विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 17 March 2023

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती. श्रीमंत बाजीराव पेशवे भाग १९

 


मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा हा पहिलाच सेनापती.
श्रीमंत बाजीराव पेशवे
भाग १९
जंजिरा स्वारी हे देखील बाजीरावाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे प्रकरण आहे. स. १७३३ मध्ये या मोहिमेस आरंभ होऊन स. १७३६ मध्ये तिचा शेवट झाला. जंजिरा मोहीम शाहूच्या आज्ञेने सुरु झाली. या स्वारीत पेशव्यासह प्रतिनिधी, आरमार प्रमुख, सरलष्कर व राजमंडळातील सर्व प्रमुख सरदार सहभागी झाले हे या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य असून तेच तिचे मुख्य वैगुण्य बनले ! पेशव्यासहित राजमंडळातील सर्व प्रमुख सरदार, नामांकित पथके असून देखील त्यावर एका सेनापतीची हुकुमत नसल्याने लवकरचं हि मोहीम रेंगाळली. बाजीरावाने कोकणात उतरून जंजिऱ्यावर चाल केली. एका हबशी सरदारास फितूर करून त्याने जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला. त्याचवेळी जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात असलेला रायगड किल्ला जिंकण्यासाठी देखील बाजीरावाने कारस्थान रचले. इतक्यात प्रतिनिधीने स्वतंत्रपणे कारस्थान रचून ८ जून १७३३ रोजी रायगड ताब्यात घेतला. त्यामुळे प्रतिनिधीचा बोलबाला तर बाजीरावाचा जळफळाट झाला. असूया हि एकाच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दोन वा अधिक व्यक्तींच्या मनात असतेचं. कधी हि असूया चांगल्या रूपाने म्हणजे निकोप स्पर्धेने व्यक्त होते तर अनेकदा ती द्वेष रूपानेचं प्रकट होते. आपण ज्या काळाची चर्चा करत आहोत, तेथे निकोप स्पर्धेला पोषक असे वातावरणचं नव्हते. त्यामुळे असूयेचे पर्यावसान द्वेषात होणे स्वाभाविक होते. प्रतिनिधी - पेशवा यांचे शीतयुद्ध म्हणजे याचेचं एक उदाहारण. रायगड प्रकरणापासून बाजीरावाने जंजिरा मोहिमेतून आपले अंग काढून घेण्यास सुरुवात केली. मुळात बाजीरावसारखी व्यक्ती स्वतंत्रपणे जे कार्य करू शकते तेच कार्य इतरांच्या सहाय्याने करण्यास असमर्थ ठरते. जंजिरा स्वारी यशस्वी होण्यासाठी आंगऱ्यांच्या मदतीची गरज होती. म्हणजे आंगऱ्यांना जेव्हा लढाईची वेळ अनुकूल वाटेल तेव्हाचं ते संग्रामास सिद्ध होणार होते.
या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घेणे गरजेचे आहे व तो म्हणजे आरमारी आणि मैदानी युद्धातील फरक ! मैदानी लढायांचा निकाल चार - दोन चकमकींमध्ये देखील निर्णायकपणे लागेलचं असे नाही. परंतु, आरमारी युद्धांत एका लहानशा चकमकीतील पराभव देखील निर्णायक ठरू शकतो. जंजिरेकरांशी लढताना आपल्या आरमाराचे अधिक नुकसान होऊ नये याची काळजी आंगऱ्यांना घेणे भाग होते. कारण याच आरमाराच्या बळावर त्यांना देशी - विदेशी शत्रूंना तोंड द्यायचे होते. या ठिकाणी फक्त एवढेचं सांगतो कि, आपली सर्व लढाई शक्ती एकवटून एखाद्या आरमारी लढाईत उतरण्यास जिथे पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धातील प्रगत देशांचे आरमारप्रमुख देखील धजावले नाहीत, तिथे अठराव्या शतकातील आंगऱ्यांनी थोडाफार बोटचेपेपणा केला तर त्यात त्यांना दोष का द्यावा ?

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...