भाग २
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
मागील
भागात आपण ऐकलं कि का शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं? आणि कश्या
प्रकारे महाप्रतापी शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या दरबारात सिंहगर्जना केली
आणि स्वतःच्या प्राणांचीही चिंता न करता, स्वतःचा आणि समस्त मराठ्यांचा
स्वाभिमान जपला. शिवाजी महाराजांनी सिंहगर्जना केली पण ते त्यावेळी हजारो
मैल दूर शत्रूच्या प्रदेशात आणि सगळ्या पाताळयंत्री माणसांच्या गराड्यात
होते. औरंगजेबाने वर वर काही दाखवले नाही पण आता महाराजांना सहजा सहजी परत
जाऊ द्यायचे नाही असा चंगच त्याने बांधला.
बऱ्याच
लोकांना वाटतं की महाराज आग्र्याहून सुटले म्हणजे मिठाईचे पेटारे मागवले
त्यात बसले आणि पळाले. पण हे इतकं सोप्प होत का? तर नक्कीच नाही.
महाराजांनी यादरम्यान कित्येक युक्त्या केल्या, बरेच लोक आपल्या बाजूने
वळवले, जे बोलून वळले नाहीत त्यांना पैसे देऊन फितवले, नाना कर्मे करून
अखेर अप्रतिम नियोजन करून आपलीच नाही तर बरोबर आलेल्या सर्व माणसांची
सुखरूप सुटका करून राजे महाराष्ट्रात परत आले. आजच्या लेखात महाराजांनी
आग्र्याहून सुटण्यासाठी काय काय शक्कली लढवल्या ते ऐकूयात. आपल्याला हा भाग विडिओ स्वरूपात ऐकायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा:
आग्र्याचा
दरबार संम्पला पण आज दरबारात घडलेला प्रसंग कोणीच विसरलं नव्हतं. आणि त्या
प्रसंगामुळे एका पाच हजारी मनसबदारचा 'तीळा' एव्हढा अहंकार मात्र दुखावला.
तो माणूस होता महाराजा जसवंन्तसिंह. आता हे खरं होतं की जसवंतसिंगाला
महाराष्ट्रात सतत पराभवच अनुभवावा लागला. सतत मराठी मावळ्यांना पाठच
दाखवावी लागली. पण म्हणून काय हे दरबारात सर्वांसमोर सांगायचं? भले
जसवंतसिंगाने त्याचा स्वाभिमान कधीच औरंगजेबाच्या पाई अर्पण केला होता पण
तरी अश्या स्वाभिमान नसणाऱ्या माणसाचा महाराजांनी भर दरबारात अपमान करावा?
लागलं की त्याच्या मनाला, गेला तो औरंगजेबाचे कान भरायला. त्याच्या बरोबर
अजून एक बाई होत्या यांचं नाव 'जहाँआरा' बेगम. आता या बाईसाहेब कोण आणि
त्यांचं असं काय घोड मारलं होत महाराजांनी? तर या बाईसाहेब औरंगेजबची मोठी
बहीण मग बहिणीला आपल्या भावाचा अपमान बघवला नाही की काय? छे असं काही
नव्हतं. बाईसाहेबांचं दुखणं वेगळंच. या बाईसाहेबांना सुरत शहराच्या जकातीच
उत्पन्न दिलं जायचं. आग्र्याला यायच्या आधी महाराजांनी सुरत लुटली होती मग
बाईंचं उत्पन्न बंद म्हणून या बाईच्या पोटात दुखत होतं. आणि कोण आलेलं?
वझीर जाफरखान हे सदगृहःथपण महाराजांवर खार खाऊन होते. आता हा कोण? तर हा
प्रत्यक्ष पराक्रमी आणि आपली ३ बोटं गमावलेल्या शास्ताखाच्या बहिणीचा नवरा
यामुळे हापण महाराजांविरुद्ध कान भरायला पुढे. या तिघांनी म्हणजे
जसवंतसिंग, जहाँआरा बेगम आणि जाफरखान यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ मे
१६६६ ला औरंजेबाचे कान भरायला त्याला जनानखान्यात बोलावलं. यांचं एकंच
म्हणणं पडलं, 'हा कोण कुठचा सीवा? माबदौलतची म्हणजे औरंगजेबाची बरका अशी
बेअदबी करतो? असा जंगली माणसासारखा वागतो? मयूरसिंहासनाला पाठ दाखवतो? आणि
बादशहा त्याला काहीच म्हणत नाहीत? तुम्ही असे शांतच कसे राहू शकता? आज एक
सिवा असा वागतोय त्याला शिक्षा दिली नाही तर उद्या असे १०० लोक उपटतील?'
