विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 3 April 2023

लोणीकंदचं शिंदे 'रविराव' घराणं

 






लोणीकंदचं शिंदे 'रविराव' घराणं
1816-17 मध्ये त्रिंबकजी डेंगळेंनी ठाण्याच्या तुरुंगातून मोठ्या शिताफीने पलायन केल्यानंतर इंग्रजांविरुद्ध खानदेशात भिल्ल व साताऱ्याजवळील शंभू महादेवाच्या डोंगररांगांत मांग व रामोशी समाज संघटित करायला सुरुवात केली. पेशव्यांची त्यांना अप्रत्यक्ष मदत होतीच. त्यावेळी पुण्याचा इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टन त्रिंबकजींच्या या हालचालींची बारीकसारीक वर्तमानं कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला कळवत असे. (गव्हर्नर जनरल तिकडे लंडनला ही वर्तमानं कळवत असे व त्यापैकी निवडक तेथील ब्रिटिश सरकारचं अधिकृत वर्तमानपत्र ‘द लंडन गॅझेट’ मध्ये प्रकाशित होत असत). या कामात बरीच मंडळी त्रिंबकजींना सहाय्य करत होती. त्यापैकी एक म्हणजे रविराव शिंदे लोणीकर.
अशाच एका एलफिन्स्टनच्या पत्रात रविराव शिंदे लोणीकरांचा उल्लेख ‘Father in law of Trimbakji’ असा केलेला मला आढळला. म्हणजे त्रिंबकजींचे सासरे. त्रिंबकजींची बायको निश्चित या लोणीकर शिंदे घराण्यातील असली पाहिजे हे स्पष्ट झालं. परंतु हे शिंदे घराणं कुठल्या लोणीचं, हा प्रश्न होता. महाराष्ट्रात शिंदे आडनावाचे लोकही भरपूर आणि लोणी नावाची गावंही भरपूर. त्यामुळे सापडणं अवघड. परंतु त्रिंबकजी उत्तरपेशवाईत लौकिकास आल्याने त्यांना मुलगी देणारी मंडळीही सरंजामदार वा वतनदार असली पाहिजे हे नक्की होतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळायला फार वेळ लागला नाही. शिंदे घराण्याचा वा कुळाचा इतिहास वाचताना एकदा वाचनात आलं की शिंदेंच एक घराणं आदिलशाही, निजामशाहीच्या काळात म्हणजे सोळाव्या शतकात उदयास आलेलं होतं. त्यांना ‘रविराव’ हा किताब होता (त्यावेळी मराठा सरदारांना आदिलशाहीकडून असे बहुमानदर्शक किताब मिळत उदा. मोरेंना चंद्रराव, घाटगेंना झुंजारराव व सर्जेराव, पवारांना विश्वासराव, थोरातांना दिनकरराव वगैरे व त्या घराण्यातील मंडळी ही या नावाने ओळखली जात). मग ही रविराव मंडळी कुठे आहेत याचा शोध घेतला असता गावाचं नाव मिळालं, ते म्हणजे पुण्याजवळील ‘लोणीकंद’.
लोणीकंद हे गाव पुणे-अहमदनगर महामार्गालगत असून पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. कंद आडनावाची मंडळी जास्त असल्याने लोणीला अलीकडच्या काळात लोणीकंद असं नाव पडलं. तसं नाव लोणीच. एका ऐतिहासिक पत्रात सुकलोणी असाही या गावचा उल्लेख आहे. शिंदे ‘रविराव’ घराण्याला हे गाव जहागिर होतं. याशिवाय या घराण्यातील मंडळी बाभूळसर (ता. शिरूर, जि. पुणे), राळेगण थेरपाळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) व ग्वाल्हेर या ठिकाणी आहेत.
शिंदे घराण्याचं मराठ्यांच्या इतिहासात मोलाचं योगदान आहे. या घराण्यातील वेगवेगळ्या व्यक्ती व घराणी मोठमोठे पराक्रम करून प्रसिद्धीस आली. शिंदे म्हंटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ग्वाल्हेरचं शिंदे घराणं. परंतु ग्वाल्हेरकरांचा उदय होण्यापूर्वीही शिंद्यांची काही घराणी लौकिकास आलेली होती. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात खानदेशात व अगदी नर्मदेपार जाणारा सरदार नेमाजी शिंदे, शिवकाळात उदयास आलेलं मनोळीचं शिंदे घराणं (याच्या शाखा नेसरी व तोरगळ येथे आहेत), कण्हेरखेडच शिंदे घराणं (हे घराणं औरंगजेबाच्या पदरी होतं, आपल्या कैदेत असणाऱ्या संभाजीपुत्र शाहू महाराजांचा विवाह औरंगजेबानं या घराण्यातील सावित्रीबाई हिच्याशी करून दिला होता) वगैरे.
