विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 18 April 2023

तत्त्वासाठी लढणारे मराठे भाग ४


तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे


भाग ४
परंतु तेव्हाचे लहान-मोठे हिंदू सत्ताधीशसुद्धा मराठ्यांच्या म्हणजेच आपल्या धर्मबांधवांच्या मदतीला धावले नाहीत, हे येथे नमूद करायला हवे. खरे तर त्यांनाही उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांचा शिरकाव नको होता. हे सारे राजेरजवाडे तेव्हा स्वस्थ बसून गंमत पाहत राहिले. अब्दालीच्या हातून मराठे परस्पर नर्मदेच्या दक्षिणेस लोटले गेले, की मग परत आपलीच सद्दी चालेल, असाच त्यांचा होरा असावा. थोडक्यात सांगायचे म्हणजे, तेव्हाचे सर्व हिंदू-मुसलमान सत्ताधारी एक तर धर्माच्या किंवा संकुचित स्वार्थाच्या आहारी गेले होते. या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी केलेल्या संघर्षाचे नीट मूल्यमापन अजूनही झालेले दिसत नाही. धर्माने हिंदू असलेले मराठे धर्माने मुसलमान असलेल्या राजसत्तेचे रक्षण करण्यासाठी स्वतःस पणाला लावतात, ही घटनाच मुळी भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणाचा पाया घालणारी आहे. सदाशिवरावभाऊंनी या सर्व सत्ताधीशांना पत्रे लिहून कळविले होते, की अब्दाली हा परकीय शत्रू असून, मोगलांची सल्तनत हिंदुस्थानी म्हणजेच स्वकीय व स्वदेशी आहे. परकीय आक्रमणापासून या स्वदेशी सत्तेचे रक्षण करणे व त्यासाठी आपापसांतील किरकोळ भांडणे दूर ठेवून एकत्रितपणे परकीय सत्तेचा मुकाबला करणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. दुर्दैवाने मराठ्यांच्या या व्यापक राष्ट्रीय व धर्मनिरपेक्ष धोरणाचे महत्त्व हिंदुस्थानातील तेव्हाच्या धर्मांध व स्वार्थांध सत्ताधीशांना समजूच शकले नाही, आणि त्यांनी मराठ्यांना एकटे पाडायचे ठरवले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...