आता या बापड्यांना कोण सांगणार औरंगजेब शांत आहे असं दाखवत होता मनात तर
त्याच्याही आग लागली होती. मला ना शॅमेलिऑनला पाहिलं ना कि नेहमी
औरंगजेबाचीच आठवण येते मनात काय चाललंय ते चेहेऱ्यावरून डोळ्यातून कोणालाही
कळत नाही. अखेर 'House of Shivaji' नुसार या चर्चे अंती औरंगजेबाने
सगळ्यांच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराजांना मारायचं ठरवलं.
रामसिंग
काही झोपलेला नव्हता त्याच्या गुप्तहेरांनी त्याला जनानखान्यात ठरलेली ही
बातमी आणून दिली. मिर्झा राजांना निदान या वेळी तरी शिवाजी महाराजांच्या
जीवाची काळजी होती. या वेळी तरी असं मी का म्हणतोय हे तुम्हाला पुढच्या
विडिओ मध्ये कळेल. त्यानुसार त्यांनी रामसिंगाला आधीच शिवाजी महाराजांच्या
जीवाचं रक्षण कर असं निक्षून बजावलं होत. रामसिंग तडक औरंगजेबाचा बक्षी
आसदखान' याच्याकडे गेला. त्याला म्हणाला 'माबदौलत म्हणजे औरंगजेब बरका? जर
शिवाजी महाराजांना मारणार असतील तर आधी त्यांनी मला मरावं, मग माझ्या
मुलालाही मरावं मग शिवाजी महाराजांच्या जीवाचं काय बर वाईट करायचंय ते
करावं. कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या जीविताची हमी दिलेय तस वचन दिलंय'
झालं आता आली का पंचाईत. औरंगजेबाने हे ऐकलं पण तो अजून वरचढ 'राजस्थानी
रेकॉर्डस्' नुसार तो रामसिंगला म्हणाला 'ठीक आहे मग तू शिवाजी महाराजांना
जामीन रहा ते आता पुढे काही गैर बर्ताव करणार नाहीत याची जबाबदारी तुझी.
रामसिंगाने ते लगेच मान्य केलं.
इकडे
महाराजांना रामसिंगाने ही बातमी सांगितली, महाराजांनी लगेच ओळखलं की आता
इथून सुटायचं तेही लवकरात लवकर. महाराजांनी आता आग्र्याहून कायदेशीररित्या
निघण्यासाठी एक एक मार्ग अवलंबायला सुरुवात केली. महाराज आधी वझीर
जाफरखानला म्हणजे शास्ताखानाच्या बहिणीच्या नवऱ्याला भेटायला गेले. सभासद
बखरीनुसार जाफरखानाची बायको शिवाजी महाराज भेटायला येणारेत हे कळल्यावर
भरपूर घाबरली. तिला आपला भाऊ शास्ताखानच आठवला. तिने आपल्या नवऱ्याला
स्पष्टच सांगितलं की या सिवाला लवकरात लवकर घालवा 'शास्ताखान' लक्षात आहे
ना? त्यानुसार जाफरखानाने महाराजांकडे फार लक्ष न देता लवकरात लवकर त्यांचा
निरोप घेतला. महाराजांची हि भेट वाया गेली.
