तत्त्वासाठी लढणारे मराठे
डॉ. सदानंद मोरे
पानिपतच्या
या लढाईत मराठ्यांचा पराभव झाल्याचे व त्यांना त्याचा मोठा धक्का बसल्याचे
सर्वज्ञातच आहे. त्याची काही चर्चा आपण यापूर्वी केलेलीही आहे. या
संदर्भात इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी केलेले विवेचन आजही
महत्त्वपूर्ण मानले जाते. शेजवलकर लिहितात ः "पानिपत येथे मराठ्यांचा पराभव
झाला व तेणेकरून महाराष्ट्रावर दुःख, खेद, विषाद यांची छाया पसरली; पण ती
तात्कालिकच होती. या पराभवाचे परिणाम आपणास सर्वस्वी मारक होतील, असे त्यास
त्या काळी वाटलेले दिसत नाही. अखिल हिंदुस्थानच्या कल्याणाच्या दृष्टीने
विचार करता काहींना हा युद्धशास्त्रदृष्ट्या झालेला पराभव नैतिकदृष्ट्या
मोठा विजयच वाटला असल्याचे दिसून येते. इव्हॅन्स बेल या विचारवंत
इतिहासाभ्यासकाने संशोधनकाळापूर्वीच लिहिले ः पानिपतची लढाईसुद्धा
मराठ्यांना अभिमानास्पद व कीर्तिस्पद अशीच घटना समजली पाहिजे! मराठे "सर्व
हिंदी लोकांसाठीच हिंदुस्थान' या ध्येयासाठी लढले! पण दिल्ली, अयोध्य व
दख्खन येथील प्रबळ मुसलमान सत्ताधीश मात्र या वेळी कारस्थाने करीत, आपल्या
चैनीत दंग होऊन एका बाजूस बसले आणि जरी मराठ्यांचा युद्धात पराजय झाला तरी
विजयी अफगाण जे यानंतर एकदा परत गेले ते हिंदी राजकारणात ढवळाढवळ
करण्यासाठी पुन्हा दिल्लीस आले नाहीत! शेजवलकर याच संदर्भात प्राचार्य
रॉलिन्सन यांनी काशीराजाच्या खरीस लिहिलेल्या प्रस्तावनेतील मजकूर उद्धृत
करतात ः ""विशिष्ट परिस्थितीचा विचार करता इतिहासातील एखादा पराजय
विजयाइतकाच सन्मानदायक म्हणावा लागतो आणि मराठ्यांच्या सर्व इतिहासात
त्यांच्या फौजेने राष्ट्रातील सर्व उत्तम शिलेदारांसह पानिपतच्या घनघोर
रणक्षेत्रात आपल्या देशाच्या व धर्माच्या वैऱ्यांशी लढताना जे मरण पत्करले
त्याहून जास्त यशदायक मरण इतिहासात क्वचितच नोंदले गेले असेल!''
No comments:
Post a Comment