विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 15 April 2023

शिवाजी महाराजांना मारायचा मिर्झा राजांचा गुप्त कट

 


शिवाजी महाराजांना मारायचा मिर्झा राजांचा गुप्त कट
लेखन :सुयोग सदानंद शेंबेकर
मिर्झा राजे जयसिंग हे नाव ऐकलं कि या तीन गोष्टी डोळ्यसमोर येतात,
१. औरंगजेबाचा निष्ठावन्त नोकर
२. मुत्सद्दी आणि शूर राजकारणी
३. आणि तिसरं महत्वाचं, इतके असूनही शिवाजी महाराजांवर फार माया करणारा आणि त्यांना वचन देऊन त्यांचे प्राण जपणारायातील
पहिल्या दोन गोष्टी निःशंकपणे खऱ्या आहेत. पण तिसरी गोष्ट? तिसरी गोष्ट म्हणजे मिर्झा राजांवर बऱ्याच कादंबरीकारांनी केलेले उपकार आहेत. आजपर्यंत बऱ्याच कादंबरीकारांनी मिर्झा राजांना मृदू, शिवाजी महाराजांची काळजी असणारे, महाराजांवर प्रेम असणारे पण हात दगडाखाली असल्याने त्यांना दुर्दैवाने महाराजांना मदत करता येत नव्हती असे काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे साहजिकच बऱ्याच वाचकांच्या मनात या व्यक्तिमत्वाबद्दल म्हणजेच मिर्झा राजे जयसिंगांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो. मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांना ते आग्र्याला जात असताना त्यांच्या प्राणांच रक्षण करण्याचं वचन दिल होतं हे खरं आहे. पण माणसाच्या आयुष्यात सगळं सुरळीत चालू असताना त्याच्या खऱ्या गुणांची, त्याच्या स्वभावाची पारख होत नाही ती होते ज्यावेळी माणूस कठीण परिस्थितीत किंवा कठीण प्रसंगात सापडतो तेव्हा. आजच्या आपल्या भागात पाहुयात की कठीण प्रसंग आल्यावर मिर्झा राजांसारखा कर्तृत्वान माणूसही किती खालच्या थराला जाऊन महाराजांचा विश्वासघात करून त्यांना जीवे मारायचं ठरवू शकतो ते.
आपल्याला हा भाग विडिओ स्वरूपात पाहायचा असल्यास खालच्या व्हिडिओवर क्लिक करा:
महाराज त्यांच्या जवळ जवळ सर्व साथीदारांसकट आग्र्याहून निसटले पण जेधे शकवलीनुसार दुर्दैवाने रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबकपंत डबीर हे फौलादखानाच्या तावडीत सापडले. फौलादखानाने शिवाजी महाराजांचा सगळा राग या दोघांवर काढला. House of Shivaji नुसार फौलादखानने या दोघांना रोज कोड्याने म्हणजेच चाबकाने फोडायला सुरुवात केली, नाकपुड्यांमध्ये मीठ घातलं जेव्हढा म्हणून छळ करता येईल तेव्हढा केला. का? तर यांनी हे कबूल करावं की कुंवर रामसिंगने म्हणजे मिर्झा राजे जयसिंगांच्या जेष्ठ पुत्राने शिवाजी महाराजांना आग्र्याहून पाळायला मदत केली. फौलादने रामसिंगच्याही काही सैनिकांना कैद केलं त्यांच्यावरही असेच अत्याचार केले. अखेर या सगळ्यांनी