मात्र खऱ्या अर्थानं शिंदे घराण्याचा लौकिक वाढवला तो राणूजी शिंद्यांनी. पेशवेकाळात उदयास आलेलं राणूजी शिंदेंचं घराणं मूळ सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेडच्या शिंदे घराण्यापैकीच. आरंभी पेशव्यांच्या पदरी साधा सेवक असणारा राणूजी बाजीराव पेशव्यांचा सरदार झाला. त्यांना माळव्यात मुलुख मिळाला. त्यांचे पुत्र जयप्पा, दत्ताजी, तुकोजी, महादजी यांनी इतिहासात पराक्रम गाजवला. पानिपतोत्तर काळात उत्तरेत मराठ्यांचं वर्चस्व महादजी शिंदेंनी पुनः प्रस्थापित केलं. 1947 पावेतो शिंद्यांचं ‘ग्वाल्हेर’ हे भारतातलं एक मोठं संस्थान होतं. उत्तरेत या घराण्यांचं स्थान किती मोठं होतं हे वेगळं सांगायला नकोच. शिंद्यांच्या भावकीतली बरीच मंडळी शिंदेशाहीत होती. उदा. साबाजी शिंदे, साबाजींचे नातू मानाजी शिंदे-फाकडे, रायाजी पाटील शिंदे इत्यादी. असो.
‘रविराव’ हे शिंद्यांचं प्रसिद्धीस आलेलं आद्यघराणं. त्यांचं मूळ कोकणातलं असल्याचं म्हणतात. बहामनी राज्यात हे घराणं लौकिकास आलं. त्यासाठी या घराण्यानं कुठला पराक्रम केला, त्यांचं मूळ ठिकाण कोणतं, मुळपुरुष कोण वगैरे गोष्टी नेमकेपणानं ज्ञात नाहीत. आदिलशाहीनंतर मुघल, शिवशाही, पेशवाईच्या काळात कमीअधिक फरकानं हे घराणं राजकीयदृष्ट्या सक्रिय होतं. पेशवाईत बाळाजी विश्वनाथ पेशव्यांबरोबर या घराण्यातील मानाजी शिंदे रविराव होते. कसल्यातरी मोहिमेत पराक्रम केल्याने त्यांना लोणी गावचा मोकासा 1720 साली पेशव्यांकडून प्राप्त झाला. महत्वाचं म्हणजे, 1763 च्या मराठे व निजाम यांच्यात झालेल्या राक्षसभुवनच्या लढाईत या घराण्यातील मंडळींनी पराक्रम बजावला. निजामाच्या फौजेने रघुनाथराव पेशव्यांच्या हत्तीला गराडा घातलेला असताना, तो सोडवला मानाजींचे पुत्र संताजीराव व सुभानराव यांनी. परिणामी पेशव्यांनी त्यांना लोणी गाव कायमचं जहागिर देऊन त्यांना विशेष तैनात, हत्ती, पालखी वगैरे गोष्टी दिल्या.
1816-17 मध्ये त्रिंबकजी डेंगळेंनी ठाण्याच्या तुरुंगातुन शिताफीने पलायन केल्यानंतर इंग्रजांविरुद्ध शंभुमहादेवाच्या डोंगररांगांत फलटण, बरड, नातेपुते, शिखर शिंगणापूर या ठिकाणी रामोशी व मांग समाज संघटित केला. याकामी त्यांचे सासरे रविराव शिंदे यांनी त्यांना मदत केली (अर्थात रविराव या नावानेच या घराण्यातील मंडळी ओळखली जात, त्यांचं मूळ नाव काहीतरी असेलच). फलटणजवळ 2 ते 3 हजार घोडेस्वारांची मोठी फौज रविरावांच्या नेतृत्वाखाली जमा झाली होती. पुढे इंग्रजांनी पेशव्यांवर दबाव आणून त्रिंबकजी व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी जो फतवा काढायला लावला होता त्यात त्रिंबकजींच्या बारा साथीदारांत रविराव शिंदे लोणीकरांचा उल्लेख आहे.
काही दिवसांपूर्वी लोणीकंदला भेट दिली होती. गावात पूर्वी तीनचार वाडे शिंद्यांचे होते. सध्या मात्र एकच वाडा कसाबसा अस्तित्वात आहे. परंतु तो जगताप घराण्याच्या मालकीचा आहे. रविराव घराण्यातील कोणीएक मुलगी सासवडच्या जगतापांना दिल्याने ती मंडळी इकडच्या वतनावर आली. जवळच शिंद्यांनी बांधलेलं श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिर आहे. आसपास शिंदे रविराव मंडळी राहतात. वर सांगितल्याप्रमाणे इतर मंडळी बाभूळसर, राळेगण थेरपाळ व ग्वाल्हेर येथे आहेत
चला ! त्रिंबकजींना आठ बायका होत्या. दोन सासुरवाड्या सापडल्या (अहिरगाव येथे सासुरवाडीला शेवटी त्रिंबकजींना इंग्रजांनी पकडल्याने तेथील देशमुखांची एक व शिंदे रविराव दुसरी). अद्याप सहा बाकी आहेत.
लेखन- © सुमित अनिल डेंगळे
संदर्भ-
1. मराठी रियासत- खंड 8
2. पेशवे दफ्तर- खंड 45 (रविराव शिंदे घराण्याची कैफियत)
3. केतकर ज्ञानकोश (शिंदे घराणे)
4. Poona Residency Correspondence- Volume 13
छायाचित्रे-
1 व 2- लोणीकंद येथील शिंदे रविराव यांचा (सध्याचा जगतापांचा) वाडा
3, 4 व 5- शिंदे रविराव घराण्याचे श्रीविठ्ठलरुक्मिणी मंदिर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...