इंगळे घराण्याचा इतिहास :-
जंग बहाद्दर सरदार इंगळे घराणे
लेखन ::प्रसाद शिंदे यांच्या आभ्यास नुसार
---------------------------------------------
१) सरदार इंगळे घराणे शिवपूर्व काळापासूनच एक मातब्बर घराणे म्हणून प्रसिद्ध होते.सरदार इंगळे घराणे हे मूळचे बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील करवंड गावचे.करवंड गावी इंगळे घराण्याची भव्य गढी असून सध्या भग्नावस्थेत आहे.इंगळे घराण्याचे नातेसंबंध थेट भोसले घराण्याशी होते.इंगळे घराण्यातील गुणवंताबाईसाहेब या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राणीसरकार होत्या तसेच तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांचा विवाह इंगळे घराण्यातील दिपाबाईसाहेब यांच्याशी झाला होता.आदिलशाही दरबारातील एक वजनदार घराणे म्हणून सरदार इंगळेंची कीर्ती सर्वदूर होती.इंगळे घराण्याला जंगबहाद्दर हा किताब आहे.स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या सोबत राहून या घराण्याने बरीच तलवार गाजवली.
२) सरदार शिवाजीराव इंगळे,सरदार बहिरजी नाईक इंगळे हे प्रमुख सरदार स्वराज्यसेवेत होते.प्रतापगडच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाशी भेट घेण्याचे ठरविले तेव्हा काही निवडक मातब्बर मंडळींसोबत सरदार कात्याजीराव इंगळे यांना आपल्यासोबत घेतले.
३) छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कालखंडात स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर झाले.स्वराज्य विस्तारासाठी हि इंगळे मंडळी महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपल्या तलवारीच्या जोरावर सरंजाम मिळवून स्थायिक झाली.दक्षिणेत तंजावर या ठिकाणी स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसलें सोबत सरदार इंगळेंची एक शाखा होती.तसेच पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे-इंगळे,बेलसर नजीक निळुंज-वाळुंज परिसर,कोल्हापूर,ग्वाल्हेर,उज्जैन मध्ये सरदार इंगळे घराण्याच्या शाखा सध्या वास्तव्यास आहेत.
४) मराठा साम्राज्याचा उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणाऱ्या शिंदे सरकार घराण्याच्या पदरी राहून इंगळेंनी मोठी कीर्ती मिळवली.शिंदेशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांच्या समवेत राहून सरदार सुभानजीराव इंगळे,सरदार त्रिंबकजीराव इंगळे हे अनेक मोहिमेत सहभागी होते.सरदार त्रिंबकराव इंगळे यांना त्यांचे पराक्रमी पुत्र सरदार अंबुजीराव इंगळे यांची बहुमूल्य साथ मिळाली.
५) महापराक्रमी श्रीमंत सुभेदार जयाप्पाराव शिंदे व वडील सरदार त्रिंबकजीराव इंगळे यांच्या सावलीत राहून राजश्री अंबूजीबाबा चांगलेच तरबेज झाले होते.पानिपत युद्धानंतर श्रीमंत महादजीबाबांनी सैन्याचे मजबूत संघटन केले व सरदार अंबुजीराव इंगळे यांच्यावर सेनापती पदाची जबाबदारी टाकली.राजश्री अंबुजीबाबा यांनी श्रीमंत पाटीलबाबांच्या मागे सरदार इंगळे घराण्यातील मातब्बर वीरांची फौज एखाद्या मजबूत तटबंदी सारखी उभी केली.यामध्ये सरदार खंडोजीराव इंगळे,बाळोजीराव इंगळे,मालोजीराव इंगळे,पांडोजीराव उर्फ विठोजीराव इंगळे या सख्या बंधुसोबत बाबाजीराव इंगळे,तिलकराव इंगळे,शामराव इंगळे,शक्तीराव इंगळे,जीवजीराव इंगळे,लक्ष्मणराव इंगळे यांचा समावेश होता.
६) सरदार अंबुजीराव इंगळे यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले.गोहदवर विजय मिळविल्यानंतर या राज्याची व्यवस्था अंबुजीरावांनी योग्यरितीने लावून दिली. राघोगढ,करोली संस्थान चौथ देण्यास मनाई करत असताना आपल्या दराऱ्याच्या जोरावर चौथवसुली केली.राघोगढच्या राजावर जाता-येता चांगलीच वचक ठेवली.अंबुजीरावांचा धसका घेऊन राघोगढवाल्यांनी पुढे चौथ वेळेवर देण्याचे मान्य केले.श्रीमंत महादजीबाबांनी दिल्लीच्या बादशहासोबत मसलत करण्याची जबाबदारी अंबुजीरावांवर सोपल्यावर त्यांनी आपल्या हुशारीची चुणूक दाखवून मराठ्यांचा मनसुबा बादशहाच्या चांगलाच गळी उतरवला.
