डॉक्टर vijay sarde सर यांनी केलेले नवीन शिलालेख संशोधन
पुण्यापासून ३८ किमी अंतरावर भिमा नदीकाठी न्हावी-सांडस नावाचे गाव आहे. या गावाजवळ पिंपरी सांडस व सांगवी सांडस या नावाची अन्य दोन गावे देखील आहेत. ‘सांडस’ ही संज्ञा या गावांच्या मागे का लावली जाते, हे कळायला भाग नाही. बहुदा ‘भिमा’ नदीचा सांडवा येथून होत असावा, म्हणून हे नाव लावले जात असावे. या गावात महादेव मंदिर (१८.६०७३९८, ७४.१५६०८७), भैरवनाथ मंदिर (१८.६०७०९६, ७४.१५६९७९), दुसरे महादेव मंदिर (१८.६०७१९७, ७४.१५७००६), पुंडलिक मंदिर (१८.६०६९४९, ७४.१५५०४८) ही उत्तर-मराठा कालखंडातील मंदिरे आहेत.
न्हावी सांडस हे १८व्या शतकात शितोळे घराण्याला मिळालेले एक इनाम गाव होते. यांचे मूळ उत्तर भारतातील सिसोदिया वंशातील मानले जाते. सु. बाराशे वर्षांपूर्वी हे घराणे उत्तरेतून महाराष्ट्रात स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. निजामशाही, आदिलशाही, मोगल तसेच मराठ्यांच्या काळात या घराण्याकडे पुणे परगण्यातील देशमुखीचे हक्क होते. शितोळे घराण्यातील मालोजीराव दुसरे यांनी पुरंदरच्या लढाईत गाजविलेल्या पराक्रमाबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पुण्याजवळील काही गावे इनाम म्हणून दिली. बहुदा या गावांच्या यादीमध्ये न्हावी सांडस हे गाव देखील असावे. पुणे परिसरातील पाषाण, लवळे, वानवडी, हडपसर, मांजरी, मोशी यांसाराखी सु. साडे तीनशे गावे यांना इनाम म्हणून मिळाली होती. सु. ३००-३५० वर्षांपूर्वी शितोळे देशमुखांची नरसिंह शितोळे, नाईक शितोळे व सातभाई शितोळे या तीन शाखांमध्ये विभागणी झाली.
न्हावी सांडस गावाच्या मध्यभागी असणारे महादेव मंदिर चारी बाजूंनी प्राकारभिंतींनी वेढले आहे. समोरच्या बाजूला ओवऱ्या आहेत. या मंदिराला सभामंडप व गर्भगृह आहे. मंदिरासमोर उघड्यावर एक नंदी आहे.
महादेव मंदिराच्या प्राकारभिंतीच्या बाहेर एक मुख्य प्रवेशद्वार असून याच्या दोन्ही बाजूंवर शरभ कोरले आहेत. मध्यभागी ललाटपट्टीवर गणेशाचे शिल्प आहे. या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला ९ ओळींचा देवनागरी लिपीत व मराठी भाषेतील एक लेख कोरला आहे. त्याची अक्षरवटिका उठावदार आहे. लेख कोरलेली शिळा ३७ सेमी लांब व ३४सेमी रुंद अशी आहे. ऊन, वारा, पाऊस यांमुळे शिलालेखाच्या डाव्या भागातील काही शब्द पुसट झाले आहेत, तर काही अक्षरे तुटून गेली आहेत. या लेखात तो कधी खोदला गेला, याविषयी शके वर्ष दिले होते. परंतु नेमका हाच भाग नष्ट झाल्याने लेखाची निश्चित तारीख सांगता येत नाही. यापूर्वी या शिलालेखाचे वाचन किंवा प्रकाशन इतरत्र कोठेही झाल्याचे दिसून येत नाही.
शिलालेखाचे वाचन:
श्री मोरेश्वर च [रणी] .....
वास : मंबाजी सु [त]...
वाजी व भगवंतराव +
पीराजी व गणोजी सी
तोळे पाटील मौजे [न्हा]
वि नीजदास : सके [१६३०]
विभव नामसंवतसरे +
चैत्र सुध १ प्रतीप [दा दि]
वसी वोवऱ्या समा [प्ती].....
अर्थ: लेखात सुरुवातीलाच मोरेश्वराला वंदन केले आहे. हे घराणे पुण्यातील कसबा पेठेत स्थायिक झाले होते. येथे यांचा वाडाही आहे. येथेच जवळ गणपतीचे एक मंदिर देखील आहे. वरील शिलालेखावरून शितोळे घराण्याची गणेशभक्ती दिसून येते. हा शिलालेख वंशावळीच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाचा आहे. यात शितोळे पाटील घराण्यातील मंबाजी, बाजी (?), भगवंतराव, पीराजी व गणोजी शितोळे या पाच व्यक्तींची नावे आली आहेत. हा शिलालेख विभव नामसंवत्सरात चैत्र शुद्ध १ प्रतिपदेला कोरला असून तो खोदण्यामागचा मुख्य उद्देश मंदिराच्या ओवऱ्या बांधल्याची स्मृती जपणे हा आहे. या लेखाचे एक मोठे वैशिष्ठ्य म्हणजे आजपर्यंत शितोळे पाटील घराण्यासंबंधित माहिती सांगणारा हा पहिलाच शिलालेख आढळून आला आहे.
महादेव मंदिराजवळच गावाचे ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरासमोर प्राकाराला पूर्वेकडे एक मोठे प्रवेशद्वार आहे. या द्वाराजवळ एक सतीशिळा व एक दीपमाळ आहे. सभामंडपात मध्यभागी पश्चिमेकडील भिंतीला लागून भैरवनाथ व जोगेश्वरीच्या मूर्ती स्थापिल्या आहेत. या मंदिराजवळ एक विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर देखील आहे.
भिमा नदीकडील बाजूला एका रस्त्याच्या कडेला महादेवाचे दुसरे एक मंदिर आहे. मंदिरासमोर उघड्यावर नंदीप्रतिमा ठेवली आहे. या मंदिराचे शिखर नष्ट झाले आहे. या मंदिराला लागून सतीचे एक लहान मंदिर आहे. महादेव मंदिरावर काही पाषाण शिल्पे देखील आहेत. सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची सर्वसाधारण रचना आहे. याशिवाय भिमा नदीलगत काही समाध्या व पुंडलिकाचे एक लहान मंदिर आहे.
एकंदरीत, नदीलगतचे पुंडलिक मंदिर सोडल्यास स्थापत्यशैलीनुसार ही सर्व मंदिरे एकाच काळात म्हणजे १८व्या शतकात बांधली असावीत. या काळातील इतर मंदिरेही अशीच आहेत. महादेव मंदिरातील शिलालेखाची काळजी न घेतल्याने त्याची अवस्था खराब झालेली आहे. वरील मंदिरांची नोंद यापूर्वी कुठेही घेतली गेल्याचे आढळून येत नाही. न्हावी सांडस येथील मंदिरांवर विशेष कलाकुसर नसली तरी ती शितोळे घराण्याबरोबरच मराठ्यांच्या इतिहासाची सु. अडीचशे-तीनशे वर्षे जुनी साधने असल्याने महत्त्वाची आहेत.
धन्यवाद
©Vijay Sarde सर
No comments:
Post a Comment