काबुल केलं की रामसिंगानेच महाराजांना आग्ऱ्यातून सुटायला मदत केली. फौलाद खुश त्याने या सगळ्यांना फिदाईखानाकडे पाठवलं वर सांगितलं की यांनी कबुली दिलेय की रामसिंगानेच महाराजांना पळून जायला मदत केली. पण इथे भलताच प्रकार झाला, रघुनाथपंत आणि त्र्यंबक पंतांनी फिदाईखानाला सांगितलं की आम्हाला भरपूर मारहाण करून जबरदस्तीने फौलादने आमच्याकडून खोटं वदवून घेतलं. खरतर कुंवर रामसिंगचा शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले यात काडीइतकासुद्धा संबंध नाही.पण शेवटी ही मोगलाई, औरंगजेब रामसिंगवर नाराज झालाच. फौलादखानला मामा बनवून शिवाजी महाराज निसटले तरी दोष रामसिंगचाच. काय दोष होता त्याचा की तो हिंदू. औरंगजेबाने रामसिंगला शिवाजी महाराज पकडले जात नाहीत तोवर दरबारात यायला बंदी केली. त्याची मनसबसुद्धा कमी केली.याचदरम्यान मिर्झा राजांनी दख्खन मध्ये आदिलशाहाबरोबर झगडा मांडला होता. चिकाटीने, प्राणपणाने जमीन-आसमान एक करून हा औरंगजेबाचा निष्ठावंन्त नोकर आदिलशाही जिंकण्यासाठी झटत होता. पण यश काही मिळत नव्हतं. त्यातच त्यांना आपल्या मुलावर, रामसिंगवर औरंगजेबाची खप्पा मर्जी झाल्याबद्दल कळलं. आता मिर्झा राजांच सार अवसानच गळालं.मिर्झा राजांचे मुघल दरबारातले शत्रू दिवसेंदिवस औरंगजेबाचे कान मिर्झा राजांविरुद्ध भरत होते, आदिलशाहीविरुद्ध त्यांना यश मिळत नव्हतं म्हणून आणि शिवाजी महाराजांसारखा प्रत्यक्ष ज्वालामुखी अलीज्यांचा म्हणजे औरंगजेबाचा बरका, अपमान करण्यासाठी मुद्दाम आग्र्याला पाठवला म्हणून. औरंगजेबाचे कान भरण्याच्या या मोहिमेत आपण मागच्याच भागात पाहिलेले पराक्रमी वीर महाराजा जसवंतसिंग अग्रेसर होते. आता मिर्झा राजांसाठी परिस्थिती बिकट होत चालली होती, एव्हढे वर्ष त्यांनी इमाने इतबारे औरंगजेबाची चाकरी केली होती आणि आता त्यांच्या निष्ठेवरच संशय घेतला जात होता. बर एक सांगायचं राहिलं मिर्झा राजांची हि निष्ठा औरंगजेबाचा मोठा भाऊ, दाराह शुकोह जिवंत असेपर्यंत त्याच्या पायाशी वाहिलेली होती असा स्पष्ट उल्लेख 'मासिर-ए-आलमगिरी' मध्ये आहे. औरंगजेब बादशहा झाल्यावर लगेच मिर्झा राजांनी पक्ष बदलला. असो तर आता मिर्झा राजांवर त्यांची औरंगजेबावर असलेली निष्ठा सिद्ध करायची वेळ आली. आणि मिर्झा राजांचा तोल सुटला, मिर्झा राजा जयसिंगांनी नीतिमत्ता, सदवर्तन वगैरे सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवल्या आणि औरंगजेबाचा वजीर, जाफरखानाला पुढे दिलेलं पत्र लिहिलं. या पत्रातील भाषा आणि मिर्झा राजांचा मनसुबा दोन्हीही सर्वस्वी नीच आणि हलक्या दर्जाचे आहे हे दिसून येतं.