मराठा व शिख यांच्यात झालेल्या तहाची अंबलबजावणी करण्याची जबाबदारी जंगबहाद्दर अंबुजीरावांच्या खांद्यावर सोपवली.सोबतच शिखांच्या राज्याला लागून असलेल्या सोनपतच्या २८ महालांवर फौजदार म्हणून नियुक्त केले.याच मोहिमेदरम्यान अंबुजीरावांची धाडसी व आक्रमकवृत्ती त्यांनी पाटीलबाबांना लिहलेल्या एका पत्रातून दिसून येते त्यापत्रातील मजकूर थोडक्यात असा की,"शिखांचा जमाव भरपूर आहे परंतु सगळ्यांचे काही एकमत नाही त्यात बरेच फितुर लोकही आहेत.लाहोरकडील शिख व पानिपत कडील शिख हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत.पानिपतकडील शिखांनी लाहोरच्या शिखांचे मिळून पारिपत्य करण्याचा प्रस्ताव पाठविला असून आम्ही त्यांचा बंदोबस्त करू."यावर पाटीलबाबांनी दगाबाजीची शक्यता वर्तवून संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.
शिखांच्या अफाट जमावात शिरून त्यांचा बिमोड करण्याचे धाडस अंबूजीरावांसारखा रणबहाद्दरच करू शकतो.पुढे अंबुजीरावांनी आपल्या मुत्सद्देगिरीने शिखांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले याचा फायदा पुढे मराठा साम्राज्याला चांगलाच झाला.
श्रीमंत महादजीबाबाबांनी पुण्यात येण्याअगोदर राजपुतान्याची जबाबदारी अंबूजीरावांवर सोपवली. शिंद्याची राजधानी असलेल्या उज्जैन,ग्वाल्हेरच्या संरक्षणाची जबाबदारी वेळोवेळी चोख बजावली. राजपुतान्यातून चौथ वसुली असो वा उत्तरेतील महत्त्वाचे राजकारण असो अंबूजीराव सदैव अग्रस्थानी राहिले. श्रीमंत महादजीबाबांचा उजवा हात अंबूजीरावांना म्हंटल तर काही अतिशयोक्ती होणार नाही.शिंदे सरकारांच्या पत्रव्यवहारात अंबुजीरावांच्या बद्दल असे लिहले आहे की,"अंबुजी माणूस फार कामाचा,सेवेयोग्य आहे.स्वरूप जवळ असल्यासच ध्यानात येईल."या दोन ओळीच अंबूजीरावांचे शिंदेशाहीतील महत्व अधोरेखित करतात.
उत्तरेतील राजकारणात व्यस्त असून सुद्धा अंबूजीरावांची आपल्या पुण्यातील चाकण जवळील म्हाळुंगे या गावाशी नाळ तुटली नाही.गावशीवेचा व कुरणाचा वाद लवकरात लवकर निकालात काढावा यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.अंबुजीरावांनी मौजे देहू गावाची पाटीलकी विकत घेतली होती.
श्रीमंत दौलतराव शिंदे यांच्या कार्यकाळात ८०-८५ वय असताना सुद्धा अंबूजीरावांनी मराठा साम्राज्याची सेवा केली.१८०९ साली श्रीमंत महादजीबाबांच्या या निष्ठावंत सहकाऱ्याने अखेरचा श्वास घेतला.पुढे त्यांचे पुत्र त्रिंबकराव व बंधूनी शिंदे सरकारांची निष्ठेने सेवा केली.
ग्वाल्हेर व उज्जैन या ठिकाणी अंबुजीरावांचे वंशज हल्ली वास्तव्यास आहेत.ग्वाल्हेर या ठिकाणी अंबुजीरावांचे बंधु बाळोजीराव इंगळे यांचा वंशविस्तार झाला असून त्यांना राई हा महाल इनाम असल्यामुळे राईवाले इंगळे म्हणून ओळख आहे.श्रीमंत महाराजा दौलतराव शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये लष्कर म्हणून एक नगर वसवले तेव्हा आपल्या निवासासाठी गोरखीमहाल म्हणून एक महाल बांधला.त्याची पुढे ओळख महाराजावाडा म्हणुन झाली.त्याच कडेने पुढे ग्वाल्हेरच्या सरदारांनी आपले वाडे बांधले.सरदार इंगळे यांनी दालबाजार या ठिकाणी आपला वाडा बांधला.पुढे वंशविस्तारामुळे ग्वाल्हेरमधील अनेक ठिकाणी सध्या इंगळे मंडळी वाडे बांधून वास्तव्यास आहेत.
मराठा साम्राज्याची अविरतपणे सेवा करणाऱ्या शिंदेशाहीतील निष्ठावंत सरदार इंगळे घराण्याच्या चरणी सदैव नतमस्तक
No comments:
Post a Comment