विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 13 November 2022

पंतप्रधान पेशवे यांनी छत्रपतींच्या वतीने पाडलेली नाणी – २

 

पंतप्रधान पेशवे यांनी छत्रपतींच्या वतीने पाडलेली नाणी – २

 रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’घाट

(शककर्त्या शिवछत्रपतींचे अहद तंजावर ते तहत पेशावर रूमशामपावेतो हिंदवी स्वराज्याच्या सीमांच्या विस्तारीकरणाचे भव्यदिव्य स्वप्न वास्तवात आणण्यासाठी पेशवे कुलोत्पन्नांनी अथक प्रयत्न केले. मराठा सैन्याचा परमोच्च पराक्रम म्हणावा तर तो अफगाणिस्तानातील ‘अटक’ किल्ल्यावर फडकवलेला भगवा ध्वज आणि १७६१ ला पानिपतावर अब्दालीला दिलेली निर्णायक धडक!)

कर्तबगार, मुत्सद्दी वडील बाळाजीपंत विश्वनाथ यांच्या तशा अकल्पित मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची जोखमीची अन् जबाबदारीची आणि अर्थातच मानाची वस्त्रे त्यांचे सुपुत्र थोरल्या बाजीरावांस प्रदान केली. यासमयी बाजीराव अवघे २० वर्षांचे होते. अनेक दिग्गज सरदार, मानकरी सेवकांच्या उंचावलेल्या भुवया बाजीरावराव स्वामींनी पुढील फक्त वीस वर्षांत आश्चर्याऐवजी कौतुकात, आदरात बदलतील असा दिगंत पराक्रम गाजवला. अजेय, अजिंय, अपराजित योद्धा असा नावलौकिक आपल्या पाणीदार, धारदार समशेरीच्या व उपजत असलेल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर दाखवून शाहू छत्रपतींचा दरारा अवघ्या हिंदुस्थानला दाखवून दिला. शिवशाहीचा, मराठेशाहीचा दबदबा स्वकीयांसह निजाम, राजपूत तसेच थेट दिल्लीपतीच्या तख्तालाही आपल्या आक्रमक पण सखोल विचाराअंती आखलेल्या व तोलदारपणे पार पाडलेल्या मोहिमांद्वारे दाखवून मराठ्यांच्या कलाशिवाय हिंदुस्थानचे राजकारण हलणार नाही याची तरतूद करून ठेवली. थोरले बाजीराव तसेच पुढे त्यांचे चिरंजीव नानासाहेब पेशवे, मग थोरले माधवराव पेशवे, बाजीरावराव स्वामींची लक्ष्मणाप्रमाणे सातत्याने पाठराखण करणारे बंधू चिमाजीआप्पा अशा कर्तृत्ववान पेशव्यांनी अनेकदा मराठेशाहीचा प्रसंगी कलणारा डोलारा अनेक पार्थ पराक्रमी मराठा सरदार घराण्यांच्या तुल्यबळ सहकार्याने यथोचित सावरून धरला. आलम हिंदुस्थानात मग शिंदे-ग्वाल्हेर, होळकर-इंदोर, गायकवाड-बडोदा, पवार-धार + देवास, नागपूरकर भोसले, मिरज- सांगली-कुरुंदवाडचे पटवर्धन, कर्नाटकातील गुत्ती येथील घोरपडे, अलिबागचे दर्यासारंग सरखेल किताब प्राप्त आंग्रे घराणे अशी एक एक नामांकित घराणी मान्यता पावली होती, उदयास येत होती. या अशाच असंख्य प्रस्थापित घराण्यांचे पराक्रमी पुरुष छत्रपतींच्या तख्ताकरिता रण गाजवताना खस्तही झाले, धारातीर्थी पडले. पंतप्रधान पेशव्यांनी मराठेशाहीच्या विस्ताराकरिता उत्तरेकडे एकामागून एक मोहिमा काढल्या व दख्खनच्या मराठा छत्रपतींचे प्रस्थ सर्वदूर रुजविले. भल्याभल्यांना मराठेशाहीचा दबदबा आपल्या तलवारीच्या जोरावर मान्य करण्यास भाग पाडले. पूर्वी उत्तरेहून वारंवार वावटळीसारखे दख्खनप्रांती येणारे मुघल सैन्य आता हतबल होऊन मराठ्यांचे दक्षिणेतून नर्मदेपार होणारे वेगवान भीमथडी घोडदळ बघून अचंबित होत्साते राहिले. या होणार्‍या मोहिमांचा खर्च भागविण्यासाठी पेशव्यांनी वेळोवेळी कर्जेही घेतली. त्यांना बरेचदा मोहिमांत जसे यश आले तद्वत काही प्रसंगी अपयशाचा सामनादेखील करावा लागला. नाणी पाडण्यासाठी त्यांनी स्थानिक सावकारांना मक्ते (अधिकार)ही दिले. त्यामुळे बर्‍याचशा उत्तरकालीन नाण्यांवर त्यातील काही सावकारांचे ठसे (मार्स), आद्याक्षरेही बघायला मिळतात. शिवछत्रपतींनी मुख्यत्वेकरून देवनागरी लिपीत पाडलेली नाणी आता उत्तर हिंदुस्थानातही स्वीकारली जावीत, याकारणे पर्शियन लिपीचा (तत्कालीन व्यवहारातील भाषेचा प्रभाव) वापर करून परंतु मराठ्यांचे वर्चस्व दर्शविण्याकरिता विशिष्ट चिन्हासह छापली जात होती. यामध्ये श्री, राम, बिल्वपत्र, शमीपत्र, तलवार, शिवपिंडी, शिवलिंग, त्रिशूळ, अंकुश, सूर्य चंद्रकोर, फुले, नागफणी, परशू या व अशा अनेक विविध चिन्हांचा समावेश असायचा. बरेचदा विविध ठिकाणी व तत्कालीन गरजेनुसार पाडल्या गेलेल्या या नाण्यांमुळे या दुदांडी शिवरायी सहसा एकसारख्या आढळून येत नाहीत. वेगवेगळे आकार, असमान वजन, धातूंचा जाड-पातळपणा हा या उत्तरकालीन शिवरायींचा स्थायीभाव म्हणायला हरकत नाही.