"विजापूर (म्हणजे आदिलशाही), गोवळकोंडा (म्हणजे कुतुबशाही) आणि शिवाजी महाराज या त्रयीच्या विरुद्ध माझे सर्व सामर्थ्य एकवटून मी प्रयत्न केला आहे व करीतही राहीन. शिवाजीने कसेतरी मला एकदा भेटावयास यावे अशा तजविजीत मी आहे. म्हणजे येता जाताना केव्हा तरी संधी साधून माझे हुशार लोक त्याचा नाश करतील ! हा बादशहाचा बंदा लोकांच्या निंदास्तुतीकडे न पाहता बादशाही कार्य फत्ते करण्याकरिता काहीही करण्यास तयार आहे…."(याचा सरळ सरळ अर्थ महाराजांचा विश्वासघात करून त्यांचा खून पाडायचा नीच विचार मिर्झा राजे जयसिंगाच्या मनात होता. हा विश्वासघातकी विचार तर आहेच पण पुढे महाराजांचा विश्वासघात मी कसा करेन हे मिर्झा राजांनी उलगडलं आहे ते ऐकून मिर्झा राजांच्या विचारांची कीव करावी असं वाटतं.)ते पुढे म्हणतात, "बादशहांनी संमती दिली तर त्याच्या (म्हणजे शिवाजी महाराजांच्या) कुळाशी शरीरसंबंध जोडण्याचे म्हणजे माझ्या मुलाला ( किरतसिंगला) त्याची मुलगी करण्याचे बोलणे लावण्यास मी तयार आहे. त्याचे घराणे आणि जातकुळी माझ्यापेक्षा इतकी हीन आहे की आम्ही त्याचा स्पर्श झालेले अन्नही खाणार नाही, मग लग्नसंबंधाची गोष्ट कश्याला? त्याची मुलगी पकडून आणली गेली तरी मी तिला आपल्या जनानखान्यात ठेवणार नाही ! पण तो हीन कुळातला असल्यामुळे हे आमिष गिळून हुकाला अडकेल (म्हणजे फसेल). हा बेत गुप्त राखला पाहिजे. उत्तर त्वरित पाठवावे."
या भयंकर पत्राला औरंगजेबाने काहीच उत्तर पाठवले नाही त्यामुळे मिर्झा राजांचा हा नीच विचार त्यांना आमलात आणता आला नाही. पण गुलामगिरी, लाचारी आणि कठीण परिस्थिती माणसाला नैतिकदृष्ट्या किती हीन दर्जाला घेऊन जाऊ शकते हे या पत्रावरून दिसून येतं.हे पत्रसुद्धा कसं सापडलं याची फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अदिलशाहीकडून होणारा पराभव आणि शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका यामुळे गैरमर्जी झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजांना त्यांच्या मुन्शीकडून उदयराजकडून विष घालून मरवलं असा स्पष्ट उल्लेख House of Shivaji मध्ये आहे. मिर्झा राजांच्या मुलाला किरतसिंगला उदयराज मुन्शीवर संशय आला त्यामुळे त्याने उदयराजला पकडण्याचा प्रयत्न केला. उदयराज पळून गेला आणि त्याने आपला धर्म बदलला, तो मुस्लिम झाला. उदयराजचा तल्यारखान झाला. आता किरतचा सगळा राग वाया, औरंगजेबाची उदयराजवर नाही नाही तल्यारखानवर एकदम मर्जी झाली. आता किरतची काय हिम्मत कि तो उदयराजला हात लावेल? असो तर मिर्झा राजांची सगळी महत्वाची कागदपत्रे घेऊन हा तल्यारखान पसार झाला, पुढे या तल्यारखानाचा मुलगा हिमायत यार याने हि सर्व पत्र 'इन्शा-ए-हफ्त-अंजुमन' मध्ये प्रसिद्ध केली. हफ्त म्हणजे आठ आणि अंजुमनम्हणजे हकीकती. यामध्येच हे पत्र मिळालं.तर यातून दोन गोष्टी प्रकर्षाने कळतात. एक म्हणजे मिर्झा राजे जयसिंग यांच्यावर वाईट वेळ येताच त्यांनी आपला खरा स्वभाव आणि खऱ्या विचारांचं प्रदर्शन केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुकीच्या व्यक्तीवर निष्ठा ठेवली चुकीच्या व्यक्तीशी प्रामाणिक राहिलो की आपलाच घात होतो. मिर्झा राजे, सिद्दी जोहर यांच्या सारख्यानच्या इमानाचा एकच परिणाम होतो, तो म्हणजे विश्वासघात करून मृत्यू, तेच तान्हाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीद यांच्यासारख्यांच्या निष्ठा त्यांना इतिहासात अमर करतात. धन्यवाद.
संदर्भ:
  1. इन्शा-ए-हफ्त-अंजुमन
  2. जेधे शकावली
  3. House of Shivaji

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...