हिंदुस्तानातील इतिहासातील सर्व " शिंदे घराणे "
यांचा इतिहास
लेख :: हनुमंत शिंदे सरकार
कोकणातील शिंदे रवीराव घराणे हे प्रसिद्ध घराणे बहमनी काळात होते.( संदर्भ रवीराव घराण्याची कैफियत) शिळीमकर हे सुद्धा शिंदे, सिलिंब गावावरून शिंदे घराण्याला ते नाव पडले. तसेच १२ मावळ मधील एका मावळातील देशमुखी ही शिंदे घराण्याकडे होती.
आजच्या जावळी तालुका( जिल्हा सातारा) येथील शिंदे घराण्याचे ( गाव कुडाळ, इंदवली आखाडे इत्यादी ) उल्लेख हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात येतात ( संदर्भ – शिवपुत्र संभाजी, लेखक डॉ. कमला गोखले) . पहिल्या बाजीराव पेशवे यांच्या काळात कण्हेरखेड तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील राणोजी शिंदे यांच्या कर्तबगारीने शिंदे घराणे पुढे आले आणि नंतर ग्वालेर चे स्वतंत्र राजघराणे झाले.
या व्यतिरिक्त ही शिंदे घराण्याच्या विविध शाखा इतिहासात कर्तबगार होत्या. सालपेकर शिंदे हे पाणपते शिंदे म्हणून प्रसिद्ध होते. पानिपत मध्ये त्यांनी बराच मोठा पराक्रम गाजवला होता. पिंगोरीकर शिंदे घराणे हे सुद्धा ग्वालेर च्या सरदार घराण्यांपैकी एक आहे.
आता वळूयात सिंदिया आडनावकडे. सिंदिया आडनाव हे शिंदे घराण्याला उत्तरेत गेल्यावर मिळाले. ते मूळचे शिंदेच.
नरेंद्र पाटील यांनी विस्तृतरित्या माहिती दिली आहे ती ही समजून,
इसवी सन पूर्व काळात वैशाली गणराज्य हे सूर्यवंशी राजा विशाल यांनी स्थापन केले, तिथे सुर्यवंशी क्षत्रिय राज्य करीत होते. पण नंतर जेव्हा नंद घराण्याचं राज्य तिथे आले तेव्हा अतिशय विपरीत परिस्थिती आली आणि ते नंद राजे अत्याचार करू लागले तेव्हा कित्येक सुर्यवंशी क्षत्रिय राजे दिल्ली, पंजाब महाराष्ट्र अशा ठिकाणी गेले. वैशाली गण राज्यातून आलेले म्हणून ते वैस अथवा बैस क्षत्रिय म्हटले गेले. ह्याच बैस राजघराण्यात हर्षवर्धन राजा झाला.
इसवी सनाच्या सहाव्या शतकानंतर बैसवाडा येथून श्रीरामसिंग हे दक्षिणेत महाराष्ट्र मध्ये आले.त्यांच्या दोन मुलांपैकी एक रतनसिंग है सिंदखेड येथे राहिले,आणि त्यामुळे ते शिंदे म्हटले गेले. शिंदे घराणे हे सूर्यवंशी बैस शाखेचे राजपूत घराणे आहे.श् दोन्ही मुलांची वंशावळ वाढत जाऊन आजचे शिंदे घराण्याचा विस्तार वाढत गेला, रतनसिंह यांच्या वंशातील एक पुरुष पुढे कर्नाटक मध्ये गेले. आणि श्री रामसिंह यांचा जयसिंह यांच्या वंशात पुढे रविराव हा पुरुष झाला.
शिंदे घराणे हे शेष वंशी ही आहेत,अर्थात प्रभू श्रीरामचंद्र यांचा लहान भाऊ भरत यांच्या वंशात तक्षक नावाचा राजा झाला ,जो की नाग अवतार मानण्यात येतो,तसेच लक्ष्मण यांना सुद्धा श्रीहरी च्या शेषनागाचा अवतार मानण्यात येतो. पण भरत किंवा लक्ष्मण हे मूळचे सूर्यवंशी घराण्यात आहेत आणि नंतर ते शेष वंशी मानले जातात,शेषवंश हा सुर्यवंशाचाच एक भाग आहे.
शिंदे घराण्याचे गोत्र कौंडिण्य आहे,तर वंश हा सुर्यवंश आहे.देवक समुद्री वेळ अथवा मरिदी चा वेल आहे. या घराण्याचा वेद यजुर्वेद – मध्यंदिन आहे, मंत्र गायत्री मंत्र आहे, ध्वजाचे चिन्ह श्रीसूर्यनारायण आणि शेषनाग असे आहे, गोत्राचे प्रवर अंगिरस,बृहस्पती आणि कौंडिण्य असे आहेत.
हत्यार तलवार आहे. मूळची राजधानी राजस्थान मध्ये रणथंबोर तसेच, राजस्थान मधील नागौर,कर्नाटक मध्ये पत्तदकल,बदामी आहेत. सध्याची एक शाखा ग्वाल्हेर येथे आहे. या घराण्याची कुलदैवते ही प्रामुख्याने, करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी, श्री रामवरदायिनी,श्रीतुळजाभवानी,तसेच श्री ज्योतिबा अशी आहेत.
No comments:
Post a Comment