दरम्यान
तिकडे औरंगजेबाने १७ मे १६६६ ला एक वेगळाच कट रचला तो रामसिंगाला म्हणाला
की तुम्ही शिवाजी महाराजांना घेऊन काबूलला लढायला जा, रामसिंग खुश झाला
त्याला वाटलं चला निदान शिवाजी महाराज आग्र्याहून तरी सुटले. पण औरंगजेबच
तो सरळ विचार करेल तर शपथ, पुढे तो रामसिंगला म्हणाला तुमच्या बरोबर
रादअंदाजखान येणारे. हे ऐकल्यावर रामसिंगचा चेहरा खाड्कन उतरला. कोण होता
हा आग्यावेताळ? हा तोच माणूस ज्याने अलवरच्या सतनाम्यांना चिरडून मारायचे
क्रूर काम औरंगजेबाने याच आग्यावेताळाला दिले होते. बादशाह अशी भयानक कामे
यांच्यावरच सोपवायचा. रामसिंगच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला हा रादअंदाजखान
बरोबर येणार म्हणजे काबूलच्या मोहिमेत मध्येच कुठेतरी हा शिवाजी
महाराजांना घात करून मारणार आणि युद्धात राजे मारले गेले अशी बोंब ठोकणार.
पण काय झालं काय माहित औरंगजेबाने हि मोहीम एक महिन्यासाठी टाळली.
मग
महाराजांनी २० मे १६६६ ला आपला वकील रघुनाथपंत कोरडे यांना औरंगजेबाकडे
अर्ज घेऊन पाठवलं की 'मी आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून देतो मला दक्षिणेत
पाठवा. या बाबतीत बोलण्यासाठी आपण घुसलखान्यात भेटू' औरंगजेबाला एकांतात
भेट म्हटल्यावर अफझलखानच आठवला. त्याने लगेच रघुनाथपंतांना सांगितलं कि जरा
सबुरी बाळगा.
राजस्थानी
रेकॉर्ड नुसार महाराजांनी २९ मे १६६६ आता परत एक अर्ज केला तो हि बक्षी
अमीनखानाकडून की 'बादशहांनी जर माझे सर्व किल्ले मला परत केले तर मी
त्यांना २ कोटी रुपये देईन.' आता बादशहाला वाटायला लागलं कि माझेच सरदार
शिवाजी महाराजांच्या बाजून बोलायला लागलेत. त्याने लगेच फौलादखानाला
महाराजांवर पहारे बसवायला सांगितलं. जेधे करीना म्हणतो जेष्ठ द्वितीया १५८८
पराभवनाम संवत्सरे, आगरियास बिघाड पावून राजश्री सिवाजी राजे यांस चौक्या
बसवल्या. म्हणजेच औरंगजेबाने महाराजांना औपचारिकरीत्या अटक केली. महाराज
फार दुःखी झाले पण शिवाजी महाराज व्हायचं तर दुःख गोंजारत बसायला ही वेळ
नसतो आणि आनंद साजरा करायलाही.
इथून
महाराजांना नक्की कळलं की आता आग्र्याहून परवानगी मागून निघणं शक्य नाही.
महाराजांनी त्यांच्या कल्पक डोक्याने एक मोठ्ठा प्लॅन केला. महाराजांना
रामसिंग जामीन होता त्यामुळे महाराजांना काही करून रामसिंगने महाराजांची
घेतलेली जबाबदारी काढून घ्यायची होती म्हणजे महाराज आग्ऱ्यातून निसटले तरी
रामसिंगवर त्याचा आरोप येणार नाही. महाराजांनी रामसिंगला सांगितले कि
तुम्ही माझा दिलेला जमीन मागे घ्या बादशहा मला काय अपाय करायचा ते करू देत
तुमची जी फौज माझ्या रक्षणासाठी आहे ती काढून न्या. झाले उलटेच रामसिंग
म्हणाला नाही राजे तुम्ही माझी जबाबदारी आहात तुमच्या जीवाचं काही बर वाईट
होणार नाही ही माझी जबाबदारी आहे. आता आला का प्रश्न?
महाराजांनी
आता एक नवीनच सोंग काढलं, महाराजांची तब्येत हळूहळू बिघडायला लागली. आता
या सोंगाबरोबरच महाराजांनी काही गोष्टी नित्यनेमाने करायला सुरुवात केली.
