स्वराज्याच्या पंतप्रधान पेशव्यांनी छत्रपतींच्यावतीने पाडलेली नाणी १
प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | ‘नाणे’घाट
शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे चौथे अभिषिक्त छत्रपती शंभुपुत्र थोरले शाहू महाराज यांनी पंतप्रधानपदाबरोबर विश्वासाने बरेचसे अधिकार श्रीवर्धन येथील भट कुलोत्पन्न बाळाजी विश्वनाथ यांच्याकडे सोपविले. पेशव्यांनीही अखेरपर्यंत छत्रपतींच्या सार्वभौम गादीसोबत निष्ठा राखून कधीही स्वतःची नाणी पाडली नाहीत, हे विशेष.
पंतप्रधान या शब्दाचा फारसी अर्थ पेशवा. छत्रपती शाहू महाराजांनी आपले
पंतप्रधान म्हणून कोकणातील श्रीवर्धन येथील ‘भट’ घराण्यातील बाळाजी
विश्वनाथ यांस यापदी नियुक्त केले. याआधी शाहू छत्रपतींनी 16 मार्च 1713
रोजी परशुरामपंत पंतप्रतिनिधीस प्रथम पेशवाईचे पद दिले होते. परंतु ते
काढून 19 जून 1713 ला त्यांस पुन्हा ‘प्रतिनिधी’ हे पद दिले. मग 17
नोव्हेंबर 1713 रोजी शाहू महाराजांनी बाळाजीपंतांना पेशवाईची वस्त्रे दिली.
पुढे या भट कुलोत्पन्न पेशव्यांनी शिवछत्रपती
स्थापित हिंदवी स्वराज्याचे नगारे आलम हिंदुस्थानात तर वाजवलेच आणि नंतर
निधड्या छातीच्या मराठा सैन्याच्या जोरावर थेट अफगाणिस्तानातील ‘अटक’ या
किल्ल्यावरही मोठ्या दिमाखात, डौलाने शिवसाम्राज्याचा भगवा ध्वज फडकवला, हा
इतिहास आहे. कोकण किनारपट्टीवर जरबेचा अंमल पूर्वापार राखून असलेले क्रूर
हबशी राज्यकर्ते यांच्याशी पटेना, म्हणून बाळाजीपंत देशावर सासवड येथील
अंबाजीपंत पुरंदरे यांच्या आश्रयाने सरसेनापती चंद्रसेन जाधवराव यांजकडे
चाकरीस आले. पुढे एका प्रसंगोत्पात सरसेनापती चंद्रसेन जाधवराव आणि
बाळाजीपंत यांच्यामध्ये वितुष्ट आले. त्यात बाळाजीपंतांना दस्तुरखुद्द
छत्रपती शाहू महाराजांनी साथ दिल्याने चंद्रसेन जाधवराव अधिकच आक्रमक झाले.
सारासार विवेक सोडून त्यांनी प्रत्यक्ष छत्रपतींविरुद्ध शस्त्र हाती धरले.
परंतु शाहू महाराजांनी त्यांचा पाडाव करून त्यांचे सेनापतीपद त्यांचेच
बंधू संताजी जाधव यांस दिले.
शाहू महाराजांनी या प्रकारे हरप्रसंगी बाळाजीपंतांवर दाखविलेला विश्वास
त्यांनी वेळोवेळी निष्ठेने पार पाडत नेला. पुढे शाहू छत्रपतींनी दमाजी
थोरात यांस बंड न करता श्रीपाशी (देवांजवळ) बेलभंडारा उचलून आम्हांसी
एकनिष्ठ राहावे, असे सांगितले असता, दमाजीने बेलभंडार कशास पाहिजे? भंडार
म्हणजे आमची नित्य खावयाची हळद आणि बेल तरी झाडाचा पाला, असे उद्दाम
प्रत्युत्तर केले. अखेर छत्रपतींनी बाळाजीपंतांस दमाजी थोरातांचे पारिपात्य
करण्यास धाडले. बाळाजीपंतांनी दमाजीचे तसेच खटावकर ब्राम्हण राजांचेही
पारिपात्य केले. अलिबाग येथील सरखेल दर्यासारंग कान्होजीराजे आंग्रे हे
सुरुवातीला शाहूंच्या पक्षाचे नव्हते. त्यांनाही बाळाजीपंत यांनी हरउपाये
करून थोरल्या महाराजांची – शिवछत्रपतींची आण- शपथ देऊन शाहू महाराजांकडे
वळविले. शिमगी पौर्णिमेस (होळी) दर्यासारंग कान्होजीराजे आंग्रे यांनी
बाळाजीपंतांच्या, खंडोबल्लाळ यांच्या मध्यस्तीवरून जेजुरीगडावर
स्वामीनिष्ठेच्या आण-शपथा घेऊन छत्रपतींस उत्तमोत्तम जिन्नस, पदार्थ, खजिना
नजर केला. मनमोकळेपणेसमवेत रंगोत्सव साजरा केला. दिवस होता 25 मार्च 1715.
