक्षा पिलाजीराव जाधव, मल्हारराव होळकर, राणोजीबाबा शिंदे ही मंडळी वयाने ज्येष्ठ होती. बाळापूर, फत्तेखर्डा (सागरखेडला), पालखेड, आमझेरा, डभोई आदी ठिकाणी राणोजीरावांनी चांगलाच पराक्रम गाजवला होता. विविध जातींतील परंतु शिवछत्रपतींचा मराठा म्हणवणारी ही सगळी स्वराज्यरत्ने एकदिलाने बाजीराव राऊस्वामींना कायमच आपापल्या दिलात राखून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती. शिवछत्रपतींप्रमाणेच अनेक जाती-उपजातींतील गुणवान, निष्ठावान माणसे एकत्रित करून त्यांना राऊस्वामींनी हिंदवी स्वराज्य विस्ताराच्या पवित्र कार्यात गुंफले होते. बाजीराव पंतप्रधान पेशवे या सगळ्यांच्या मजबूत पाठिंब्यावर, पराक्रमावर मुघलशाहीचा पाडाव करून आलम हिंदुस्थान उत्तर दिग्विजय साकारून शाहू छत्रपतींच्या अधिपत्याखाली आणण्याचा हेतू बाळगून होते. मराठा फौजा आता यत्किंचितही भय न बाळगता आपली भीमथडी तट्टे निःशंकपणे तापी-नर्मदा वारंवार ओलांडून मुघलांच्या प्रदेशात विश्वासाने आक्रमण करीत होत्या. औरंगजेब हयात असताना उत्तरेहून दख्खनप्रांती वाहणार्या मोगली लाटा आता ओसरून ते सैन्य दिग्मूढ होऊन मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांचे उठणारे ध्वनी व खुरांमुळे उसळणारी गगनास भिडणारी माती भयचकित नजरेने फक्त पाहात होते.
यादरम्यान दिल्लीहून महम्मद बंगष हा सरदार शिंदे-होळकर-जाधव यांना रोखण्यास निघाला. सुरुवातीला एकाकी असलेल्या मल्हारबाबा होळकरांना त्याने मात दिली, पण लगोलग राणोजीराव शिंदे अन् पवार यांचा फौजफाटा उपराळ्यास (मदतीस) आल्याने त्याला नाइलाजास्तव मराठ्यांना चौथाई मान्य करावी लागली. असे अनेक पराक्रम गाजवत राणोजीराव शिंदे लवकरच ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक अधिपती झाले. मात्र राणोजीरावांनी आपली स्वतंत्र अशी नाणी पाडल्याचे आढळून येत नाही.
No comments:
Post a Comment