महाराज आपल्या आजूबाजूच्या पहारेकऱ्यांसमोर एकच शाल, एकच जोडे आणि हातातलं
सोन्याचं कड दिसेल असे वावरायला लागले. पहारेकरी नेहमीच माणसाला फक्त
चेहेऱ्यावरून ओळखतात असं नाही हे महाराजांनी हेरलं होतं. त्यामुळे महाराज
म्हटलं की ती शाल, तेच जोडे आणि हातात सोन्याचं कड हे समीकरण सगळ्या
पहारेकर्यांच्या डोक्यात बसलं. आता महाराजांनी राजस्थानी रेकॉर्डस् नुसार
एक अजून अर्ज केला कि माझ्या बरोबर आलेल्या लोकांना परत पाठवून द्या. या
अर्जाला औरंगजेबाने लगेच मान्यता दिली. त्याला वाटलं बरच आहे महाराजांजवळ
जेव्हढी कमी माणसं तेव्हढ्या आरामात महाराजांचा घात करता येईल. त्याने सर्व
लोकांना लगेच परवाने दिले. यातलेच काही परवाने महाराजांनी आपल्याजवळ ठेवून
घेतले आणि सोबतच्या सर्व लोकांना परत पाठवलं. आता महाराजांजवळ हिरोजी
फर्जंद ,---,--- एव्हढेच काही ठराविक लोकं राहिले. श्रावणमास सुरु झाला
महाराजांची तब्येत काही केल्या बारी होईना म्हणजे अश्या बातम्या महाराजांची
लोकंच पसरवायला लागली. खरंतर महाराजांचं साधं डोकेसुद्धा दुखत नव्हतं.
श्रावण महिना आणि महाराजांची तब्येत बारी होत नाही म्हणून महाराजांनी
दानधर्म सुरु करण्यासाठी मिठाईचे मोठे मेणे मागवायला सुरुवात केली. यासाठी
महाराजांनी रामसिंगाकडून ६६०००/- रुपये उधार घेतल्याचा उल्लेख राजस्थानी
रेकॉर्डस् मध्ये आहे. आता रोज मिठाईचे पेटारे महाराजांकडून आग्र्यात
वाटण्यासाठी जायला लागले. एक एक पेटारा दोन माणसांना उचलावा लागेल इतक्या
वजनाचा होता तर त्यात एक माणूस बसू शकेल इतका मोठा.
याच
दरम्यान रामसिंगाने महाराजांचा जामिन काढून घेतला आता महाराजांना हायसं
वाटलं म्हणजे आता महाराज निघाले तरी कोणी रामसिंगला जबाबदार नाही धरणार.
आता महाराजांनी निघायची तारीखही ठरवली. १७ ऑगस्ट १६६६ शुक्रवारी महाराजांचं
डोकं जास्तच ठणकायला लागलं. हिरोजी फर्जंदांनी आजूबाजूच्या पहारेकर्यांना
सांगितलं की महाराजांची तब्येत जास्तच बिघडली आहे म्हणून ते अराम करतायत
तरी त्यांना कोणी त्रास देऊ नये. त्या दिवशी वेळच्या वेळी मिठाईचे पेटारे
आले आणि जेधे शकवलीनुसार त्यात बसून महाराज आणि संभाजी राजे तिथून पसार
झाले. यावेळी ९ वर्षांच्या संभाजी राजाचंही कौतुक कि पेटाऱ्यात बसून
त्यांनी शत्रूला जराही कळू दिल नाही की ते आत बसलेत. हिरोजी फर्जंद
महाराजांची नेहमीची शाल पांघरून आपल्या हातात महाराजांचं तेच कड घालून
पलंगावर झोपून राहिले. पलंगाखाली माहाराजांचे जोडे ठेवले होते. जवळ एक
पोऱ्या महाराजांचे पाय चेपत बसला होता. या सर्व गोष्टींमुळे महाराजांच्या
डेऱ्यात जे पहारेकरी डोकावत होते त्यांना राजेच झोपलेत असं वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी १८ ऑगस्ट १६६६ ला हिरोजी फर्जंद यांनी सकाळीच पहारेकर्यांना
सांगितलं की महाराजांची तब्येत काही बरी नाही मी वैद्यांकडे जाऊन औषध घेऊन
येतो. असं सांगून अखेर हिरोजी फर्जंदही तिथून सटकले. महाराजांच्या जागी
रात्रभर हिरोजी फर्जंद झोपले होते पकडले गेले असते तर मृत्यूचं.