अशाप्रकारे बाळाजीपंतांनी एकएक लोक स्वामीकार्यात जोडत आणले.
बाळाजीपंतांची ही चौफेर कामगिरी, स्वामीनिष्ठा, कर्तृत्व पाहून व
शिवछत्रपतींचे निकटवर्तीय पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांचे उत्तराधिकारी
बहिरोपंत पेशवे यांचा तोळामासा कर्तेपणा जोखून शाहू महाराजांनी पुण्याच्या
दक्षिणेस असलेल्या मांजरी या स्थानी बाळाजीपंत भट यांस सुमुहूर्त पाहून
भरजरी वस्त्रे, जवाहीर, शिरपेच, तुरा, कंठी, चौकडा, ढाल-तलवार,
शिक्केकट्यार तसेच चौघड्याचा मान, साहेबनौबत, हत्ती-घोडे, जरीपटका देऊन
इतमामाने 17 नोव्हेंबर 1713 रोजी मुख्य प्रधान (पंतप्रधान पेशवे) म्हणून
नेमणूक केली. बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी छत्रपतींसाठी अखेरपर्यंत एकनिष्ठ
राहून सेवा केली. ते सदैव स्वराज्यरक्षण व राज्यहितार्थ दक्ष राहिले.
दिल्लीपतीशी करारमदार करून राजधानी रायगडाच्या पाडावापासून मुघलांच्या
कैदेत असलेल्या शंभुपत्नी आणि शाहू छत्रपतींच्या मातोश्री वज्रचुडेमंडित
महाराणी येसूबाईसाहेब तसेच शिवछत्रपतींचा अन्य कुटुंबकबिला यांस सन्मानाने
मुक्त करवून स्वराज्यात आणणे हे अतिशय जोखमीचे, महत्त्वाचे अन् नाजूक काम
बाळाजीपंतांनी मोठ्याच जबाबदारीने पार पाडले. पुढे बाळाजीपंत पेशवे
मातोश्री येसूबाईसाहेबांसमवेत दिल्लीहून कूच करून काशीयात्रा करून दिनांक 4
जुलै 1719 रोजी राजधानी सातारा येथे आले. सोबत स्वराज्यासाठी चौथाईच्या
सनदा, खजिना/रोख रक्कम तसेच जयपूर, जोधपूर, उदयपूर यांच्याशी समझोते करून
छत्रपतींसाठी भेटी, नजराने, बहुमानाची वस्त्रे, जवाहीर, हत्ती, घोडे व
उत्तम पदार्थ आणवले. मातोश्रींच्या भेटीसाठी आतुरलेल्या छत्रपती शाहू
महाराजांनी सामोरे जाऊन, आदरपूर्वक भेट घेऊन बाळाजीपंत पेशव्यांचा बहुत
सन्मान, सरफराजी केली. मातोश्रींच्या भेटीमुळे व दिगंत राजनैतिक
पराक्रमामुळे छत्रपती संतोष पावून त्यांनी करंडे, रांजणगाव आदी पाच गावांचे
वतन पंतप्रधान पेशवे यांसी दिले.
मात्र अनपेक्षितपणे येथपावेतो सासवड येथील दुर्ग पुरंदर तसेच प्रसंगी
राजधानी सातारा येथे राहणारे बाळाजीपंत पेशवे यांस व्यथा निर्माण होऊन ते 2
एप्रिल 1720 रोजी सासवडास मृत्यू पावले. शाहू महाराजांनी लगोलग त्यांचे
ज्येष्ठ पुत्र (थोरले) बाजीराव बल्लाळ यांस 17 एप्रिल 1720 रोजी कराडजवळील
मसूर मुक्कामी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पंतप्रधान पेशवे म्हणून
नेमले. आधी बाळाजीपंतांनी तसेच समस्त पेशवे कुलोत्पन्न पराक्रमी पुरुषांनी
बहुतांशी सर्वाधिकार हाती असताना कधीही स्वतःच्या नावे नाणी पाडली नाहीत,
तर सदैव एकनिष्ठ राहून छत्रपतींसाठीच नाणी पाडली. त्यांनी पाडलेल्या या
तांब्याच्या नाण्यांना दुदांडी नाणी/शिवरायी असे संबोधले जाते. हे द्विज
कुलोत्पन्न (ब्राम्हण) असल्याकारणाने भाळी रेखल्या जाणार्या दुबोटी
गंधाप्रमाणे या नाण्यांवर श्री आणि राजा या शब्दांच्या मध्ये दोन आडव्या
रेषा बघावयास मिळतात, असा एक विचारप्रवाह नाणकशास्त्र अभ्यासक तसेच
तज्ञांमध्ये प्रचलित आहे.
No comments:
Post a Comment