ज्या मुघल सत्ताधीशांनी सातत्याने छत्रपती शिवराय स्थापित हिंदवी स्वराज्य नामशेष करण्यासाठी दख्खन प्रांती सदोदित प्रलयंकारी आक्रमणे केली. आता त्याच दिल्लीपतीच्या तख्ताच्या रक्षणासाठी मराठेशाहीचे बुलंद योद्धे उभे राहिले, हा दैवानेच दिलेला काव्यगत न्याय म्हणावा लागेल. अफगाण आक्रमक अहमदशाह अब्दाली याने इंद्रप्रस्थ दिल्लीवर वारंवार आक्रमणे केली. तेथील रयतेचे, राज्यकर्त्या मुघलांचे गर्वहरण, वस्त्रहरण केले आणि त्यांचा क्रूर छळ केला. मात्र आता इसवी सन १७६१ मध्ये मराठेशाहीच्या भीमथडी फौजा हिंदुस्थानच्या मध्यवर्ती सत्तेच्या रक्षणार्थ कर्तव्य म्हणून नानासाहेब पेशव्यांच्या अधिपत्याखाली इरेसरीने अब्दालीवर पानिपत येथे चालून गेल्या. यावेळी झालेल्या घनघोर युद्धात दुर्दैवाने मराठा सैन्याची जवळपास सव्वा लाख बांगडी फुटली, एवढे वीर रणात मृत्युमुखी पडले. अनेक रथी- महारथी सरदार योद्धे रणांगणावर झुंजून धारातीर्थी पडले. बचेंगे तो और भी लडेंगे असे मृत्युशय्या समोर दिसत असताना बाणेदारपणे प्रत्युत्तर करणारा नौजवान वीर दत्ताजी शिंदे अजरामर जाहला. या युद्धाच्या वेळी आपल्या सैनिकांना वेतन देण्यासाठी पानिपत येथील टांकसाळीत मिंट (नाणी पाडण्याची जागा) पेशव्यांनी नाणी पाडल्याचे नाणी क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले जाते. हा आपला जाज्वल्य इतिहास आहे.


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...