आग्र्याच्या बाहेर २ कोसावर पोहोचल्यावर महाराज आणि संभाजी राजे
पेटाऱ्यातून बाहेर पडले आणि मथुरेच्या दिशेने निघाले. महाराज मथुरेला का
गेले? याची दोन कारणं एक म्हणजे संभाजी महाराजांचं वय फक्त ९ वर्ष होतं
त्यांना इतका लांबचा प्रवास झेपणं शक्य नव्हतं, दुसरं कारण म्हणजे
औरंगजेबाने महाराजांच्या शोधावर माणसं पाठवली असती तर त्यांना लहान
मुलाबरोबर जाणारा माणूस शोधायला सांगितलं असतं. म्हणून संभाजी राजांना
मथुरेलाच सोडणं योग्य होतं.
तेथे
मोरोपंत पिंगळ्यांचे मेव्हणे काशीपंत आपल्या दोन भावांबरोबर राहत होते.
"राजगडावर पोहोचलो की माझ्या हातच पत्र पाठवेन तेव्हाच संभाजी राजांना घेऊन
या' असं सांगून महाराज वेषांतर करून निघाले. पूर्वी आपल्या लोकांना परत
पाठवण्यासाठी महाराजांना जे परवाने मिळाले होते त्यातलेच काही दाखवून नरवर
वरून महाराज पुढे गेल्याची नोंद आढळते. त्यापुढे महाराज राजगडावर कोणत्या
रस्त्याने पोहोचले या बाबतीत इतिहास मुका आहे. राजस्थानी रेकॉर्ड्सनुसार
महाराज २५ दिवसात राजगडावर पोहोचले अशी नोंद आहे, सुरतकर इंग्रज म्हणतात
महाराज ऑक्टोबर १६६६ ला म्हणजे २ महिन्यांनी पोहोचले तर तारिखे दिलखुशमध्ये
महाराज एका महिन्याने म्हणजे सप्टेंबरला राजगडावर पोहोचल्याची नोंद आहे.
यापुढे संभाजी महाराजांचा शोध बंद व्हावा म्हणून महाराजांनी संभाजी राजांचा
रस्त्यात मृत्यू झाला असं घोषित करून सर्व अंत्यविधीही उरकले.
या
सर्वातून दिसतं की शिवाजी महाराजांनी आग्र्यात जायची जोखीम उचलली पण तिथे
जाऊन त्यांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. औरंगजेबासारख्या उलट्या काळजाच्या
माणसाने चौक्या बसवूनसुद्धा महाराजांनी धीर सोडला नाही. नीर निराळे
प्रयत्न केले, युक्त्या लढवल्या आणि स्वतः, संभाजी महाराज आणि आपल्या
सगळ्या साथीदारांसह सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले. औरंगजेबाने त्याच्या
रोजनिशीत नोंद केली आहे की 'सिवा माझ्या तावडीत सापडला होता पण मी त्याला
त्याच वेळी मारलं नाही जी माझ्या आयुष्यातली खूप मोट्ठी चूक होती.' असो पण
ज्या औरंगजेबाने आपल्या आप्तस्वकीयांनाही मारलं त्याच्या तावडीतून त्याचा
कट्टर शत्रू शिवाजी महाराज सुटून आले यातूनच शिवाजी महाराज यांची
मुत्सद्देगिरी, नियोजन, धाडस, संयम असे चिक्कार गुण दिसून येतात.
औरंगजेबाचे विचार कवी भूषणाने काहीसे या कवितेप्रमाणे झाले असावेत.
पौन हो की पंछी हो की गुटखाकी गौन हो देखो कौन भांती गयो करामात सेवा की
ज्याचा
अर्थ शिवाजी महाराजांची करामत पाहून आश्चर्यचकित झालेल्या लोकांना कळेना
की शिवाजी महाराज वाऱ्याच्या झुळुकीबरोबर नाहीसे झाले? कि पक्ष्यासारखे
उडून गेले की गुटखा खाऊन अदृश्य झाले?
संदर्भ:
सभासद बखर
तारिखे दिलकुशा
राजस्थानी रेकॉर्डस्
जेधे शकावली
पत्रसारसंग्रह
राजस्थानी रेकॉर्डस्
जेधे शकावली
पत्रसारसंग्रह
No comments:
Post a Comment